महाराष्ट्राचे माजी मंत्री चिंबोरीसम्राट डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मुलाने केलेल्या विमानप्रवासाचे थरारनाट्य ऐकून माझ्याप्रमाणे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याही चक्रावून गेला. मी तातडीने तानाजीरावांची मुलाखत घेऊनच येतो असे म्हणून तो निघाला आणि मुलाखत घेऊन परत आलासुद्धा. तीच ही मुलाखत.
– नमस्कार तानाजीराव सावंतसाहेब.
– नमस्कार. तू कशाला आलायस हे न समजण्याइतका मी मूर्ख नाही. पण मला हे चिंबोर्यांचं सूप पिऊ दे, नंतर विचार मला काय विचारायचं ते. तुझ्यासाठीही मागवतो हवं तर. तब्येतीला खूप चांगलं असतं.
– थँक्यू. पण मला नको. कालपासून जरा पोट बिघडलंय.
– मग हरकत नाही. आता विचार काय विचारायचं ते.
– तुमचा अपहरण न झालेला मुलगा परत आला याबद्दल तुमचं अभिनंदन.
– अरे, खालपासून वरपर्यंत फिल्डिंगच अशी लावली होती की माझ्या कचाट्यातून हा दिवटा सुटणं शक्यच नव्हतं.
– त्याला दिवटा काय म्हणता! तुमच्यापेक्षा बुद्धीने हुशार आहे तो. शिवाय धाडसीही आहे. आम्ही आमच्या बापाला इतकं घाबरायचो की त्याला न विचारता नाक्यावर जायचीही हिंमत नव्हती. आणि तुमचा मुलगा तुम्हाला न विचारता बँकॉकला जाणार्या खासगी विमानाचं बुकिंग करतो म्हणजे तो नक्कीच ग्रेट असला पाहिजे.
– कसला ग्रेट? बापासमोर उभं राहायला हिंमत लागते. एवढा मोठा घोडा झाला तरी मी दम दिला तर कापतो.
– मला खरंच सांगा, त्या दिवशी घरात काही भांडण वगैरे झालं होतं का? तुम्ही त्याला काही बोलला होतात का? त्याशिवाय तो तुम्हाला न सांगता बँकॉकच्या प्रवासाला जाणं शक्यच नाही. तुम्ही त्याच्यावर कायम लक्ष ठेवायला हवं होतं.
– हे बघ, घरात आत तसंच बाहेर पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पण या शहाण्याने घरातून जाण्यापूर्वी त्या सर्व
कॅमेर्यांवर न दिसतील अशा कापडी पट्ट्या चिकटवल्या होत्या. तो कधी निघून गेला हे कळलंच नाही. चार पाच तास झाले तरी हा घरात न दिसल्यामुळे मी सर्व नोकरचाकरांना बोलावून सार्या घराची झडती घेतली. मग मात्र त्याचं कुणीतरी पैशासाठी अपहरण केलं असावं हा माझा संशय पक्का झाला. त्या दृष्टीने स्वत: डिटेक्टिव्ह बनून तपासाला सुरुवात केली.
– तुम्ही! आणि डिटेक्टिव्ह!!
– अरे, शाळेत असल्यापासून हेरकथांची पुस्तकं वाचण्याचा मला छंद होता. अगदी अगाथा ख्रिस्तीपासून बाबुराव अर्नाळकरांपर्यंत सगळ्यांंच्या हेरकथा-कादंबर्यांची पारायणं केलीत मी. अखेर मुख्यमंत्र्यांना फोन केला. पुन्हा गृहमंत्री म्हणून त्यांना दुसरा फोन केला. त्यानंतर मी मास्क लावून आणि कमरेला पिस्तुल लटकावून जातीने पोलीस ठाण्यात गेलो. त्यांना केंद्रीय हवाई मंत्र्यांना फोन लावायला सांगितला. मग त्या मंत्र्यांनी बँकॉकच्या हवाई मंत्र्याला फोन केला. त्याने दुबईच्या हवाई मंत्र्याला फोन केला.
– पण तुम्हाला कसं कळलं तो बँकॉक किंवा दुबईच्या फ्लाईटसाठी गेलाय तो.
– मला किरीट सोमय्याजींचा त्या आधी फोन आला होता. ते पण माझ्यासारखे डिटेक्टिव्हच आहेत. किती नेत्यांना त्यांनी ईडीचे चटके दिलेयत. ते म्हणाले, माझ्या मोबाईलवर त्याने बँकॉकला जाणारं विमान पकडल्याचं सीसीटीव्ही फुटेज आलंय. मग मात्र मी पुन्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस साहेबांना फोन लावून हा दिवटा बँकॉकला जाणार्या विमानात बसल्याचं सांगितलं. तेव्हा तेच म्हणाले की, मला ते आधीच कळलं होतं आणि त्याला परत आणण्यासाठी मी मोदीसाहेबांना प्रâान्सला फोन करून देशाची सारी यंत्रणा त्या कामी लावली आहे. त्या विमानात असलेल्या आमच्या माणसांनी विमान हायजॅक करून पुण्याला आणण्यात यश मिळवलंय. आता थोड्याच वेळात तो विमानातून बाहेर येईल… हे कळल्यावर माझा जीव मोठ्या भांड्यात पडला.
– अहो, पण यात सरकारचे चौर्याऐंशी लाख रुपये खर्ची पडले त्याचं काय?
– माझ्यासारख्या नावाजलेल्या माजी मंत्र्यासाठी आजी सरकारने एवढा त्याग केला यावरून मी किती महत्त्वाचा माणूस आहे हे तुझ्या लक्षात आलंच असेल.
– नंतर घरी आल्यावर तुम्ही त्याची कडक हजेरी घेतलीत की नाही?
– मी असा तसा सोडतो की काय त्याला? चांगली हजामत केली. अगदी बिनपाण्याने.
– हे तुम्ही बरोबर नाही केलं. कसंही असलं तरी तुमच्या पोटचा गोळा आहे तो. आता एकदा त्याला माफ करा. पुन्हा नाही करणार असं काही तो.
– अरे, माझ्या अब्रूचा चोळामोळा केला त्या एका दिवसात त्याने. त्याचं काय! आतापर्यंत बघ, किती लोकांनी माझी टोपी उडवणार्या कसल्या कसल्या कॉमेंट्स केल्यात ते, एकाने तर ‘आया सावंत घुमके’ या नवीन चित्रपटाची घोषणा करून दिग्दर्शक तानाजी सावंत असं माझं नावही जाहीर केलंय. दुसर्याने तर त्याच शीर्षकाचा लेखही एका वृत्तपत्रात लिहिलाय. त्यांचा इंट्रोच बघ, ‘श्रीमंत बापाचं बिघडलेलं पोरगं ते. कंटाळा आला त्याला भारतात काबाडकष्ट करून, तसा काही दिवसांपूर्वीच जिवाची दुबई करून आला होता’. पण म्हणून काय झालं? श्रीमंत बापाच्या पोराला कंटाळा येऊ नये असा कुठे नियम आहे? सावंतांच्या ऋषीलाही आला कंटाळा. मग काय, त्याने एका खासगी विमान कंपनीला फोन लावला. कंपनी मालक म्हणाला, सदुसष्ट लाख रुपये लागतील. ऋषीने काढले बॅगेतून पैसे अन फेकून मारले त्या कंपनी मालकाच्या तोंडावर. म्हणाला, ‘मेरे बापके पास बहोत पैसे हैं! लागू दे कितीही लागतात ते…’ अशी कमेंट केलीय त्यात.
– अरे बापरे! आता ते किरीट सोमय्या किरकिर करत लावतील तुमच्या पाठी ईडीचा दट्ट्या. मग टाकतील जेलात चक्की पिसिंग पिसिंग करायला…
– खरं आहे रे खरं आहे. लबाड वाटच पाहात होते माझा पोपट करायची. पण या थरारनाट्यामुळे माझं आणि मुलाचं नाव आता गिनीज बुकात गेलंय याचा अभिमान आहे मला!