मुख्यमंत्री फडणवीस
गोंजारून दाढी त्यांची
शेपटाला मग लावू आग
माकडछाप चेले त्यांचे
होईल त्यांची भागंभाग
इथे हुकूम माझाच चालेल
भ्रष्टाचार्यांना नाही थारा
काहीजणांना सावरून घेऊ
विटेपेक्षा दगड बरा
याचा अर्थ असा नाही
वाटेल ते मी सहन करीन
शिंदे-पवार गटच बदनाम
एकेकाची मुंडी धरीन
—————
अजित पवार
संकल्पाला नाही अर्थ
सगळा केवळ भुलभुलैय्या
आकड्यांच्या सर्व थापा
जनता करूदे ताताथैय्या
माथ्यावर कर्जाचा डोंगर
राज्याचा हा पिचला कणा
कोलमडून पडतानाही
हसत हसत पड म्हणा
अक्कल माझी पाजळताना
व्यवहाराचे सुटले भान
कसला अर्थ सगळा अनर्थ
जनतेची तर कैचीत मान
—————
एकनाथ शिंदे
खाते माझे, चमचा त्यांचा
का ढवळता विनाकारण
माझा गाळ मला प्यारा
त्याला जपणे माझे धोरण
मीही होतो मुख्यमंत्री
तुमच्यासारखे नाही केले
तीन तीन महिने मित्रासाठी
जाणून बुजून डोळे मिटले
कधीतरी या लाडक्या बहिणी
दाखवतील तो माझा हिसका
कळून चुकेल जगालाही
तुमचा बारही होता फुसका
—————
धनंजय मुंडे
सुंभ जळला, पीळ नाही जळला
पीळाचाही करीन फास
वाल्मीक फाशी जाण्याआधी
जमेल त्यांचा घेईन घास
गेंड्यापेक्षा कातडी माझी
लोखंडाचा आहे रबर
पत्र्याचेही काळीज माझे
त्याला नाही फुटत पाझर
प्रेम, करुणा, दया-माया
माझ्या जगात नाही स्थान
क्रूरकर्मा वाल्मीकसारखा
मित्र माझा किती महान
—————
जनता
राज्यात सारी अंदाधुंदी
नाही कुणाचा कुणास मेळ
नेते सारे महायुतीचे
स्वार्थाची ते खाती भेळ
खून, बलात्कार, अत्याचार हे
हेच आहे आमचे जगणे
रोज अपघात, रोज दरोडे
अगदी स्वस्त झाली मरणे
खोट्या नाट्या युक्त्या करून
लबाड बनले सत्ताधारी
निसर्गाला नाही मान्य
देई प्रचिती वरचेवरी