□ देवाभाऊंनंतर अजितदादांचाही मिंध्यांना धक्का; मिंध्यांकडील आदिवासी, समाजकल्याण खात्याचे सात हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी वळवले.
■ आई कामाख्या देवी! लेकराचे रेडे तुला पसंत पडले नाहीत का? का त्या सोयीने सोयीपुरतेच भक्त झालेल्या स्वघोषित लाडक्या भावाचा आनंद हिरावून घेते आहेस? त्याच्या वेदना, यातना कशा बघवतात आई तुला!
□ ‘आरएसएस’ हे विष – तुषार गांधी यांचे वक्तव्य.
■ सध्या समाजाच्या शरीरात या घातक विषाचा इतका जोर आहे की लोक तुषार गांधींवरच तुटून पडतील, त्यात ते महात्मा गांधींचे नातू, त्यामुळे नेहरुंपाठोपाठ गांधीही ट्रेंडिंग होतील. अर्थात, हे विष उतरलं की समाजमन ताळ्यावर येईल, अशी आशा बाळगण्यापलीकडे समजूतदार माणसांकडे दुसरा पर्याय नाही.
□ बुलढाण्यात पाण्यासाठी बळीराजाचे बलिदान; महायुती सरकारला जबाबदार धरत कैलास नागरे या शेतकर्याने जीवन संपवले.
■ शेतकरी रोज मरत असतात… इथे औरंगजेबाची कबर उकरण्यातून वेळ कुणाला आहे पाण्याबिण्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला!
□ ‘देवा’ची कृपा; बीडच्या निलंबित पोलिसांसोबत न्यायमूर्तींची धुळवड.
■ आणि देशाचे माजी सरन्यायाधीश सांगतात मी कोर्टात दाद मागायला जाणार नाही, कोर्टात न्याय मिळत नाही… त्यांनीही तो केलाच नव्हता, हे मात्र सांगत नाहीत!
□ फडणवीस दिल्लीत म्हणाले, खोक्या, बोक्या आणि ठोक्या सगळ्यांना ठोकणार.
■ सर्व पक्षांमधल्या, असे दोन शब्द त्यांनी आधी उच्चारले आहेत का? नाहीतर पक्षातल्या आव्हानवीरांना, तथाकथित मित्रपक्षांना आणि विरोधकांना रोखण्यासाठीचे नेहमीचे हथकंडे यापलीकडे या विधानांना फार अर्थ नाही.
□ ठाणे महापालिकेत पाच वर्षांपासून लेखापरीक्षणच नाही – भाजप आमदार संजय केळकर यांनी केली चौकशीची मागणी.
■ आता लेखापरीक्षण होऊन तरी काय उपयोग होईल? पाच वर्षे होईपर्यंत ते कशाची वाट पाहात होते? पुढची निवडणूक जाहीर होण्याची?
□ मला बाहेर बोलायचीही आता चोरी झालीय – जयंत पाटील.
■ उगाच भ्रम पसरवत राहणं हे सत्तेतल्या तथाकथित दादा लोकांचं काम आहे आणि रातोरात पक्ष कसे फुटतात हे महाराष्ट्राने नीट पाहिले आहे, त्यामुळे सांभाळून तर राहिलंच पाहिजे जयंतराव!
□ अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मॅजिस्ट्रेटच्या अहवालात दोषी असताना पोलिसांविरोधात गुन्हा का नाही नोंदवला? – हायकोर्टाचा सरकारला सवाल.
■ हे तथाकथित एन्काऊंटर कोणाच्या इशार्याने, कशासाठी केलं गेलं, हे उघड असताना कसा गुन्हा नोंदवला जाईल. मरणारा माणूस नीच होता, या नावाखाली काही महानीचांना संरक्षण दिलं गेलं नसेल, याची या काळात कोण खात्री देणार?
□ सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ; आशीष शिवाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली.
■ अरे अरे, एक आका संपवल्यानंतर महाराष्ट्रातल्या मिर्झापूरची गादी आपल्याकडे येईल, असं दुसर्या आकाला वाटत असावं आणि तोही रडारवर यावा हा बांका प्रसंग आहे.
□ तलावांचे ठाणे बनले कचर्याच्या ढिगांचे ठाणे; राजन विचारे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट.
■ पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याकडे जो एकंदर आनंदीआनंद आहे, तो पाहता परिस्थितीत फार सुधारणा होण्याची शक्यताच नाही.
□ डोंबिवलीत ‘फेरीवाला हटाव’ मोहिमेचा प्रमुखच फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करताना जाळ्यात सापडला.
■ यात आश्चर्यकारक काय आहे? अख्ख्या देशाचं शासन-प्रशासन या प्रकारेच चालवलं जातं. त्याची नेमणूक नेमकी कशासाठी केली गेली असेल, असं वाटतंय लोकांना?
□ मराठी आलंच पाहिजे असं कुठे लिहिलेय, म्हणणार्या एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचार्याला शिवसेनेने शिकवला धडा.
■ शिवसेना तरी किती धडे शिकवेल? मुळातला धडा मराठी माणसांनी शिकायला पाहिजे आणि मुंबईत सर्वत्र मराठीत बोललं पाहिजे. आपली मुलंच हिंदी झाडणार असतील, तर इतरांकडून काय अपेक्षा करायची?
□ लाडक्या बहिणींना गंडवणार्या सरकारच्या नावाने शिमगा – विधानसभेत विरोधकांचा सभात्याग.
■ या बहिणींची बाजू विरोधकांनी तरी का घ्यावी? पैशांच्या लोभाने त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणार्यांना पुन्हा सत्तेवर बसवलंच ना! त्यांना भोगू द्या त्यांच्या कर्माची फळं.
□ नोकरी हवी तर तमीळ यायलाच हवे – मद्रास उच्च न्यायालयाने चेन्नईत नोंदवले महत्त्वपूर्ण मत.
■ हेच महाराष्ट्रातही झालं पाहिजे, प्रत्येक राज्यात झालं पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचा ठेका इतरांकडेच कशाला? हिंदी पट्ट्यानेही इतर प्रादेशिक भाषा (संस्कृत नव्हे) शिकावी. मग इतरांना शहाणपणा शिकवावा आणि मराठी भय्यांनी तर गप्पच बसावे.
□ विविध योजनांना स्थगिती देणारे महायुतीचेच सरकार – आमदार वरुण सरदेसाई यांचा हल्ला.
■ योजनांना मंजुरी देण्यासाठी त्यांत काही ‘अर्थ’ हवा, तोच नसेल तर स्थगिती येणारच.
□ अर्थसंकल्पात केवळ पोकळ संकल्पांचे बुडबुडे – आमदार मनोज जामसुतकर यांची टीका.
■ ठोस आणि भरीव काही करण्यासाठी तशी मनोवृत्ती हवी, दृष्टी हवी आणि राज्याच्या तिजोरीत पण तशी व्यवस्था हवी.
□ शेतकर्यांना कर्जमुक्ती द्यायला घाबरता काय? डेअरिंग करा – भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर.
■ मुनगंटीवारांना एखादं चांगलं पद देण्याचं तरी डेअरिंग करा… नाहीतर सुधीरभाऊंचं डेअरिंग वाढत जाईल आणि ते तुम्हाला महागात पडेल! बरोबर ना भाऊ?