उन्हाळा आला आहे आणि आंब्यांची प्रतीक्षा संपली आहे! परीक्षा संपल्या आणि सर्वात महत्त्वाचा ‘आंब्याचा हंगाम आला!’ आंबे-आंबे-आंबे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू? आपल्यापैकी बहुतेकांना आंबा आवडतो ना? आंबा आवडत नाही असा माणूस सापडायचा नाही. फळांचा राजा कोणालाही आवडणारच. मी तर आंब्याचा प्रचंड चाहता आहे. मी वर्षभर फक्त तो सुंदर सुगंध अनुभवण्यासाठी, रसदार आंब्याचा गर खाण्यासाठी आणि त्या चमकदार सोनेरी हापूस आंब्यांची वाट पाहतो. कारण फळांचा राजा आंबा आणि ‘आंब्यांचा राजा हापूस’ असं आपलं मत आहे बुवा. तुमचंही असेलच. गोव्यातल्या लोकांना त्यांच्या मानकुरादचं कौतुक आहे, कर्नाटकातल्या लोकांना लालबाग प्रिय, उत्तर प्रदेशातले लोक लंगडा-दशहरीचे चाहते… हे सगळे आंबे बेस्टच असतात. पण, आपल्याला सर्वात जास्त आवडतो तो हापूस!
या सीझनमध्ये आंबा खाल्लाच पाहिजे. आंब्याचे फार फायदे असतात. कोणी विचारलं, तर लगेच सांगा सगळी माहिती!
आंब्याचे शास्त्रीय नाव काय आहे? त्याला ‘मँगिफेरा इंडिका’ म्हणतात. पिवळे, केशरी, गुलाबी झाक असलेले, हिरवट लाल अशा विविध रंगामध्ये आंबे दिसून येतात. आंबा हे उष्ण कटिबंधीय फळ आहे. जे काही विशिष्ट परिस्थितीत उपलब्ध होते. आंबा खाल्ल्याने ताजेतवाने वाटते, तोंडाला चव येते. सर्व फळांप्रमाणे याचे पौष्टिक फायदे देखील आहेत. आंबा अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी देखील आहे, जे केस आणि त्वचेसाठी चांगले आहे. आंब्यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनास मदत करते.
मी लहान असताना सुट्ट्यांमध्ये चाकूने आंबा कापलेला मला आठवत नाही. मात्र कधी कधी आई, बापू (वडील) आणि आजोबा आंबा कापून खायला द्यायचे. लहान असल्याने मी अधाशासारखे आंबे खायचो. आंब्याचा सगळा रस माझ्या पांढर्या बनियनवर पडायचा. बनियन आणि हात चिकट-चिकट व्हायचे. हाताच्या कोपरापर्यंत आंब्याच्या रसाचा ओघळ आलेला असायचा. तो रस मी चाटायचो. मला मज्जा यायची. मात्र असे केल्याने आईचा धपाटा मिळायचा. मी एकावेळी ४-५ आंबे सहज खायचो. माझे आईवडील म्हणायचे, ‘अरे, एकावेळी एवढे खाऊ नको, रात्री जेवल्यावर एखादा खा. मी अगदी दोन वर्षांचा असल्यापासून आंबे खातोय. त्यावेळी मी आंबा खात असल्याचे फोटोही माझ्याकडे आहेत. आता जर मी तशा प्रकारे आंबे खाल्ले तर मला फटकेच मिळतील.
तुमच्या कधी लक्षात आलंय का की आंबा हे एक असं फळ आहे, जे पिकलेले आणि न पिकलेले अशा दोन्ही प्रकारांत खाल्ले जाते. एकाला आपण ‘कैरी’ आणि दुसर्याला ‘आंबा’ म्हणतो. आंबा आपण अनेक प्रकारे खाऊ शकतो. उदाहरणार्थ, कच्च्या आंब्यापासून बनवलेले पन्हे हे माझ्या आवडीचे पेय आहे. काही कैर्या उकडून घ्या, थंड होऊ द्या. त्या सोलून उकडलेला गराचा लगदा काढा. त्यात थोडे मसाले आणि गोड करण्यासाठी थोडा गूळ किंवा साखर आणि चवीपुरते चिमूटभर मीठ घाला. हे मिश्रण तयार झाले की त्यात थंड पाणी किंवा सोडा घाला आणि तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह पेयाचा आनंद घ्या.
आंब्यापासून बनवलेला आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे आमरस. दुपारच्या जेवणात चपातीबरोबर भरपूर आमरस खायचा आणि गारेगार झोपायचं. कसली गाढ झोप येते आमरस खाऊन झोपल्यावर. जाग आली की पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलेला उरलेला आमरस ओरपायचा… मज्जा नी लाईफ.. आमरस तयार करणं पण सोपं आहे बरं का! पिकलेले आंबे घ्या. ते सोलून किंवा पिळून त्यातून रस आणि गर काढा आणि त्यात थोडे मसाले म्हणजे इलायची, सुंठ वगैरे घाला आणि चपात्यांबरोबर हाणा मस्त बिनधास्त.
मला आंब्याचे अनेक पदार्थ आवडतात. तुम्हालाही आवडत असतील. तुम्हाला आठवतात का असे पदार्थ, चला, यादी करायला घेऊ या. आंब्याचे लोणचे, कैरीचे फुटे, मँगो मिल्कशेक आणि बरेच काही. हे सगळे पदार्थ घरच्या घरी बनवता येतात. घरातल्या मोठ्यांना ते बनवायला सांगा आणि त्यात त्यांना मदत करा. भरपूर आंबे खा आणि सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्या.