पहाटे पहाटे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या धावतपळत घरी आला तेव्हाच मी समजलो की नक्कीच याला काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळाली असणार. आल्या आल्या मला म्हणाला, पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात का रे टोक्या? मी म्हणालो, सव्वा तीन ते साडे चार दरम्यान पडलेली स्वप्नं खरी होतात. निदान ती काहीतरी संकेत नक्की देतात हा अनेकजणांचा अनुभव आहे. असं कोणतं स्वप्न पडलं तुला? त्यावर पोक्याने त्याच्या स्वप्नात संत ज्ञानेश्वर महाराज आले होते, तेव्हा त्यांच्याशी झालेली बातचीत मला सांगितली. ती जशीच्या तशी आपल्या ज्ञानाच्या पाणपोईत अधिक भर घालण्यासाठी…
– दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात।।
– अरे बापरे! संत ज्ञानेश्वर महाराज!!!
– हो. महाराष्ट्राची खबर घ्यायला आलो तुझ्याकडून…
– मी तो पामर महाराज. मी काय खबर देणार! आपण सर्वज्ञानी आहात. आता अभिजात झालेल्या आमच्या मराठी भाषेचा उद्धार आपणच सर्वप्रथम केलात याची जाण आहे आम्हाला. तुमचे ते बोल अजून ओठावर आहेत आमच्या. ‘माझ्या मर्हाटाचि बोल कवतुके, परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।’ वा, ज्ञानेश्वर महाराज वा, वा, पण काही उपयोग नाही त्याचा. कुणालाच जाण नाही या महाराष्ट्रात तुम्हाला असलेल्या मराठी भाषेच्या अभिमानाची आणि तिच्यात असलेल्या सामर्थ्याची. पार वाट लावून टाकलीय इथल्या लोकांनी आपण दिलेल्या संदेशाची.
– काय सांगतोस काय पोक्या! अरे, हल्ली माझंसुद्धा फारसं लक्ष नसतं महाराष्ट्राकडे. परदेशात असलेल्या महाराष्ट्र मंडळांचे मराठी भाषेविषयी चाललेले आदर्श उपक्रम मोठ्या कुतुहलाने पाहत असतो मी. खरंच धन्यता वाटते. अरे, किती मेहनत घेतात ते मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी अस्मिता जोपासण्यासाठी. आणि हे सारं दिखाऊ नाही बरं. अगदी मनापासून असतं ते. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी मराठी शाळाही स्थापन केल्यात त्यांनी. सगळे मराठी सण किती उत्साहाने साजरे करतात ते. पण परवा ज्ञानचक्षूंनी मुंबई डोळ्यांसमोर आणली तर हादरलोच मी.
– हादरणार नाही तर काय? परिस्थितीच आहे तशी. त्या कवी कुसुमाग्रजांनी वर्णन केलेली मराठी भाषा अजून तशीच फाटक्या वस्त्रात आपल्या अब्रूची लक्तरं सावरत उभी आहे कशीबशी!
– अरे वत्सा, पण तिला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय ना तुमच्या केंद्रपती सरकारने.
– नुसता दर्जा देऊन काय उपयोग! तिचे धिंडवडे कसे निघतायत दिवसेंदिवस या महाराष्ट्राच्या राजधानीत ते पाहायला या तुम्ही एकदा अदृश्य रूपाने मुंबईत, पुण्यात.
– येऊन काय उपयोग, मी भगवदगीतेचं मला उमजलेलं ज्ञान संस्कृत या गीर्वाण भाषेतून मराठीत आणलं. पुढे मराठीचा वारसा माझ्या संतमंडळींनी पुढे नेला. सगळ्या जातीपातीतले संत आणि त्यांच्या अनुयायांनी भागवत धर्माची पताका फडकावून जातिभेदांना मूठमाती दिली. मानवधर्म हाच खरा धर्म हे शिकवलं… पण आज मुंबई डोळ्यांसमोर आणली तेव्हा या मराठी माणसाची भाषा नक्की मराठीच आहे का, असा प्रश्न मला पडला. मी तर इतर कुठल्याच भाषेचा अभ्यास केला नव्हता. त्यामुळे मला त्या अवगतही नव्हत्या. भूक लागली म्हणून पुरणपोळीच्या शोधात निघालो तर जिकडे तिकडे पिझ्झा, बिर्याणी, बर्गर आणि काय काय! प्यायचं पाणी बाटल्यांतून विकतात? बाप रे! मी अमृताशी तुलना केलेल्या मराठी भाषेचे इतके विद्रूप अवतार पाहिले की चक्रावूनच गेलो मी.
– नशीब, आणखी थोडा वेळ तिथे काढला असता तर मराठीच्या दुर्दैवाचे दशावतार पाहायलाही मिळाले असते तुम्हाला… आपलेच लोक जबाबदार आहेत या परिस्थितीला. अहो ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही अमृताशी पैजा जिंकणार्या मराठीची महती जगाला सांगितलीत, पण इथे आपल्या अनेक मराठी लोकांनी इंग्रजीचा इतका धसका घेतलाय की मुलांना इंग्रजी शाळेत घातलं नाही तर ती नोकरी न मिळाल्याने दारोदार भीक मागत फिरतील अशी धास्ती वाटते त्यांना. त्यामुळे पोरगं जन्माला आल्याबरोबर त्याचं लाखो रुपयांची देणगी देऊन कॉन्व्हेंट शाळेत बुकिंग केलं जातं. तिथे आपली संतमंडळी आणि मराठीतले पराक्रमी वीरपुरुष फार तर पाच मार्कांपुरतेच परीक्षेत असतात. या मुलांना काय समजणार त्यांचा महिमा! साध्या महापालिकेच्या मराठी शाळेत शिकून जगात आपलं नाव अजरामर करणारी शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांसारखी मंडळी अगदी थोडी आहेत. एकीकडे मराठी शाळा बंद पडतायत, त्याशिवाय गुजरातीसह इतर भाषांची आक्रमणं आहेतच इथे. मुंबई-महाराष्ट्रात राहून दुकानावर साध्या मराठी पाट्या लावण्याची सक्ती केलेली आवडत नाही त्यांना.
– फारच भयानक आहे हे सगळं.
– हे तर काहीच नाही. आपला बहुसंख्य मराठी माणूस आपली पोरं कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो आणि घरात आणि समाजात मराठी बोलतो तेही इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेचं साग्रसंगीत मिश्रण चिवडत. ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही नाक्यानाक्यावरची टपोरी तरुणांची बम्बय्या मराठी भाषा ऐकलीत तर तुम्हाला मुंबईत पाय ठेवावासा वाटणार नाही. मराठी राजभाषा दिनासारखे सोहळे फक्त त्या एका दिवसापुरते दिखावटीसारखे. नंतर बारा महिने मराठी भाषेची विटंबना सुरूच असते इथे. आपल्याला कोणी जाब विचारणार नाही याची पुरेपूर खात्री असल्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह भैय्याजी जोशी घाटकोपरची भाषा गुजराती अशी मुक्ताफळं उधळून मराठी माणसाला डिवचण्याचं महान कार्य करीत असतात. उद्या यांच्या पोशिंद्यांनी गल्लीवार प्रांतरचना केली तरी आश्चर्य वाटायला नको. मराठी भाषेचा कळवळा असल्याच्या नाटकाचे प्रयोग सुरू असतात. ती जगावी, टिकावी म्हणून नि:स्वार्थी वृत्तीने कोणीच काही नियोजनबद्ध कार्यक्रम आखत नाही. मराठी नेते आपापसात जन्मजात वैरी असल्यासारखे भांडत असतात. तशीच मराठी माणसंही. अशा विचित्र परिस्थितीत आपल्या मराठी भाषेला आणि संस्कृतीला कोण तारणार, ते तुम्हीच सांगा देवा!