‘ही लढाई पक्षीय किंवा राजकीय लढाई नाही. ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. तशी सामाजिक न्यायाचीही आहे…’ १९६६ साली शिवसेना स्थापन झाली, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची एकजूट अभेद्य राखण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी ‘‘मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी, बावन्न कुळी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी हे सर्व भेदाभेद गाडा’’ असे आवाहन केले होते. आजची महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहिली तर त्यात फार काही बदल झाला नाही. उलट गेल्या दहा वर्षांत जातीय व धर्मांध, गुंड शक्तीचा धुडगूस सर्वत्र अधिक वाढलेला आहे. आज ते आवाहन पुन्हा करण्याची गरज आहे.
भाजपा सत्तेत आल्यापासून हिंदुत्वाचे फेक नॅरेटिव्ह पसरवून जाती-धर्मात तेढ निर्माण करू पाहत आहेत, करीत आहेत. २०१४ सालापासून हा प्रकार सुरू आहे. आधी ‘एक देश – एक निवडणूक’ आणि आता ‘एक देश – एक भाषा’ अशी घोषणा करून उत्तर-दक्षिणेकडील राज्यात एकामेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतरही काही अहिंदी प्रदेशांवर हिंदी भाषा लादून भाषिक तेढ निर्माण केली जात आहे. देशातील सर्व भाषांना इतिहास आहे, भाषेत विविधता आहे. तरी हिंदी भाषेची सक्ती करून काही प्रदेशांतील स्थानिक भाषेला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न होत आहेत. त्या स्थानिक भाषेच्या अस्मितेला डिवचले जात आहे. हिणवले जात आहे. असाच एक प्रयत्न दहा दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या संदर्भात मुंबईमध्ये घडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईतील घाटकोपर या उपनगरातील एका कार्यक्रमात ‘‘मुंबईच्या घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत राहणार्या प्रत्येकाला मराठी येणे गरजेचे नाही,’’ असे संतापजनक विधान केले. त्यांच्या विधानानंतर मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणूस खवळला. भय्याजींवर चौफेर टीका झाली, निषेध झाला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘मुंबई-महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे’’ असे विधिमंडळात सांगितले, पण इतरांप्रमाणे भय्याजींनी केलेल्या मराठी भाषेच्या अपमानाचा निषेध केला नाही.
हे भय्याजी मराठीच आहेत, परंतु ते इंदूरचे असल्याने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची त्यांना माहिती नसावी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांचे बलिदान हे त्यांना ‘चिल्लर बलिदान’ वाटले असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाषिक व जातीय ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न असू शकतो. कारण रा. स्व. संघ आणि भाजप हे दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस निवडणुकांचाच विचार करीत असतात. निवडणूक लढाईच्या मानसिकेतून अशी बेताल वक्तव्ये संघ-भाजप नेते करतात. या विकृत मानसिकतेविरुद्ध महाराष्ट्राला पुन्हा लढावे लागेल. या वक्तव्यावर भय्याजींनी माफी मागितली नाही. पण मुंबई-महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी माणूस हे मराठी भाषेच्या अपमानाचे वक्तव्य विसरणार नाही. त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मराठी भाषिकांनी लढाईसाठी सज्ज राहिले पाहिजे.
महाराष्ट्राचे एक मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच मटण दुकानाच्या मल्हार सर्टिफिकेटवरून दोन धर्मात द्वेष पसरवण्याचे उद्योग चालवले आहेत. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटन घ्यावे असा फतवा त्यांनी काढला आहे. हलाल आणि झटका यावरून महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम वाद पेटवला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे राणेपुत्र मुस्लीमधर्मीयांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे/वक्तव्ये करून स्वतःची ‘नवहिंदूरक्षक’ अशी प्रतिमा निर्माण करीत आहेत. त्यांचे दुसरे अज्ञानमूलक विधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुस्लीम सरदार-सैनिक नव्हते. मुस्लिमांना खूष करण्यासाठी हा खोटा इतिहास आमच्या माथी मारला गेला. नितेश राणे, त्यांचे बंधू निलेश राणे आणि वडील नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना निधर्मवादी ढोल नेहमी बडवायचे, भाजपाच्या हिंदुत्वाविरोधात बेंबीच्या देठापासून बोंबलत त्यावर ‘प्रहार’ करीत होते. तेव्हा कुठे गेले होते यांचे प्रखर हिंदुत्व? ‘ज्याच्या हातात गूळ-खोबरं त्याच्या नावानं चांगभलं’ ही मंडळी करतात. महाराष्ट्राचे पुरोगामीत्व टिकवायचे असेल तर अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांविरुद्ध एकजुटीने लढले पाहिजे.
महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करण्याची, खोटे-नाटे आरोप करून त्यांच्या शौर्यावर प्रश्न निर्माण करण्याची व चुकीचा इतिहास पसरविण्याची स्पर्धा सुरू आहे. या आरोपांना जातीय रंग दिला जात आहे हे आणखीनच दुर्दैव आहे. नुकतेच नागपूरस्थित कथित पत्रकार डॉ. प्रशांत कोरटकर याने ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकार्यांनी वाचवले, नाही तर शिवाजी महाराज जिवंत राहिलेच नसते,’’ असे मूर्खपणाचे विधान केले. तसेच ब्राह्मणांवर टीका करणे थांबवले नाही तर हिसका दाखवू अशी धमकी दिली, अशी तक्रार इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अधिकार्यांना रितसर लाच देऊन आगर्यातून निघाले असे निराधार, बेताल वक्तव्य केले. शिवाजी महाराज गनिमी काव्याने मिठाईच्या पेटार्यातून, औरंगजेबाची कडक सुरक्षा भेदून बाहेर पडले. या शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमी लेखून भाजपाप्रणित नवइतिहास सांगण्याचा सोलापूकरसारख्यांचा प्रयत्न आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. अशा विकृत माणसांना धडा शिकवावा लागेल म्हणून महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी लढाई सुरू ठेवावीच लागेल.
धारावी पुर्नविकासाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम सुरू आहे. मुंबईचे आर्थिक केंद्राचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. महाराष्ट्र विधानसभा, महायुतीच्या नेत्यांनी पैशाच्या जोरावर जिंकली. येणार्या मुंबई-ठाणे आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पैशाच्या जोरावर जिंकण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा-राष्ट्रवादी (अप) आणि शिंदेसेना पक्षातील खासदार-आमदार, प्रमुख कार्यकर्त्यांना लाभाची पदे व महामंडळावर वर्णी लावून सरकारी तिजोरीची लूट करीत आहे. लाभार्थी आणि पोटार्थींची ही टोळधाड महाराष्ट्राला लुटून कंगाल बनवणार आहे. तेव्हा जातपात, धर्म, राजकीय भेदभाव विसरून मुंबईच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची गरज आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्त्या होऊन शंभर दिवस झाले, तरी देशमुख कुटुंबियांना अजून न्याय मिळाला नाही. परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू संशायस्पद आहे. तेव्हा खाकी वर्दीतील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असा आक्रोश सोमनाथ सूर्यवंशी यांची पत्नी व कुटुंबीय करीत आहेत. त्यांनाही अजून न्याय मिळाला नाही. महायुती सरकारमधील मंत्री गावगुंडांना पोसून महाराष्ट्राच्या भागाभागात दहशत निर्माण करीत आहेत. मुंबईतील संघटित गुंड टोळ्यांपेक्षाही अत्यंत खतरनाक असे हे गावगुंड आहेत. पुणे-पिंपरी, चिंचवडमधील दहशत माजवणार्या टोळ्या, नागपूर-सातारामधील टोळ्या आणि मराठवाड्यातील या गुंड टोळ्यांना सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांकडून आश्रय दिला जातो हे आता लपून राहिलेले नाही. प्रत्येक गावगुंड टोळीचा ‘आका’ मंत्रालयात मंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यामुळे यांना गृहखात्याचा धाक राहिला नाही. महायुती सरकारमधील भाजपाच्या एका मंत्र्याच्या अश्लील चित्रफिती यूट्यूब चॅनलवर दाखविणारे पत्रकार तुषार खरात यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) या तीन पक्षांचे महायुती सरकार जवळजवळ गेली तीन वर्षे सत्तेत आहे. या तीन पक्षांच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. हे आंधळा, बहिरा आणि मुक्याचे सरकार आहे. ‘आंधळ्याची वरात बहिर्याच्या दारात, येड्याचे भांडण मुक्याच्या घरात’ अशी महायुती सरकारची स्थिती आहे. त्यांच्यात एक वाक्यता, एकजूट नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे सर्व स्तरावर नुकसान होत आहे. मुंबई शहरातील गँगवार संपले असले तरी गेल्या तीन वर्षांत सत्ताधारी आमदार-मंत्र्यांनी पोसलेली गावगुंडांची नवी जमात वाढलेली दिसत आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहेच, परंतु त्यांचे भयमुक्त जीवनही संपुष्टात येत आहे. कारण सर्वत्र भ्रष्टाचार, जातीय द्वेष, धार्मिक तेढ आणि दहशतीच्या छायेत सामान्य माणूस वावरताना दिसत आहे. तेव्हा मुंबई-महाराष्ट्राला भाषिक, सांस्कृतिक, जातीय, धार्मिक, गुंड दहशतीपासून मुक्त करण्यासाठी एक चळवळ, लढा उभारावा लागेल.
१९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्रातील जातीय मतभेद गाडण्याचे केलेले आवाहन शिवसेनेच्या चळवळीमुळे व लढ्यामुळे टिकून राहिले आहे. पण गेल्या तीन वर्षांत पैशाची मस्ती व सत्तेचा माज वाढल्यामुळे सत्तेसाठी महाराष्ट्राभिमान गहाण टाकणार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृतीवर घाला घालण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. तेव्हा आता पुन्हा मराठी भाषा व धर्मरक्षणासाठी, तसेच सामाजिक न्यायासाठी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली मराठी माणसाने लढाईसाठी सज्ज रहावे.