‘गाबेल्स हा एक असत्य बोलणारा महापुरुष (?) होऊन गेला. कोणतीही गोष्ट पुन्हा-पुन्हा असत्य सांगितली की लोकांना ती खरी वाटते, हा त्याचा सिद्धांत होता. या जगातील सत्य संपवण्याचा त्याने विडा उचलला होता. अखेर गोबेल्सचे निधन झाले. पण जाता-जाता त्याने अनेक गोबेल्स निर्माण केले. त्यातीलच काही गोबेल्सची भुतावळ भारतीय जनता पक्ष आणि गद्दार शिरोमणी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रात वावरत आहे. रोज सकाळी उठून, ‘शिवसेना’ पक्ष संपला, आज २० आमदार आहेत, त्याचे दोन कधी होतील ते कळणार नाही, शिवसेनेचे सहा खासदार लवकरच शिंदेसेनेत दाखल होणार, अनेक माजी आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवक आदी शिंदेसेनेत लवकरच सामील होतील, अशी आवई ते उठवतात. केंद्रात आणि राज्यात भाजपाप्रणित एनडीए सत्तेत आल्यामुळे मीडियातही अशा गोबेल्सनीतीच्या बातम्या देऊन स्वत:चा टीआरपी वाढवून घेतात. सत्ताधार्यांनाही अशा बातम्या पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करायचा असतो. पण निष्ठावंत शिवसैनिकांकडून अशा गोबेल्सनीतीला आपल्या कार्यातून सणसणीत चपराक दिली जाते. मनगटावर शोभेसाठी नाही तर शिवसेनेवरील अढळ प्रेमासाठी म्हणून शिवबंधन बांधले जाते. ते निष्ठेचे शिवबंधन कुणीही तोडू शकत नाही. कारण शिवबंधन बांधलेल्या मनगटात ताकद असते. ती शिवसेनेवरील निष्ठेच्या शिवबंधनाची ताकद काय असते हे आपल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकाळात विविध समाजोपयोगी, लोकोपयोगी, लोकाभिमुख कार्य करून अडीच वर्षांच्या काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्य अहवालातून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यात शिवसेना रुजवण्यासाठी व वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक शिवसैनिकांपैकी एक ‘शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता’ असा यशस्वी सामाजिक व राजकीय प्रवास झालेला निष्ठावान, अभ्यासू आणि आक्रमक शिवसैनिक म्हणजे अंबादास दानवे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात एक सर्वसामान्य शिवसैनिक, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता म्हणून गेली ३०-३५ वर्षे शिवसेनेत काम करत असताना अंबादास दानवे यांनी शिवसेना पक्ष हा एक विचार असून त्याच्या शिवबंधनातच राहणे ही सच्च्या व निष्ठावंत शिवसैनिकाची ओळख दाखवून दिली. जून २०२२मध्ये शिवसेनेतील गद्दारांनी शिवसेना पक्ष फोडला. मराठवाड्यातील पाच आमदार स्वार्थासाठी शिंदे यांच्याबरोबर गेले. पक्षनिष्ठेशी बेईमानी करणारे साथीदार सोडून गेले असताना खचून न जाता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत दौरा करून शिवसैनिकांची एकजूट भक्कम राखण्यासाठी दानवे यांनी प्रयत्न केले. त्यांच्यातील अष्टपैलू नेतृत्त्वाचे गुण पारखून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नऊ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. मग दानवे यांच्यातील शेतकर्यांच्या, वंचितांच्या आवाजाला अधिक धार आली आणि कणखर नेतृत्वाचा कसही लागला. तो महाराष्ट्राने पाहिला.
अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षण, शेतकर्यांचे प्रश्न, कापसाचा हमीभाव, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, पंचामृत नावाखाली सादर केलेल्या अर्थसंकल्पातील त्रुटी, अर्थव्यवस्थेतील नियोजनाचा अभाव, राज्यातील महापुरुषांचे अवमान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न, उद्योग विभागाची श्वेतपत्रिका, महिलांवरील अत्याचार, फसवी जलयुक्त शिवार योजना, मुंबई शहराचे बिघडलेले नागरीकरण, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन करत असलेला भ्रष्टाचार, नैना प्रकल्पातून शेतकरी आणि भूमिपुत्रांवरील अन्याय, पंढरपूर कॉरिडॉर प्रश्न अशा अनेक विषयांची वास्तविक आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यात मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेले त्यांचे भाषण विशेष गाजले. त्याचबरोबर लोकपाल विधेयक, महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, महाराष्ट्र कामगार सुधारणा विधेयक, उपेक्षितांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनावर दबाव टाकला. मेळघाट येथील दौर्यामधील त्यांचे अनुभव तर विदारक होते. तिथल्या वस्तुस्थितीची जाणीव त्यांनी महाराष्ट्रासमोर त्यांच्या अनुभवातून करून दिली.
अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्य अहवालाचे प्रकाशन करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या पक्षनिष्ठेचे उदाहरण दिले. ‘‘कथित भ्रष्टाचारांच्या आरोपाप्रकरणी एका वर्षांनंतर सूरज यांची जेलमधून सुटका झाली. तो झुकला नाही. भाजपाकडे किंवा मिंध्यांकडेही जाऊ शकला असता. पण तो गेला नाही. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तसा तो दिल्लीचेही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा. सगळेच तुमचे गुलाम होणार नाहीत, ते महाराष्ट्राच्या रक्तात नाही, हे शिवसेनेने दाखवून दिले. जे वाट चुकले आहेत, त्यांना वाटते की एकाच मार्गाने गेले की आपल्याला मोक्ष मिळतो. पण महाराष्ट्रावर अन्याय करणार्याला मोक्ष मिळणार नाही. तर त्याचा काय तो सोक्षमोक्ष शिवसेना इथेच लावेल.’’ काहींना मनगटे भाड्यावर घ्यावी लागतात आणि त्यावर ते शिवबंधन बांधून दाखवतात. हे स्वार्थाचे शिवबंधन असते. ते निष्ठेचे शिवबंधन नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून मानणार्यांच्या मनगटावरच निष्ठेचे शिवबंधन शोभते, अभिमानास्पद वाटते. अहवालाच्या मुखपृष्ठावर दानवे यांच्या शिवबंधन बांधलेल्या हाताचे चित्र आहे. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवबंधन ज्याच्या हाती तो शिवसैनिक कधीच इकडेतिकडे जाऊ शकत नाही. लढण्यासाठी तलवार लागते, तलवार पकडायला मजबूत मनगट लागते आणि त्याहीपेक्षा ती पकडायला घट्ट मन लागते. नाहीतर तलवार आहे, पण चालवण्याची हिंमत होत नाही, असे म्हणत उद्धव यांनी शिवसेनेशी गद्दारी करणार्यांवर निशाणा साधला. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांची मने मेली आहेत, फक्त गट राहिले आहेत. आपण तलवार कुणावर चालवत आहोत हेच त्यांना कळत नाही. अशावेळी शिवसेनेसोबत राहिलेल्या शिवसैनिकांचे कौतुक करावेच लागेल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे सहा खासदार फुटणार, या काही वृत्तवाहिन्यांच्या खोडसाळ बातमीला उत्तर म्हणून, सर्व खासदारांनी शिवसेना लोकसभा गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांच्या उपस्थितीत हजर राहून, ‘हम सब एक है’ हे दाखवून निष्ठेची फुले उधळली. आपली अढळ निष्ठा शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे, हे दिल्लीश्वरांना आणि महाराष्ट्राला दाखवून दिले.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहेतर, जीवा महाला, शिवा काशिद आदि सरदारांनी आणि मावळ्यांनी स्वतः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे राहून प्राणाची पर्वा न करता शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले आहेत. ते त्यांच्यावर असलेल्या स्वामीनिष्ठेमुळेच! हा निष्ठेचा इतिहास महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रात जसे गद्दार निपजले तसे निष्ठावंतही जन्मले.
निष्ठावंतांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन सच्चा शिवसैनिकाने निष्ठेचा अंगार फुलवत ठेवला पाहिजे. शिवबंधनधारी शिवसैनिक कधीच इकडेतिकडे जाऊ शकत नाही तो आजही मूळ शिवसेनेबरोबर आहे. कारण ‘शिवबंधन’ हे कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणार्या निष्ठावान शिवसैनिकाची खरी ओळख आहे.