ही गोष्ट आहे कोरोना काळातली. कधीही कुणीही आठवू नये आणि कधीही कोणालाही, अगदी शत्रूलाही भोगावा लागू नये, असा भयंकर काळ होता तो. सगळ्या मानवजातीच्या आयुष्यातलं एक वर्ष नासवलं या कोरोनाने.
कोरोनाच्या संसर्गाने जगभर थैमान घातले होते, त्या काळात जगभरातले बहुतेक व्यवहार बंद होते. शाळा, कॉलेजेस सर्व बंद होते. अर्थात बाह्य चलनवलन बंद असलं तरी जग बंद पडू शकत नाही. विमानं उडली पाहिजेत. इमर्जन्सी सेवा चालल्या पाहिजेत. अन्नधान्य उत्पादन झालं पाहिजे. ते दुकानात पोहोचलं पाहिजे. हॉस्पिटल्स चालली पाहिजेत. लोकांच्या मनोरंजनाची साधनं चालली पाहिजेत. आर्थिक उलाढाली बंद पडू शकत नाहीत. बँका बंद पडू शकत नाहीत. या सगळ्यासाठी समोरासमोर न भेटता काम मार्गी लावण्याचे काही पर्याय शोधणं आवश्यक होतं. त्यातूनच या काळात सगळ्यांच्या आयुष्यात अवतरली झूम मीटिंग. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून दोन ठिकाणी ताटातूट झालेल्या कुटुंबियांपर्यंत सगळ्यांनी कामासाठी आणि अप्रत्यक्ष भेटीगाठींसाठी झूम मीटिंगचा वापर केलाच असणार. शाळेतली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आणि त्यांनी पालकांचं डोकं उठवू नये म्हणूनही या काळात अनेक शाळा, कॉलेजेसनी झूम मीटिंगच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचा मार्ग अवलंबला होता.
पण कोणतंही तंत्रज्ञान जेवढं चांगलं असतं, तेवढंच वाईटही असतं. म्हणजे तंत्रज्ञान वाईट नसतं, माणूस त्याचा वाईट वापर शोधून काढतो. आता झूम मीटिंगचं तंत्रज्ञान अनेक गोष्टी सहज शक्य आणि सुलभ करण्यासाठी होतं. पण, काहीवेळा त्याचा मोठा धोकाही निर्माण झाला होता… खासकरून शाळकरी मुलांच्या बाबतीत. अशीच एक धक्कादायक गोष्ट आता तुम्हाला सांगणार आहे.
कोरोनाकाळ संपत आलेला असतानाचा सप्टेंबर महिना सुरु होता. मुंबईतल्या एका शाळेत शिकणार्या सायलीने दहावीत उत्तम मार्क्स मिळवून अकरावीत प्रवेश केला होता. मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता. कोरोनाकाळ संपत आला असला तरी अजून सावधगिरीचे उपाय योजले जात होते. ऑफलाइन क्लासेस सुरू केले गेले नव्हते. ऑनलाईन पद्धतीनेच क्लास सुरु होते.
एका सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन क्लासला सुरूवात झाली. कॉलेजने क्लासची लिंक मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली होती. मुलांनी त्यावर क्लिक करून क्लास जॉईन केला. इंग्रजीचा क्लास सुरु होता. शिक्षक शिकवत होते. अचानक एका मुलाने मॅडम आणि वर्गातल्या मुलींना असभ्य भाषेतील मेसेज पाठवण्यास सुरवात केली. हे सगळे मेसेज चॅट बॉक्समध्ये येत होते. सुरुवातीला हा प्रकार काय सुरु आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, त्यानंतर काही क्षणांत मोबाईलवर एक भयंकर प्रकार सुरु झाला. तो पाहून सगळेच हादरले. मध्यंतरी पाटणा स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर लावलेल्या टीव्हीवर अचानक पॉर्न फिल्म सुरू झाली होती, त्याचप्रमाणे या झूम मीटिंगमध्ये घुसखोरी केलेल्या मुलाने स्क्रीनवर अश्लील फिल्म दाखवण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून सगळेजण अवाक होऊन गेले. आपल्या मोबाईलवर काय सुरु आहे, हे कुणालाच समजले नाही. टीचरने क्षणाचाही विलंब न लावता सरळ झूम मीटिंग बंद करून टाकली.
हा प्रकार भयानक होता. मुलं तशी लहान नव्हती. पण घरात पालकांसमोर हा प्रकार घडल्याने सगळेच ओशाळले होते आणि पालक संतापले होते. काही मुलांच्या पालकांनी याबाबत थेट कॉलेजच्या प्रशासनाकडे तक्रार केली. पालकांच्या दबावामुळे रीतसर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सायबर पोलिसांच्या तपासात हे लक्षात आलं की एका मुलाने त्याचे जिच्यावर एकतर्फी प्रेम होते, त्या मुलीचे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्याच मुलाच्या ईमेल आयडीच्या माध्यमातून लॉगिन करून हा प्रकार केला होता. त्यात ज्याच्या आयडीवरून लॉगिन झाले, त्या मुलाला मनस्ताप भोगावा लागला. पण, शेवटी खरा गुन्हेगार आयपी अॅड्रेसमुळे पकडला गेलाच.
हे लक्षात ठेवा…
झूम किंवा ऑनलाईन मीटिंग सुरु असेल तेव्हा अचानकपणे जर मध्ये कोणती लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. आपल्या ईमेलचा पासवर्ड कोणाशी शेअर करू नका. आपला लॅपटॉप, मोबाइल सार्वजनिक ठिकाणी मेल वगैरे अॅक्सेस करता येणार नाहीत, अशा प्रकारे ठेवा. कोणतीही संशयास्पद अॅक्टिव्हिटी रिपोर्ट करा आणि लॉगआऊट करा.