जीवनाच्या अंगणामध्ये आनंदाचे झाड लावायचे झाल्यास या झाडाच्या बिया कुठे मिळतील हो संतोषराव?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आधी सांगा अशा झाडाच्या बिया मिळाल्या तर त्या लावायला तुमच्याकडे अंगण कुठे आहे? कारण मोकळं अंगण दिसलं की त्याचा विकास करायला द्यायचा, असं पर्व आलंय. पण काही अतिशहाणे लोक त्याला ‘अडाणी’पणा म्हणतात… तुम्ही शहाणपणा करून या ‘अडाणी’पणात तुमचं अंगण देऊन टाकलंत तर सगळा ‘आनंदी आनंद’ असेल…
दारू पिऊन रस्त्याने चालणार्यांना अटक करण्याची तरतूद करणारे विधेयक कोणातरी दोनतीन नेत्यांनी मांडले आहे म्हणे विधिमंडळात… यांनी हे विधेयक मांडताना काय प्राशन केलं असेल?
– विनायक देशमुख, पाचोरा
मग काय त्यांनी ‘दारूचे उत्पादनच बंद करा’ असं विधायक मांडायचं? अहो, जर मुळावरच घाव घातला तर हे फांद्या छाटणारे छाटणार काय? त्यांना मांडू दे त्यांना हवं ते विधायक… तुम्हाला प्रश्न विचारायला, आम्हाला उत्तर द्यायला विषय तर मिळतो! राहता राहिला प्रश्न त्या दोन-तीन नेत्यांनी काय प्राशन केलं असेल? तर ते दोन-तीन नेते ‘ज्यांच्या’ ओंजळीने काय काय पितात, त्यांनाच विचारावं लागेल की त्यांनी त्या दोन-तीन नेत्यांना नक्की काय पाजलं होतं? (लोकसभा असो की विधानसभा… तिथे मांडली जाणारी विधेयकं, कोणीही विधायक स्वतःच्या डोक्याने मांडत नाही असं राजकीय विश्लेषक म्हणतात… म्हणून आम्ही पण म्हटलं.)
महिला दिनाच्या दिवशी बायकोला क्रिकेटची बॅट भेट दिली ते चूक झालं, असं माझा मित्र गण्या सांगत होता… असं त्याला का वाटलं असेल?
– सायमन रॉड्रिग्ज, कल्याण
तुमच्या गण्याचा त्याच्या लग्नानंतरचा पहिलाच महिला दिन असेल… त्याने बायकोला लाडाने क्रिकेटची बॅट भेट दिली असेल… नेक टू नेक मॅच झाली असेल.. आणि तुमच्या गण्याला कळलं असेल की अंपायरच्या हातात बॅट देत नाहीत! गण्याने त्याची चूक तुम्हाला सांगितली, पण म्हणून तुम्ही तुमच्या चुका त्याला सांगू नका… तुमचा गण्या तुमच्या चुकांचा व्हिडिओ बनवेल… फोन रेकॉर्ड करेल, फोटो काढून ठेवेल… आणि कधीतरी ते व्हायरल होईल… झालं ना काळजात ‘धस’?.. (प्रत्येक गण्या दिसतो तसा नसतो… आणि तो स्वत:च्या चुका सांगत नसतो… तर तो आपल्या लोकांचा डाटा सेव्ह करत असतो. हल्लीच्या दिवसात कुठलीही गोष्ट नॉर्मली घेऊ नका. जसा आम्ही तुमचा हा नॉर्मल प्रश्न नॉर्मली घेतला नाही.)
आपल्या पंतप्रधानांनी सगळ्या देशवासीयांना रीलस्टार बनण्याचा संदेश दिला आहे… तुम्ही हे राष्ट्रकार्य कधी सुरू करताय?
– मोहिनी कांबळे, वाशीम
आम्हाला असं का वाटतं की तुम्ही हा प्रश्न तिरकसपणे विचारलायत? तसं असेल ना तर पंतप्रधानांचा संदेश तुम्ही तेव्हाच गंभीरपणे घ्याल जेव्हा प्रत्येक देशवासियांच्या खात्यात १५ लाख रुपये येतील. आणि तेव्हा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून त्याची रील बनवू.
एक क्षण भाळण्याचा, बाकी सगळे सांभाळण्याचे असं व. पु. काळे म्हणाले आहेत… तुमचा पर्सनल अनुभव काय?
– महेंद्र गोंधळे, लातूर
गोंधळे तुम्ही असे गोंधळलाय का? प्रत्येकाचा हा अनुभव असतो… फक्त काहीजण संभाळतात, काही जण पश्चाताप करत असतात… (आमचा आनंद याच्या मधला आहे) भाळतात मात्र सगळेच. तुम्ही कधी भाळलाच नसाल, तर एकदा चेक करून घ्या… म्हणजे, नक्की व. पु. काळे म्हणालेत की कोण म्हणालेयत, ते चेक करून घ्या हो…
जुन्या काळातली मढी, कबरी आणि थडगी उकरण्यातून कोणाला कसला आनंद मिळतो? त्यातून काय सिद्ध होतं?
– विनायक जोंधळे, घोटी
मग काय त्यांनी गवत उपटायचं… (कबरी आणि थडग्याच्या आजूबाजूला वाढणारं.) आपल्या वाडवडिलांनी कबरी आणि थडगेवाल्यांना विरोध केला, तेच आपल्या वाडवडिलांचे महान कार्य आपण वंशपरंपरेने चालू ठेवलेय, याचा आनंद त्यांना होत असेल. आणि सिद्ध काय होतं? असं विचारलयत तर विचार करा, या त्यांच्या महान कार्यातून, त्यांच्या पूर्वजांनी कबरी आणि थडगेवाल्यांना कायम विरोध केला होता, हे सिद्ध नाही का होत? ज्यांना विरोध केला, त्यांच्या कबरी आणि थडगी झाली, पण ज्यांनी विरोध केला, त्या पूर्वजांची मात्र राख झाली, याचा त्रास बिचार्यांना होत असणार ना, हे समजून घ्या ना!