महाराष्ट्रात मे १९८४मध्ये जातीय दंगली झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महमंद पैगंबरांचा अपमान केला असे सांगून मुस्लिमांना भडकवण्यात आले होते. मग बाळासाहेबांनी एक जाहीर निवेदन काढले. आपण महंमद पैगंबराचा अपमान केला नसल्याचे सांगून आपले भाषण संदर्भ सोडून छापल्याबद्दल त्यांनी उर्दू वृत्तपत्रांचा निषेध केला. खरं पाहिलं तर बाळासाहेबांनी पैगंबरांचा उल्लेख महामानव असाच केला होता. मुस्लिमांनी त्यांच्या शिकवणीचे पालन करावे, असे त्यांनी म्हटले होते. पण तरीही मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी येथे गैरसमजुतीतून जातीय दंगली झाल्या.
बाळासाहेबांनी या दंगलींच्या काळात ‘मार्मिक’मध्ये ‘नाही तर या दंगली पेटतच राहतील’ असा इशारावजा अग्रलेख लिहिला. त्यात दंगली पेटू नयेत म्हणून काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले होते. परंतु तरीही बाळासाहेबांवर आणि ‘सोबत’कार ग. वा. बेहरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी राज्यात आणि केंद्रात राज्य इंदिरा काँग्रेसचे होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या जातीय दंगलीची व हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री प्रकाशचंद्र सेठी यांना मुंबईत पाठवले. त्यामुळे विरोधी पक्षांना, त्यात प्रामुख्याने काँग्रेसला शिवसेनेला झोडण्याची संधी मिळाली. शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली. परंतु शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख या गोष्टीला बधले नाहीत.
दरम्यान, पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी उच्छाद मांडला होता. काही अतिरेक्यांनी त्यांच्या कारवायांसाठी सुवर्ण मंदिराचा आसरा घेतला होता. सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी जून १९८४मध्ये सुरक्षारक्षकांनी कडक कारवाई केली. सुवर्ण मंदिरात लष्कर घुसल्यामुळे देशभरातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील शीख समुदाय इंदिरा गांधी यांच्यावर नाराज झाला. नंतर शीख अतिरेक्यांनी वेळ साधून इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या केली. इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्ली आणि देशाच्या उत्तरेतील भागात हिंसाचारांचा आगडोंब उसळला. इंदिराजींच्या निधनानंतर राजीव गांधी यांची काँग्रेसच्या नेतेपदी निवड झाली आणि देशाचे नवे पंतप्रधान म्हणून त्यांनी पदभार सांभाळला.
त्यानंतर २४ आणि २७ डिसेंबर रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘न भूतो न भविष्यती’ असे बहुमत मिळाले. ५०८ जागांपैकी ३९६ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांची दाणादाण उडाली. मुंबईतून शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक पराभूत झाले, तर देशामध्ये भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी, जनता पक्षाचे चंद्रशेखर, समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह अनेक रथी-महारथी काँग्रेसच्या लाटेत वाहून गेले. लोकसभेचे निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले.
काँग्रेसला सहानभूतीच्या लाटेचा फायदा मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हेही निवडणूक घेण्यास उत्सुक दिसले. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर या महानगरपालिकांसह राज्यातील २११ नगरपालिकांच्या/नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
मुंबईवर भगवा फडकला
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २५ एप्रिल १९८५ रोजी झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची भाषा काही राजकीय पक्षांतील अमराठी लोक करीत होते. त्याचा समाचार शिवसेनाप्रमुखांनी आणि इतर स्वाभिमानी मराठी नेत्यांनी घेतला. विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार प्रमोद नवलकर यांनी परिषदेत भाषण करताना ‘मुंबई शहर महाराष्ट्रापासून अलग काढण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालला आहे,’ असा आरोप केंद्र सरकारवर केला. ते म्हणाले, ‘मराठी माणूस आणि मराठी भाषा यांचा जास्तीत जास्त अपमान महाराष्ट्राच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात होत आहे. इंदिरा काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या यादीत ३४ पैकी २७ उमेदवार बिगर-मराठी असावेत हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने सावध राहण्याची गरज आहे.’
शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा कुर्ल्याच्या नेहरूनगरमधील सभेत प्रचाराचा नारळ फोडताना स्पष्ट इशारा दिला की, ‘ही मुंबई मराठी माणसांची असून या मुंबईला हात तर लावून बघा! मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान करणार्यांना शिवसेना रस्त्यात आडवं करील.’ महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील या विषयावर गप्प बसले नाहीत. ते म्हणाले, ‘दिल्ली प्रदेशाप्रमाणे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा विचार काही लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे. पण असा प्रयत्न झाला तर आपण जागरूक राहून प्रतिकार केला पाहिजे.’ प्रा. मधु दंडवते म्हणाले, ‘हुतात्म्यांच्या रक्ताने महाराष्ट्रात आलेली मुंबई कोणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकणार नाही. मुंबईला अलग करण्याचा कोणी उपद्व्याप केलाच तर मुंबई वाचवण्यासाठी २१० हुतात्मे होतील.’
वर्तमानपत्रांतून मराठी-अमराठीच्या या वादावर अग्रलेख छापून आले. प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने सर्व मराठी उमेदवार उभे केले. इतर पक्षांनी मात्र बिगर-मराठी लोकांनासुद्धा अनेक ठिकाणी उमेदवारी दिली. या सर्वांचा परिणाम असा झाला की निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागताच शिवसेनेची बहुमताकडे घोडदौड सुरू झाली. शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या सहीने एक निवेदन जाहिरात म्हणून प्रसिद्ध केले. त्यात म्हटले होते, ‘शिवसैनिकांच्या निस्सीम जनसेवेद्वारे यावत्चंद्र दिवाकरौ, मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्राचीच राहावी ही श्रींची इच्छा.’
निवडणुकीचे निकाल लागले. १७० जागांपैकी ७४ जागांवर शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला. जनता पक्षाला १०, भारतीय जनता पक्षाला १३, समाजवादी काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावे लागले. केंद्रात आणि राज्यात इंदिरा काँग्रेस सत्तेवर होती. इंदिराजींच्या हत्येमुळे जनतेत सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. तरी इंदिरा काँग्रेसला अवघ्या ३७ जागा मिळाल्या आणि शिवसेनेने त्याच्या दुप्पट जागा मिळवून मुंबईवर वर्चस्व सिद्ध केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मराठी माणसाला डिवचण्याचा नतद्रष्टपणा काही शिवसेना विरोधकांनी चालवला होता. बहुरंगी-बहुढंगी मुंबई, आर्थिक राजधानी मुंबई असा डांगोरा पिटत मराठी माणसाच्या मुंबईला नख लावण्याचा उद्योगही केला होता. परंतु मुंबईतील मराठी माणसांनी एकत्र येऊन या मराठी मुंबईच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. मराठी माणसाच्या वङ्कामुठीचा फटका दिला.
१९८५मध्ये शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत मिळालेले बहुमत म्हणजे पुढील यशाची नांदीच होती. हा मराठी माणसांचाच विजय होता. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याची जी चर्चा झाली, त्यामुळे मराठी माणूस सावध झाला व शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. शिवसेनाप्रमुखांनी विजयी मेळाव्यामध्ये जाहीर केले की, ‘आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मुंबईत येणारे लोंढे थांबवण्यासाठी परवाना पद्धतीचाही आम्ही विचार करू.’ शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांची महापौर म्हणून १९८५-८६ या वर्षासाठी प्रचंड बहुमताने निवड झाली.
याच वर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचा रौप्यमहोत्सव मुंबई शहरात दिमाखाने साजरा झाला. केंद्रात आणि राज्यात इंदिरा काँग्रेस सत्तेवर होती. त्याचप्रमाणे मुंबई शहरात २७ डिसेंबर १९८५ रोजी काँग्रेस पक्षाचा जनशताब्दी सोहळा उत्साहात साजरा झाला. केंद्र व राज्य सरकार काँग्रेसच्या ताब्यात होते. पण मुंबई शहरावर मात्र शिवसेनेचे राज्य होते. कुणीही कितीही कटकारस्थाने केली, कुणी कितीही वल्गना केल्या तरी मुंबई शहरावर प्रथम हक्क मराठी माणसाचाच आहे. मुंबईवरील मराठी माणसाचा ठसा शिवसेना जिवंत असेपर्यंत पुसला जाणार नाही, हे १९८५च्या काँग्रेस लाटेत मराठी माणसांनी सिद्ध केले आणि आताही तेच सिद्ध होणार आहे. मुंबईतील मराठी माणसाचे आणि शिवसेनेचे नाते इतके घट्ट आहे की शिवसेनेशिवाय दुसरा विचारही मराठी माणूस मनात आणत नाही.