उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दुसर्या क्रमांकाची कामगिरी बजावली. पी. टी. उषा यांनी सुचवलेले ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमधील क्रीडा प्रकारांचे निकष अस्तित्वात आल्यास महाराष्ट्राचे हे यश पुढील स्पर्धेत टिकेल का? पण महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीने मूल्यमापन करून त्या मार्गाने आधीपासूनच जाण्याची नितांत आवश्यकता आहे, या वस्तुस्थितीचे हे विश्लेषण.
– – –
आनंदी आनंद चोहीकडे, अशी परिस्थिती निर्माण करणारी क्रीडा संस्कृती राज्यात नांदू लागली आहे. काही महिन्यांपूर्वीची आनंदलाट अद्याप ओसरलेली नाही. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळवल्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नील कुसळेने हा पदक-दुष्काळ संपवला. त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य ऑलिम्पिक पदकविजेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले. या आनंदात ताजी भर म्हणजे उत्तराखंडात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने मोठा पराक्रम गाजवला.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेची अध्यक्ष, माजी ऑलिम्पिकपटू पी. टी. उषाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेआधी अत्यंत महत्त्वाचे सूतोवाच केले होते. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमधील क्रीडाप्रकारांसाठीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व्हावी. उषाचा हा निकष पुढील वर्षी अस्तित्वात आल्यास महाराष्ट्राचे हे वर्चस्व टिकेल का? टिकले तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत परावर्तित होईल का? पुढील ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राकडून पदकांची संख्या वाढेल की पुन्हा पदक-दुष्काळाचीच प्रचिती वर्षानुवर्षे येईल?
गोव्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकंदरीतच अग्रस्थान मिळवताना ८२ सुवर्ण, ६८ रौप्य आणि ८० कांस्य अशी एकूण २३० पदकांची कमाई केली होती. यावेळी ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके जिंकताना एकंदरीत दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. एकंदर पदकसंख्येत यंदा २९ पदकांची घट झाली आहे आणि सुवर्णपदकांमध्ये २८ पदके कमी मिळाली आहेत. ही महाराष्ट्राची घसरण म्हणावी का? की पहिला क्रमांक सेनादलाला मिळाल्याने राज्य म्हणून अव्वल आम्हीच या आनंदात मश्गुल राहायचे?
उत्तराखंडच्या स्पर्धेतील घसरणीचे प्रमुख कारण ठरली, ती पिंच्याक सिलाट. हे काय बुवा? ही इंडोनेशियामधील मार्शल आर्ट या क्रीडाप्रकाराचा यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश नव्हता. गोव्यात पिंच्याक सिलाटमध्ये महाराष्ट्राने ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य अशी १७ पदकांची लयलूट केली होती. इतकी पदके म्हणजे महाराष्ट्राला हा उत्तम आत्मसात असलेला क्रीडाप्रकारच. पण, याचा दर्जा काय? अहो, २०१८मध्ये इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत हा क्रीडाप्रकार समाविष्ट होता. भारताचे तीन क्रीडापटू या क्रीडाप्रकाराच्या विविध गटांत खेळलेही होते. २०२२मध्ये हँगझू (चीन) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पिंच्याक सिलाटला वगळण्यात आले. स्वाभाविकपणे राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतही या क्रीडाप्रकाराने स्थान गमावले. गोव्यात स्कॉय मार्शल आर्ट नावाचा आणखी एक क्रीडाप्रकार होता. महाराष्ट्रातील क्रीडाधुरिणांनी तोही आत्मसात करून एकूण ८ पदके संपादन केली होती. पण, यावेळी स्कॉयलाही डच्चू देण्यात आला.
गोव्याच्या ऐतिहासिक कामगिरीत सिंहाचा वाटा होता, तो जिम्नॅस्टिक्समधील सर्वाधिक २९ पदकांचा (१३ सुवर्ण, ६ रौप्य, १० कांस्य). उत्तराखंडमध्ये जिम्नॅस्टिक्समध्येही मंदीची लाट आली. १२ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य अशी एकूण २४ पदके मिळाली. म्हणजे पाच पदके कमी मिळाली. पण, सर्वाधिक पदके जिम्नॅस्टिक्समध्ये मिळवली, हे आनंददायी नाही का?
महाराष्ट्राचा राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमधील दुसरा आशादायी क्रीडाप्रकार म्हणजे मॉडर्न पेंटॅथलॉन. गोव्यात सर्वाधिक १४ सुवर्णपदकांसह (६ रौप्य, ४ कांस्य) २४ पदके या क्रीडाप्रकारात महाराष्ट्राच्या खात्यावर जमा होती. पण यावेळी एकूण पदकांचा आकडा १३पर्यंत खालावला आणि सुवर्णपदकांची संख्या निम्म्यावर आली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील महाराष्ट्राचा तिसरा हक्काचा क्रीडा प्रकार म्हणजे जलतरण. गोव्यात जलतरणात २६ पदके (७ सुवर्ण, १२ रौप्य, ७ कांस्य) मिळवली होती. यावेळी जलतरणात महाराष्ट्राची पदक संख्या वाढली आणि ३५ (६ सुवर्ण, १४ रौप्य, १५ कांस्य) झाली. मागील स्पर्धेपेक्षा एखादे सुवर्ण कमी पडले, बाकी नावे ठेवायला कुठेच जागा नाही. हे चर्चिलेले तिन्ही क्रीडाप्रकार ऑलिम्पिक दर्जाचे. पण ऑलिम्पिकमधील पदकांची कामगिरी आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी यात बराच फरक आढळतो. त्यामुळे हे यश उंचावण्याची गरज आहे. याकडे गांभीर्याने कोण पाहणार?
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताच्या खेळाडूंचीही कामगिरी ऑलिम्पिक सोडाच, तर राष्ट्रकुल आणि एशियाडमध्येसुद्धा पदकांच्या दर्जाची नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वाधिक पदके ही तालबद्ध प्रकारातली. पण, ही तालबद्धता मोठमोठ्या कार्यक्रमांत, रिअलिटी शोमध्ये सादरीकरणात किंवा समाजमाध्यमांवर रीळे बनवण्यात रमली आहे. जिम्नॅस्टिक्समधील काठीण्याच्या पातळीवर जाऊन दर्जेदार खेळाडू घडवण्याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, ही गुणवत्ता नृत्यप्रकारांकडेच मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता आहे.
मल्लखांबमध्ये महाराष्ट्राने दोन्ही स्पर्धांमध्ये १३ पदके कमावली. म्हणजे कामगिरीतील सातत्य कौतुकास्पदच. पण मागील स्पर्धेत नऊ पदकांची संख्या तीनपर्यंत कशी खाली आली, याकडे गांभीर्याने कधी पाहणार? मल्लखांब, खो-खो महाराष्ट्राचे देशी क्रीडाप्रकार. दोन्हीचे विश्वचषक झाले असले तरी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धेत या क्रीडाप्रकारांना स्थान नाही. उषाचे बोल खरे ठरल्यास हे दोन्ही क्रीडाप्रकार पुढील वर्षी असतील का?
योगासने हा क्रीडाप्रकार आपल्या देशाचा अभिमान. उषा या क्रीडाप्रकाराचे भवितव्य ठरवण्यात यशस्वी होईल का? योगासनांमध्ये गोव्यात आठ पदके होती, उत्तराखंडला ही संख्या पाचपर्यंत रोडावली. बाकी सायकलिंग, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, तायक्वांदो, टेबल टेनिस, स्क्वॉश, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, नौकानयन, हॉकी, बॉक्सिंग, कुस्ती, वुशू हे ऑलिम्पिक क्रीडाप्रकार. पण महाराष्ट्राकडून या क्रीडाप्रकारांमध्ये ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडापटू कुठे घडतायत?
गेल्या शंभरहून अधिक वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास हॉकी, नेमबाजी, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि टेनिस अशा आठ क्रीडाप्रकारांमध्ये भारताने पदके जिंकली आहेत. अगदी हुकलेली पदके आणि भविष्यातील आशा या दोन्ही पद्धतींचा विचार केल्यास क्रीडाप्रकारांचा हा आकडा १५पर्यंत जाऊ शकेल. मग राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये ३७ क्रीडाप्रकारांचा समावेश कशासाठी? यातील काही क्रीडाप्रकारांना ऑलिम्पिक नव्हे, तर राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही मान्यता नाही. मग तरीही या क्रीडाप्रकारांकडे ऑलिम्पिकच्या नावाखाली आशेने पाहण्याचा उद्देश काय? त्यामुळेच उषा यांनी काही क्रीडाप्रकारांना कात्री लावण्याची नितांत गरज आहे. हेच धोरण महाराष्ट्राने येत्या राज्य ऑलिम्पिकमध्ये राबवण्याची गरज आहे.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मोठ्या उत्साहाने राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची पायाभरणी केली. पण, या स्पर्धेला वार्षिक कार्यक्रमपत्रिकेत स्थान देताना अभ्यास कमी पडला. नाव ऑलिम्पिक ठेवायचे तर प्रत्यक्षात या दर्जाचे क्रीडाप्रकार, संघ आणि खेळाडू खेळावेत या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न कुणी करायचा? दूरदृष्टीच्या अभावामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचा दर्जा राज्य पातळीपर्यंतही उंचावला नाही.
महाराष्ट्र नेमका कुठे कमी पडतो? आर्थिक इनाम, नोकर्या, आदी अनेक बाबतीत सकारात्मकता आहे. राज्यात अनेक क्रीडा संघटनांमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे खेळाचे मोठे नुकसान होताना दिसते. हे वाद सोडवण्याची जबाबदारी कुणाची? अर्थातच राज्याच्या क्रीडा खात्याची आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची. पण, मुरब्बी राजकारणी मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेतात, आपले खंदे कार्यकर्ते संघटनेवर क्रीडा प्रचारक म्हणून ठेवतात. ही मंडळी मोठमोठी भाषणे झोडतात. पण कार्यकर्त्यांमध्ये आणि खेळाडूंमध्ये कोंबड्यांच्या झुंजी लावतात, हे राज्यातील क्रीडा संस्कृतीचे वास्तव चित्र आहे. ऑलिम्पिकपटू घडवायचे, तर शालेय पातळीपासून त्या दर्जाच्या क्रीडा प्रकारांना चालना मिळायला हवी. तूर्तास, उषा यांचे राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे धोरण प्रत्यक्षात अवतरणार का? की उष:काल होण्याआधीच त्यांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेतून अस्त होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण, उषा यांच्या सूचनेची अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राची पुढील राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत पदकस्थिती काय असेल? पण, यातून आधीच धडा घेऊन सुधारणा करायच्या की, आपल्या पदककमाईबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घ्यायची, हे राज्यातील क्रीडाधुरिणांनी ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे.