नॉर्दर्न लाइट्स पाहून परतल्यावर गैरसोय नको म्हणून काही तासांसाठी घेतलेल्या एअरबीएनबी घरातून आम्ही सकाळी कॅफेमधून नाश्ता करून निघालो ते आमच्या मुख्य एअरबीएनबी घराकडे. तो सार्वजनिक बसमधला प्रवास मजेशीर झाला, कारण होते दिवसाउजेडी होणारी हिमवृष्टी. मला तर पाऊस आणि हिमवृष्टी बाहेर न पडता खिडकीतून, घरातून बघायला आवडते. एका शाळेशेजारी दोन रेनडियर बघायला मिळाले. बसमधून उतरल्यावर, पायाचा तळवा रुतून बसेल इतक्या साचलेल्या बर्फातून चालताना जबरदस्त मजा आली. फोटोसेशन तो बनता है ना! २०/२५ मिनिटांच्या अंतराच्या पायी प्रवासाला एक तास कसा गेला तो कळलाच नाही.
हा दिवस आम्ही रेनडियर सफारी आणि त्यांचा सांभाळ करणार्या सामी लोकांसाठी राखून ठेवला होता. कालच्या बसचालकाने मला खूपच आत्मविश्वास दिला होता. मग काय, त्या धुवांधार बर्फात दुपारी गाडी काढण्याचा मोह आवरला नाही आणि परत सिटी सेंटरला निघालो आणखी एक बस टूरसाठी. जी आधी कार मला रणगाड्यासारखी भासत होती, तीच आता बर्फावरून आणि तुफानी हिमवृष्टीत चालवताना हवेत उडत असल्याचा फील देत होती. कारण होते ते विंटर टायर्स. अशा ड्रायव्हिंगचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
कालच्या सहलीच्या पिकअप पॉइंटशेजारी यांचा पिकअप पॉइंट होता. दीड तासाच्या बसप्रवासानंतर आम्ही चारही बाजूने बर्फाळ डोंगराने वेढलेल्या कॅम्पमध्ये आलो. सर्वप्रथम सामीच्या स्वयंसेवकाने हसून स्वागत करून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्याने रेनडियरला खायला कसे द्यायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यात एक स्टेप अशी होती की जर रेनडियर खाण्यासाठी खूप आक्रमक होत असेल तर बकेट खांद्यावर ठेवावी. का कुणास ठाऊक, यामुळे ८०/९०च्या दशकात विरारमध्ये पाणीटंचाईमुळे माझ्या आईसारख्या असंख्य स्रियांची दुरून पाण्याचा हंडा डोक्यावरून आणि खांद्यावरून नेताना होणारी फरफट आठवली. येथे चारही बाजूने कुंपणाने वेढलेल्या जागेत तुम्हाला जावे लागते, आणि २०/३० रेनडियरमध्ये राहून त्यांना खाणे देण्याचा अनुभव घ्यायचा असतो. बायकोने बकेट (मुद्दाम) माझ्याकडे देऊन स्वतः फोटोग्राफीची जबाबदारी घेतली आणि मला त्या रेनडियरच्या कळपात सोडून दिले. ते दणकट, आमच्या कमरेच्यावर उंची असलेले रेनडियर ती बकेट बघितल्यावर जे धावून येतात, तेव्हा स्वयंसेवकाने सांगितलेल्या सूचना विसरून जायला होते. आपण फटाके तिरके राहून फोडतो, तशी ती बकेट समोर न धरता तिरकस धरायची असते, नाहीतर त्यांची गोलाकार शिंगे तुमच्या हनुवटीचा आणि मानेचा भाग वर उचलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. पण मला रेनडियरचे डोळे मोठे आणि निरागस वाटले आणि बायकोला तो खूपच गोड वाटला.
रेनडियरला खायला दिल्यानंतर कॅम्पमध्ये आम्ही गॅमे या सामी लोकांच्या पारंपरिक घरात एकत्र बसलो. त्या पारंपरिक वास्तूमध्ये अगदी घरगुती आणि आरामदायक फील होता. येथे व्हेजिटेबल सूप, हॉट चॉकलेट आणि कॉफीचा स्वाद घेऊ शकलो. इथे मला सामी लोकांच्या संस्कृतीची आणि इतिहासाची एक खास ओळख झाली. त्यांच्या जीवनशैलीच्या विविध पैलूंवर, त्यांची परंपरा, रेनडिअर पालन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक संरचनेवर आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. सामी लोक हे स्क्वॅडिनेवियाच्या (नॉर्वे, स्वीडन, आणि फिनलंड) उत्तरेकडील भाग आणि रशियाच्या काही भागांचे मूळ आदिवासी लोक आहेत. त्यांची एक सामी राष्ट्रीय संसद आहे. हे सर्व अनुभव खूपच समृद्ध आणि भावनिक होते. सामी लोकांची जीवनशैली त्यांच्या निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे अत्यंत खास आहे.
परतल्यावर एअरबीएनबीच्या घराबाहेर खूप गर्दी दिसली. सिटी सेंटरमध्ये राहणारा घरमालक आणि नवीन भाडेकरू आले होते. एका नवीन व्यक्ती आणि वल्लीशी, सिंगापूरवासी आयरीनशी ओळख झाली (तिच्याविषयी नंतर सविस्तर लिहिणार आहेच). सर्वजण घराच्यावर आकाशात बघत होते. वर नॉर्दन लाइट दिसत होते. ते बघण्यासाठीच घरमालक इकडे आला होता. चक्क मोबाईलमधून लाइट्सबरोबर आमचे फोटो छान आले. ज्या कारणासाठी आम्ही घर घेतले होते तो विचार अखेर सार्थकी लागला, नॉर्वेच्या फियॉर्डमध्ये रेनडियर न्हाले!
फियलहायसन केबल कार
आमच्या सहलीचा पाचवा दिवस. आज दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा दिवस. बायको स्वत:साठी खास साडी आणि माझ्यासाठी कुडता इंग्लंडवरून घेऊन आली होती. तिला दिवाळीच्या मुहूर्तावर यश चोप्राच्या चित्रपटांचे जग बर्फाच्या सान्निध्यात अनुभवायचे होते. इकडे आल्यापासून थंडीपासून बचावासाठी आम्ही तीन चार लेयरचे कपडे घालत होतो, आणि कॉफी नी हॉट चॉकलेट ढोसत होतो; पण हिला साडीची ओढ, तीसुद्धा विंटर जॅकेटशिवाय! माझी काही हिंमत झाली नाही, मी जॅकेट घालूनच बाहेर पडलो. सकाळी थोड्या वेळासाठी बर्फवृष्टी थांबली आणि आम्ही बाहेर आलो फोटो सेशनसाठी! मोजून १५ मिनिटांत वादळ चालू झाले, वारा आणि बर्फाचा जोर वाढला, मग काय, दोघींची तारांबळ उडाली. माझ्याकडे जॅकेटरूपी कवचकुंडले होती, मला काहीच फरक पडला नाही. त्या दोघी मात्र घरात पळाल्या.
आज फियलहायसन शिखरावर केबल कार करून जाण्याचा बेत होता, म्हणून कारवरचा बर्फ साफ करायला घेतला. फियलहायसन केबल कार ही ट्रोम्सोमधील सर्वात प्रेक्षणीय दृश्यांपैकी एक आहे. या शिखरावरून शहराचे आणि पर्वत आणि फियॉर्डच्या परीकथेसारख्या वातावरणाचे अप्रतिम दृश्य दिसते. नशीबवान असाल तर आकर्षक ऑरोरा बोरेअलिस देखील तुमच्या वर नाचताना दिसू शकते! शिखरावर असलेल्या कॅफेमध्ये भेट देऊन, आम्ही स्वादिष्ट हॉट चॉकलेटचा, कॉफी आणि केकचा आस्वाद घेतला. खिडकीतून खालील शहराचे सौंदर्य लाजवाब दिसत होते. फियलहायसन केबल कार हे ट्रोम्सोचे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, हे गर्दी बघून सहज लक्षात येत होते. शिखरावरून बेटे, फियॉर्ड आणि पर्वतांनी वेढलेले पॅनोरामिक दृश्ये अत्यंत अप्रतिम दिसत होती. शिखरावर खूप मोकळी जागा होती आणि काही जण एका टोकावरून दुसर्या टोकावर जोरदार बर्फवृष्टीतसुद्धा चालत जात होते. सह्याद्रीमध्ये जसे धबधब्याचे पाणी किंवा तुषार खाली न जाता कड्यावरून मागे फिरतात, आकाशाच्या दिशेने प्रवास करतात, तसेच इकडे बर्फाचे लोट खालून वर येत होते आणि पुढचे काहीच दिसत नव्हते. मुलगी वाळूत जशी खेळते तशा सहजतेने बर्फात खेळत होती आणि आमचे नाक, डोळे सुन्न पडले होते.
आजच्या केबल कार प्रवासानंतर ट्रॉम्सोची ट्रिप संपली. ट्रोम्सो हे खरोखरच हिवाळ्याचे एक आश्चर्य आहे, जिथे खूप काही अनुभवता येते! बर्फाच्छादित पर्वतांपासून आणि अद्भुत हिवाळी लँडस्केप्सपासून ते रेनडियर किंवा उत्तर ध्रुवीय कुत्रे यांचे स्लेजिंग आणि इतर अनेक अनोख्या हिवाळी उपक्रमांपर्यंत… ट्रोम्सो हे नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हिवाळ्यात ट्रोम्सोला जाणे म्हणजे बर्फाच्या निसर्गसौंदर्यात एक अविस्मरणीय साहस अनुभवण्यासारखे आहे.
दुसर्या दिवशी ऑस्लोला जायचे विमान असल्याने घरी येऊन बॅग भरायची लगबग सुरू झाली. मग मुलीचे प्रश्नाचे फायरिंग चालू झाले.
‘आपण परत एअरबीएनबीमध्ये राहणार आहोत की हॉटेलमध्ये?’ इति मुलगी. (तिला एअरबीएनबी किंवा हॉलिडे होम्स असे काही आवडत नाही. कारण तिकडे सकाळचा नाश्ता घरासारखाच असतो, हॉटेलसारखी विविध पदार्थांची रेलचेल नसते.)
‘ट्रिप मी थोडीच अरेंज केली आहे, आईला विचार,’ माझा एक रन काढून नॉन स्ट्राइकर एंडला जायचा प्रयत्न, जेणेकरून माझ्यावरचा प्रश्नांचा भडिमार दुसरीकडे जावा! तेंडुलकरला जसे शेन वॉर्न पुढचा चेंडू कोठे टाकणार आहे, हे अचूक कळायचे तसे मुलीचे प्रतिप्रश्न काय असणार हे कळायला लागले आहे. आमच्या ह्या संभाषणात बायकोचा सहभाग कोठेच नव्हता. ती ऑस्लो ते फ्लॅमच्या प्रवासाचे हवामान, तापमान बघण्यात गर्क होती. दुर्दैवाने हवामान खात्याने आज आणि उद्या रेड वॉर्निंग जारी केली होती. त्यात ढगफुटी आणि त्यातून आलेल्या पुरामुळे हा रोड आणि रेल मार्ग बंद आज आणि उद्या असे दोन दिवस बंद असणार होते. उद्याचा प्रवास विमानाने ऑस्लोसाठी राखीव होता आणि रात्री विश्रांतीनंतर म्हणजे सहलीच्या सातव्या दिवशी सकाळी आम्ही रोड ट्रिप सुरू करणार होतो. पण ऑस्लो ते फ्लॅमचा प्रवास करू शकणार की नाही, याची मात्र शाश्वती नव्हती. कदाचित ही ट्रिप ऑस्लोला जाऊन संपणार होती.
वेग आणि पर्यावरणाची सांगड घालणारी टेस्ला
आजचा दिवस प्रवासाचा, नॉर्वेच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे. ट्रॉम्सोकडून नॉर्वेची राजधानी ऑस्लोकडे. मुलीची पुस्तकांची छोटी बॅग एअरबीएनबीच्या घरी राहिल्यामुळे संपूर्ण विमानप्रवासात आणि मग ऑस्लो विमानतळापासून ते हॉटेलच्या प्रवासापर्यंत तिला कसे एंटरटेन करावे या विचारात आम्ही दोघे पडलो. तिच्या प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येतात. ट्रॉम्सोच्या एयरपोर्टवर असताना फ्लॅमच्या हॉटेलला फोन लावून परिस्थितीची माहिती घेतली. इकडची परिस्थिती ढगफुटी आणि पुरामुळे अजून बदलेली नाही, शिवाय सर्व मार्ग बंद आहेत असे सांगून त्यांनी आमच्या चिंतेत भर टाकली. आता पर्यायचा विचार करणे भाग होते, कारण हॉटेलने नियमावर बोट ठेवून पैसे परत करण्यास नकार दिला होता. उद्यापासून सुरू होण्यार्या पुढच्या तीन दिवसांसाठी ऑस्लोला हॉटेल शोधणे आम्हाला भाग होते. सुदैवाने आम्ही आज एका रात्रीसाठी ज्या हॉटेलला थांबणार होतो, त्यांच्याकडे पुढच्या तीन दिवसासाठी सुद्धा जागा होत्या. दुसर्या दिवशी हवामान चांगले असल्याचा निर्वाळा हवामान अॅप देत होती. पुढचे तीन दिवस ऑस्लोला काढायचे की रोडप्रवास सुरू करायचा हे सकाळी उठल्यावर बघू असे ठरवून ऑस्लोला जायचे विमान पकडले.
दुपारी ऑस्लोला पोहचल्यावर रेंटल कार घेण्यासाठी एअरपोर्टवरील ऑपरेटरच्या डेस्कवर आलो. ‘तुम्हाला टेस्ला हवी आहे का अपग्रेड करून?’ डेस्कवरच्या गोड मुलीने हसून माझ्याकडे बघितले. तिच्या स्माइलसाठी मी होकार दिला की टेस्लासाठी हे तुम्हीच ठरवा. पण एवढी स्वस्तात टेस्ला रेंटल कार युकेला पण मिळत नाही. गाडीचा वेग हा एक फॉर्म्युला रेसिंगच्या कारसारखा आहेच, पण त्यात अत्याधुनिक आणि आधुनिक वैशिष्ट्ये यांची भरमार आहे. या कारने आणलेल्या क्रांतीसाठी इलॉन मस्क हा मोठ्या अभिनंदनास पात्र आहे, परंतु व्यक्तिगत पातळीवर त्याच्या टिपिकल पुरुषी आणि जुनाट मध्ययुगीन विचारांकडे कानडोळा मात्र करता येत नाही.
नॉर्वेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा सुकाळ आहे. २०२४मध्ये विकल्या गेलेल्या कारमध्ये ८८ टक्क्यांपेक्षा जास्त कार इलेक्ट्रिक होत्या. आता २०२५मध्ये नॉर्वे हा पहिला देश असेल, ज्यांच्याकडे फक्त इलेक्ट्रिक कारच असतील. मला पेट्रोल पंपापेक्षा इलेक्ट्रिक चार्जर स्टेशन्स जास्त दिसले. अॅम्स्टरडॅमपेक्षा जास्त टेस्ला मी ऑस्लोला बघितल्या. हायड्रोपॉवर, खनिज तेल आणि वायूनिर्मित विजेच्या उत्पादकतेमुळे, तसेच लोकशाहीवादी सरकारच्या आधुनिक आणि दूरदर्शी दृष्टिकोनामुळे हे शक्य झाले. ज्या चुका गल्फ देशांनी आणि इंग्लंडने केल्या त्या नॉर्वेने नुसत्या टाळल्याच नाहीत, तर सॉव्हरिन वेल्थ फंडसारख्या अनोख्या आणि आधुनिक विचारांचा स्वीकार केला. ज्याला गव्हर्न्मेंट पेन्शन फंड ग्लोबल म्हणूनही ओळखलं जातं. हा एक जागतिक स्तरावर अत्यंत मोठा सार्वजनिक निधी आहे आणि अंदाजे आकार १.७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर आहे. या फंडाचे प्रमुख उद्दिष्ट नॉर्वेच्या भविष्यातील पिढ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे आणि तेल आणि नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननावर आधारित अर्थव्यवस्थेच्या चढउतारांना तोंड देणे आहे. आपल्या आईपप्पांची पिढी पोटाला चिमटा काढून पोस्ट ऑफिस, सोने, पेन्शनमध्ये गुंतवणूक करायची तसाच हा प्रकार. पण ते मुख्यत: विकसित बाजारातील स्टॉक्स, बाँड्स, रिअल इस्टेट आणि प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात. एवढे असून सुद्धा व्यक्तींच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागतो. येथे कांदा न खाणारी सीतारामन नसल्याने व्हॅट कर गुंतागुंतीचा नाही.
ऑस्लो हे एक डोंगराळ आणि किनार्यावर असलेले शहर असल्यामुळे बहुतेक वेळा रस्ते भुयारी आहेत. याचा सर्वात जास्त फायदा खराब हवामानात होत असावा. हॉटेल समुद्रकिनार्याजवळ आणि सिटी सेंटरला लागून असल्याने संध्याकाळी फिरता पण आले. ट्रॉम्सच्या मानाने इकडचे तापमान तसे उबदार (७ डिग्री सेल्सिअस) होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर बाजूच्या टेबलावर दोन इंग्लिश मैत्रिणींच्या गप्पा आणि पत्त्याचा गेम रंगात आला होता. आम्हीसुद्धा इंग्लंडवरून आल्यावर म्हटल्यावर गप्पा आणि गेममध्ये अजूनच रंगत आली.
आता पुढच्या दिवशी हवामान कसे असणार, या चिंतेत दिवस संपला.
(क्रमश:)