आपली मुलं आपल्यासारखी होतील, आपलेच गुण घेतील, याचा अनेक आईवडिलांना आनंद कमी आणि धसकाच जास्त वाटतो… का होत असेल असं?
– पल्लवी शाह, अहमदनगर
आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती लेकरांनी केली तर आपण आतापर्यंत लपवलेला खरा इतिहास वायरल होईल याचा धसका आईवडिलांना असू शकतो. तो इतिहास लपवायला आपण कुठल्या परिवाराचे नाही. शिवाय आपला इतिहास कोणी पुसायला आपण मुघल वंशातले नाही याची जाणीवसुद्धा त्यांना असते.
मी काल स्वप्नात रोल्स रॉइसने फिरत होतो. सकाळी जागा झालो तर गाडी गायब. पोलिसांत तक्रार करू का?
– सूरज पांचाळ, रत्नागिरी
पोलीस ठाण्यात तक्रार करा… ठाण्यातल्या किंवा मागाठाण्यातल्या पोलीस ठाण्यात जाऊ नका… काही फायदा होणार नाही (उगाच राजकीय संदर्भ जोडू नका.. स्वप्नातल्याच पोलीस ठाण्यात जावं लागेल, एवढंच सांगायचं आहे.)
काहीजण म्हणतात, बे दुणे पाच… हे कसलं कॅल्क्युलेशन?
– राधा कावितकर, नेवरे
काहीजण नाही, फक्त प्रशांत दामलेच असं म्हणतात.. विचारायला जाल तर लग्नाची गोष्ट सांगत बसतील.
आपल्यावर एखादी मुलगी मरते आहे, हे आपल्याला कळतं कसं? माझ्यावर कुणी मरत असेल आणि मला कळलंच नाही, तर संधी हातातून जायची ना हो!
– विश्वेश कदम, कांजूर
संधीसाधू बनू नका.. संधी गेली तर फक्त साधू बनून रहायची वेळ येईल.. पूजा.. भक्ती.. आरती सोडा, कोणी धूपसुद्धा घालणार नाही.
आपल्याकडे लोक विचारवंत हा शब्द शिवीसारखा वापरतात, ‘विचारजंत’ म्हणून टिंगल करतात. पुरोगामी या शब्दाची ‘फुरोगामी’ अशी टिंगल करतात. आपल्या समाजाला मठ्ठ प्रतिगामी व्हायला आवडत असेल काय?
– राजू देशींगकर, नरसे वाडी
तेच खूप सोप्पं असतं.. त्यांचे विचारवंत त्यांना जेवढं शिकवतात तेवढंच ते करतात… त्या’बाहेर’ विचार करायला त्यांच्या डोक्याच्या ‘आत’ तेवढी जागा नसते.
विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असं संबोधन वापरल्याने त्यांचा सन्मान होईल, असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे. विधुरांसाठी योग्य संबोधन सुचवा.
– रेवा पानसरे, हातकणंगले
करुन सवरून मोकाट पती!
महापुरुषांचा पराभव अनुयायीच करतात म्हणे; पण महापुरुष नसलेल्या सुमार कुवतीच्या नेत्यांचा पराभव कोण करतं? त्यांची संख्या कायम जास्त असते ना, म्हणून विचारलं.
– मेघना कर्णिक, ठाकुर्ली
महाभक्त… अशांचे नेते आणि अशा नेत्यांचे भक्त साधंसुधं काही करत नाहीत. त्यांचं सगळं ‘महा’ असतं. मग त्यांची संख्या लहान सहान कशी असेल. तीही ‘महा’च असणार ना… त्यांना ते ८० टक्के आहेत आणि बाकीचे २० टक्के आहेत असं वाटतं. पण नेमकं ते उलटं असतं. तिथेच गणित फसतं.
‘सोल्जर’ या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये ‘जे’ हे अक्षरच नाही, ‘नॉलेज’ या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये ‘के’ आणि ‘डी’ या अक्षरांचा उच्चारच नाही. इंग्लिश भाषा अशी कशी चमत्कारिक?
– राही शेवते, इस्लामपूर
म्हणूनच मी या भाषेच्या वाटेला जात नाही. कारण माझा चमत्कारावर विश्वास नाही.
‘पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली’ या गाण्यात रेशमा कोण आहे? दोघीजणी एकाच बिछान्यात कवीला मिठी मारून झोपल्या आहेत?
– नाना बोंगीरवार, वर्धा
आपल्याला कविता येते का? त्यात पहाटे पहाटे येते का? पहाटे पहाटे आपल्याला पोटात कळ येते. ती कळ बाहेर नाही आली तर आपल्याला आपल्याच पोटाला मिठी मारावी लागते. मग आपण का दुसर्याच्या बिछान्यात शिरायचं?? आपण बायकोने व्यापून उरला सरला बिछाना बघून पाय पसरलेले बरे.
मला हीरो बनायचं आहे. पण माझ्याकडे ना रूप आहे, ना अभिनय. मी काय करू?
– अयान सुर्वे, महाड
एक काम करा… याऐवजी दुसरा प्रश्न विचारा.