क्रिकेट हा बाळासाहेबांचा आवडता खेळ. त्यांनी अनेक देशीविदेशी खेळाडूंची अर्कचित्रे काढली होती. त्यातली अनेक फटकारे या संग्रहात पाहायला मिळतात. धकाधकीच्या आयुष्यात वेळ मिळाला की बाळासाहेब घरातील आणि कलानगरातील बच्चेकंपनीबरोबर क्रिकेट खेळायला जात. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी चपखल अपेक्षा व्यक्त करणारी, जोरदार कौतुक करणारी किंवा रास्त टीका करणारी व्यंगचित्रे मार्मिकच्या मुखपृष्ठावर काढली आहेतच; पण, अनेकदा त्यांच्या क्रिकेटप्रेमी मनाला तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीवरची संपूर्ण जत्राच क्रिकेटच्या चित्रभाषेत सुचायची आणि वाचकांना अप्रतिम गतिमान, जिवंत क्रिकेटक्षणांची मेजवानी पाहायला मिळायची. क्रिकेटच्या खेळाचा सगळा डौल अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने परफेक्ट पाहायला मिळायचा त्यांच्या चित्रांत आणि समकालीन वास्तवावर चरचरीत टिप्पणीही असायची. त्यांच्या या जत्रेच्या शेवटच्या चौकटीत मात्र कायम ‘रन आऊट’ होणारा सर्वसामान्य माणूस असायचा मानसपुत्र काकाजींच्या रूपात.