ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित केला, त्याच रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी मुंबईत पूर्व उपनगरातील घाटकोपर या गुजरातीबहुल ठिकाणी येऊन ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे आणि मुंबईत येणार्याने मराठी शिकलेच पाहिजे असे नाही’, अशा आशयाचे उद्गार काढून आपल्या अकलेचे तारे तोडले, तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहिली नाही.
वास्तविक पाहता सुरेश भैय्याजी जोशी हे या संघटनेतील मोठे व्यक्तिमत्त्व आणि २००९ ते २०२१ या कालावधीत ते संघाचे सरकार्यवाह होते. संघाच्या सरसंघचालकांखालोखाल भय्याजी जोशी यांचे पद होते. परंतु संत ज्ञानोबारायांनी ‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ असे जिचे वर्णन केले आहे, त्याच मराठी भाषेच्या राज्यासाठी मुंबईत १०६ जणांनी प्राणांची आहुती दिली, त्याच महाराष्ट्राच्या राजधानीत भय्याजींनी जे बेमुर्वतखोर वक्तव्य केले, त्यांच्याबद्दल संत तुकोबारायांची ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनि माराव्या पैजारा’ ही ओवी मुखावर आल्याशिवाय राहत नाही.
एक मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तो सहजासहजी नव्हे तर त्यासाठी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, एसेम जोशी, सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, शेख जैनू चांद, अण्णाभाऊ साठे अशा दिग्गज धुरीणांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला नेतृत्व दिले. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे मुखपत्र सुरू केले. त्यात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे शीर्षक देत तर बाळासाहेब ठाकरे हे मावळा या नावाने व्यंगचित्र काढीत. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर यासह ८६५ मराठी भाषिक खेडी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी तडफडत होती. मुंबई इलाखा, मुंबई द्विभाषिक राज्य आणि नंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी वाटचाल करत, खस्ता खात आपल्या महाराष्ट्राला मुंबई मिळाली. १३ ऑगस्ट १९६० रोजी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ हे पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले आणि मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्र नाही हे मार्मिकमधून ठणकावून सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते मार्मिकचे प्रकाशन झाले आणि मुंबईमधील आस्थापनांमध्ये मराठी टक्का किती आहे याचा लेखाजोखा सातत्याने देत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘वाचा आणि थंड बसा’ हे निक्षून नमूद केले. १९ जून १९६६ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेबांनी ‘शिवसेना’ जन्माला घातली. २३ जानेवारी १९८९ रोजी ‘सामना’ हे दैनिक सुरू केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती मार्मिक, शिवसेना आणि सामना हा जबरदस्त त्रिशूळ होता. १९८९-१९९० साली शिवसेना भाजप युती अस्तित्वात आली. याचवेळी शिवसेनाप्रमुखांनी ‘महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी हिंदुत्वाची व्याख्या मांडली. बाबरी पतनानंतर उसळलेल्या दंगलीत शिवसेना आणि बाळासाहेबांनी मुंबई व महाराष्ट्रातील मराठी बांधवांबरोबरच तमाम हिंदुंचे रक्षण केले. मुंबईत राहणार्या गुजराती बांधवांचेही रक्षण केल्यामुळे मुकेश पटेल, मुकेश गांधी, हेमराज शाह आदी गुजराती बांधवांनी बिर्ला मातोश्री सभागृहात बाळासाहेबांचा जाहीर सन्मान करून त्यांना हिंदुहृदयसम्राट हा किताब दिला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाकडे सरस्वती आणि गुजराती बांधवांकडे लक्ष्मी असल्याने दोघांनी हातात हात घालून एकत्र राहिल्यास मुंबई महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे सुस्पष्ट केले.
मराठी आणि गुजराती हे दोन्ही दुधात साखर मिसळावी तसे मिळून मिसळून वागत असतांना, गुण्यागोविंदाने नांदत असतांना दुधात मिठाचा खडा टाकण्याचे तसेच मराठी भाषेवर वारंवार हल्ले करण्याचे प्रयत्न होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून तिला कापून काढण्यासाठी येनकेन प्रकारेण मनसुबे रचले जात आहेत. मतांच्या गलिच्छ राजकारणासाठी विविध प्रकारची प्रलोभने योजनांच्या माध्यमातून लोकांसमोर आणली जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिवसेनेने अनेक वर्षे प्रयत्न केले. महाराष्ट्र विधिमंडळाने ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठपुरावा केला. शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत अनेक वेळा अहमहमिकेने भूमिका मांडली. तरी काहीही निष्पन्न झाले नाही. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांचे मराठीप्रेम अनावर झाले आणि त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. श्रेयासाठी प्रत्येक जण आपापल्या टिर्या बडवू लागला. विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचे पाहताच भाजपच्या निष्ठावंतांनी स्वत:लाच चिमटा काढून अरे, हे कसे काय घडले? अशा प्रश्नार्थक मुद्रा केल्या. उलथापालथ झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले. अजितदादा मात्र ‘जंयच्या थंय’ राहिले.
भावनातिरेकाने भरकटलेल्या, भावनेच्या घोड्यावर भरधाव निघालेल्या सत्ताधार्यांचा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहात नसल्याने वाट्टेल तशी वक्तव्ये, मुक्ताफळे उधळून आपल्या मायभूमित, मायमराठीचे वाभाडे काढण्याचे पाप वाचाळवीर करताहेत. अर्थात त्यांचा उद्धव ठाकरे यांनी कोरटकरला चिल्लर म्हणणार्या देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर भय्या जोशींना चिल्लर म्हणून दाखवावे, अशा अस्सल ठाकरी भाषेत समाचार घेतला असून मुक्ताफळे उधळणार्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यावर वाट्टेल ते बोलणार्यांची कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांत बोलण्याची हिंमत होईल काय? तिथे प्रादेशिक अस्मितेवर कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. तिथे तर हिंदीसुद्धा ताठ मानेने उभी राहू शकत नाही. हे सगळे चोचले मुंबई महाराष्ट्रात चालवून घेतले जातात आणि त्यांना सत्ताधार्यांचे पाठबळ मिळते. २०१४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांवाने सत्तेवर आलेल्यांनी गेल्या अकरा वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मायमराठी यांचा सातत्याने अपमान अपमान आणि अपमानच केला आहे. भगतसिंह कोश्यारींपासून राहुल सोलापूरकरपर्यंत अनेकांनी केलेल्या अपमानाकडे सत्ताधार्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यात भर पडली ती भय्या जोशी यांच्या मुक्ताफळांची. अभिजात मराठी भाषेवर झालेल्या भय्यांच्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेत नतमस्तक होणार्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कथित शागीर्दांकडून निषेधाचा शब्द येण्याची शक्यता अजिबात नाही अशी खूणगाठ मुंबईकरांनी मनाशी बांधली असल्यास नवल नाही. मुंबई महाराष्ट्रात शिवसेनेने मराठीद्वेष्ट्यांच्या विरोधात आंदोलनाची पेटवलेली मशाल धगधगत राहील आणि या वाचाळवीरांना योग्य ती पायरी दाखवून देईल, हे नि:संशय!