एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट!
प्रश्न : ताई, सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा?
उत्तर : लाडक्या भावा, माझे मत विचारशील तर सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजन म्हणून करावा. जितका वेळ सोशल मीडियावर घालवाल त्यात जमेल तेवढे स्वत:चे मनोरंजन करून घ्या आणि तरी थोडा वेळ उरलाच, तर लोकांचे मनोरंजनही करा. अर्थात, मनोरंजन म्हणजे दुसर्याचा अपमान, थट्टा, टवाळी नव्हे याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. काही लोक मनोरंजनासोबत जगभरातील पाककृतींची ओळख करून देत असतात, विविध भाषा शिकवत असतात, कोणी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारे सल्ले सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. अशा लोकांच्या पेजला, प्रोफाइलला अवश्य भेट द्या, जमल्यास त्यांना प्रोत्साहनही द्या आणि जे काही उपयोगी पडेल ते ते शिकून घ्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांतीची स्वप्ने पाहणार्यांपासून योग्य अंतर ठेवा. जोडीदाराच्या मित्र मैत्रिणींच्या भिंतीवर जाऊन उगाच ख्या ख्या करणे टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली वैयक्तिक माहिती कमीत कमी शेअर करा. तुम्ही समजा सहलीला जाणार असाल, तर ते आल्यावरही फोटो टाकून मिरवता येते. त्यासाठी चार दिवस आधीपासून सगळीकडे शेअर करायची गरज नसते. आजकाल चोर अशाच पोस्टवर लक्ष ठेवून असतात.
आपण आपल्या जोडीदारासोबत घालवलेले क्षण हे आपल्यासाठी व त्याच्यासाठीही भावनात्मकदृष्ट्या फार महत्त्वाचे असतात याचे भान ठेवा आणि त्याचे जाहीर प्रदर्शन टाळा. तुमच्या लेकराच्या सर्व कृती या तुमच्यासाठी बाललीला असल्या तरी इतरांसाठी त्या मर्कटलीला असतात हे लक्षात ठेवा. ‘आज पिल्लूला जुलाब झालेत… नुसती धार लागली आहे.’ असल्या बिनडोक पोस्ट उद्या वयात आल्यावर तुमच्या मुलासाठी किती लज्जास्पद असतील याचे भान ठेवा.
तमाशाही खोटा आणि प्रबोधनही खोटे!
प्रश्न : ताई, सध्या सोशल मीडियावर अश्लीलतेने जो काही उच्छाद मांडला आहे, त्याची चिंता वाटत नाही का?
उत्तर : हे जे काही चालू आहे, त्याला उच्छाद म्हणावे का दुर्दैव, हा खरा प्रश्न आहे. कारण अश्लीलतेचे जाहीर प्रदर्शन करणारे आहेत, तिथेच त्याला भरभरून प्रतिसाद देणारेही आहेत. या महाभागांना फॉलो करणारे हजारो लाखो आहेत, म्हणून ते प्रसिद्ध आहेत असा समज करून त्यांना आपल्या शोमध्ये बोलावणारे आणि निवडणुकीचे तिकीट देणारे असामान्य लोकही आहेत. कधी काळी अश्लील म्हणून हिणवल्या गेलेल्या तमाशाने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यही मोठ्या खुबीने पार पाडले आहे. कित्येक कलापथकांनी रस्त्यावर छोटे छोटे प्रयोग करत समाजजागृती करून दाखवली आहे. पण सध्या पदर पाडून नाचणे याला तमाशा समजणारे आणि पालकांच्या बेडरूममध्ये डोकावण्याच्या सल्ल्यांना प्रबोधन समजणारे तरुणाईचे आयकॉन बनत चालले आहेत, हे खरे दु:ख आहे. कधी कधी हे लोक त्यांच्या वर्तनाने अडचणीत येतात, त्यावेळी त्यांना पाठिशी घालणारेही आपल्या आजूबाजूला आहेत ही खरी चिंता आहे. आपल्या हातात विरोध आणि ब्लॉक करणे हेच फक्त उरले आहे. आपल्याला याविरुद्ध काही करण्याची इच्छा आहे, पण अधिकार नाहीत आणि ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना काही करण्याची इच्छा नाही.
मित्रयादीत येण्यासाठी सूचनायादी!
प्रश्न : सोशल मीडियावर बरेचदा मित्र यादीतले फारशी ओळख नसलेले लोक कधी कधी उगाच पिळतात, छळतात. यांचे करावे तरी काय?
उत्तर : सोशल मीडिया नावाच्या या जादूच्या जंगलात माणसे आहेत, भुते आहेत, राक्षस आहेत आणि साधूसंतही आहेत. आपण कोणाशी जोडले जायचे ते आपण ठरवायचे. मी आपली नव्या मित्रलोकांसाठी एक सूचनायादी बनवून माझ्या भिंतीवर पिन केली आहे. तुला उपयोगी पडते का बघ.
मित्रयादीत नव्याने समाविष्ट होणार्या होतकरूंसाठी…
१) आभासी जगातील मान्यवरांना माझ्या आयुष्याची जेवढी माहिती असावी असे मला वाटते तेवढी मी प्रोफाइलमध्ये दिलेली आहे. ती नीट वाचावी. मित्रयादीत आल्या आल्या लगेच मेसेज करून, ‘मग तुम्ही काय करता?’, ‘तुम्ही कुठे राहता?’, ‘व्यवसाय काय?’ असले बिनडोक प्रश्न विचारायचे टाळणे सोपे जाईल.
२) तुम्हाला मित्रयादीत घेतानाच तुमच्याविषयीची शक्य ती माहिती मी वाचलेली असते आणि त्यावरतीही काही शंका असल्यास मी मित्रयादीत घ्यायच्या आधीच ती नक्की विचारलेली असते. त्यामुळे मित्र बनल्या बनल्या लगेच स्वत:ची कोडकौतुके घेऊन मेसेजमध्ये दाखल होऊ नये.
३) आम्हाला स्वत: सोडून या जगात इतर कोणाचेच कौतुक वाटत नाही. त्यामुळे तुमचे समाजकार्य, तुमच्या संस्था, तुमचे समाज बदलण्याचे विचार, तुमच्या अंगातील कला इत्यादींबद्दल मेसेज करून पिडू नये. अपमानच नशिबी येईल.
४) जे ग्रुप आम्हाला आवडतात तिथे आम्ही स्वत:हून हजेरी लावतो. त्यामुळे विनाकारण भलत्यासलत्या ग्रुपात आम्हाला सामील करून घेऊ नये. ग्रुपचा बट्ट्याबोळ करण्यात येईल.
५) जगात माझ्या आडनावाचे हजारो लोक आहेत, माझ्या शाळेचे हजारो विद्यार्थी आणि माझ्या विद्यापीठाचे अमोज रेडे आहेत. त्या सगळ्यांना मी ओळखते असे नाही. त्यामुळे ते अमके तमके तुमचे कोण, ढिमका फलाना तुमच्या बॅचमध्ये/ वर्गामध्ये होता का, असले मतिमंद प्रश्न विचारू नये.
६) सर्वात महत्त्वाचे :- तुमचा वेळ जात नसल्यास झोप काढा, इंटरनेटवर तुम्हाला माहिती नसलेल्या अम्ााप वेबसाइट आहेत, त्या शोधा आणि वाचा, शिनचॅन बघा, पंचतंत्र कथा वाचा, पिळाच्या विणकामाचे, ओरेगामीचे व्हिडिओ बघा, सेंद्रिय शेतीची माहिती घ्या, असे काहीही करा. पण पण पण.. तुमचा वेळ जात नाही म्हणून उगाच मेसेज करून ‘मग, काय चाललंय?’ आणि ‘जेवला का?’ हे तुच्छ प्रश्न विचारू नका.
काकाकाकूंची बोलती बंद!
प्रश्न : सोशल मीडियावरच्या काकाकाकूंचे काय करावे? आमच्या आईबापाला, नवरा/ बायकोला आमची काळजी आहे, त्यांचे आम्हाला मार्गदर्शन आहे. वयाने मोठे असल्याने आम्ही आता थोडाबहुत भल्याबुर्याचा विचार करू शकतो, काही निर्णय परस्परसंमतीने घेऊ शकतो हे यांना का कळत नाही? सतत सल्ल्यांचे दुकान का उघडलेले असते? वय बघून काही उलटे बोलावेसेही वाटत नाही.
उत्तर : सोशल मीडियावर वावरणारे स्वयंघोषित काका-काकू हा एक जागतिक उच्छाद बनलेला आहे. आधी नोकरीसाठी मागे लागतात, नोकरी मिळाली की लग्नासाठी मागे लागतात, लग्न केले की पोरांसाठी मागे लागतात. सतत पिड पिड पिडतात. अशा काकाकाकूंना सहन करण्यापेक्षा सरळ पळवून लावायचे. पुन्हा काही ते आपल्या नादाला लागत नाहीत. तुला दोन किस्से सांगते.
एक काकू कायम लग्नासाठी माझ्यामागे हात धुवून लागलेल्या असायच्या. बरं काकूंना स्वत:ला काही मुलगा नव्हता, त्यामुळे त्यासाठी प्रयत्न असावेत तर तसेही नाही. या काकू म्हणजे चालता बोलता सीसीटीव्ही. कोण्या मुलाच्या रिप्लायवर मी पण रिप्लाय केला की या लगेच मेसेजमध्ये हजर. ’कोण आहे गं तो?’ मी आधी सगळे गमतीने घेतले. पण नंतर हा जाच वाढू लागल्यावर एकदा काकूंना पकडले. त्या नेहमीप्रमाणे चौकशी करता करता, ’काय गं तो अमका तमका फार घोटाळत असतो तुझ्या प्रोफाइलवर. काय पुढचे बेत ठरतायत का काय?’ या प्रश्नावर आल्या आणि मी ताबडतोब षटकार मारला.
मी : काकू, अहो त्याला माझ्याबद्दल पूर्ण माहिती नाही ना त्यामुळे.
काकू : कसली माहिती गं?
मी : हेच की मला मुलं नाही आवडत. मुली आवडतात ते.
पुढच्या अर्ध्या तासात काकू आणि त्यांची मुलगीही माझ्या मित्रयादीतून गायब. काकूंनी तिला काय कारण सांगितले असेल या विचाराने आजही हसायला येते.
एक काका-काकू माझ्या लग्नानंतर कायम ’मग पुढचा विचार कधी?’ या एकाच प्रश्नावर अडलेले असायचे. एकदा कंटाळून काकांना एक यादी पाठवली.
१) दिवसातून तीन चार वेळा २८ पायर्या चढा-उतरायला लागल्या तर तुम्हाला जमेल का?
२) तुमचा प्रॉव्हिडंट फंड व बँक बॅलेन्स किती आहे?
३) काकूंची तब्येत धडधाकट दिसत असली तरी त्यांना काही आजार वगैरे नाही ना? या वयात त्यांची थोडे कष्ट करण्याची तयारी आहे का?
४) वर्षभर तुमचे घर भाड्याने द्यायचे झाल्यास डिपॉझिट आणि भाड्याची तुमची अपेक्षा काय आहे?
काका आणि काकू जाम भंजाळले. आधी त्यांना काही टोटल लागेना, मग शेवटी काकांनी शरणागती पत्करली आणि हे सगळे प्रश्न विचारण्याचे कारण काय असा सवाल केला. मी तातडीने उत्तर धाडले.
१) तुम्ही अगदी आईवडिलांसारखी इतकी काळजी घेता हे बघून नवरा गहिवरला आहे. तुमच्या आनंदासाठी एक चान्स घेऊया म्हणत आहे. पण आम्हा दोघांकडे वयस्कर आणि अनुभवी असे कोणी नाही, त्यामुळे तुम्हालाच इकडे राहायला बोलवायचे नियोजन आहे. नवरा दिवसभर कामावर असतो, त्यामुळे घरातला भाजीपाला, दूध, किराणा वगैरे आणायला तुम्हाला जिने वरखाली करावे लागणार आहे.
२) संसाराची नवी-नवी सुरुवात असल्याने सध्या आमच्याकडे शिल्लक रक्कम फारशी नाही. तीन चार मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्यांनी गरोदरपणाच्या काळात, बाळंतपणासाठी आणि बाळंतपणानंतर असा सर्व मिळून लाख-दीड लाख खर्च आल्याचे सांगितले. तेवढा तुम्ही करू शकाल का याची काळजी वाटत आहे.
३) एकदा का बातमी कन्फर्म झाली, की काकूंनाच सगळे करावे लागणार आहे. माझी पहिली वेळ असल्याने मला त्यातली काही माहिती नाही. माझे सगळे करणे, घरातला स्वयंपाक, माझ्या नवर्याचा सकाळचा नाष्टा, डबा, चहा पाणी हे सगळे या वयात काकूंना झेपेल ना, ही काळजी वाटते आहे. पण त्या सर्व सहज निभावतील याची खात्रीही आहे.
४) सातव्या महिन्यात तुम्ही दोघे एकदा आमच्याकडे राहायला आलात की मग बाळ वर्षाचा होईपर्यंत काही तुमची सुटका नाही. अशावेळी तुमचे घर वर्षभर बंद ठेवण्यापेक्षा भाड्याने दिल्यास आपल्याला थोडी आर्थिक मदत होणार नाही का? बाळंतपणाचा खर्च, बाळाची आजारपणं, लसीकरण हा खर्च आहेच, पण आजकाल या इंग्रजी बालवाड्या
अॅडमिशनचे दोन-दोन लाख रुपये घेतात म्हणे. परत गणवेषाचा खर्च वेगळा, शाळेच्या बसचा वेगळा, वह्या पुस्तकांचा वेगळा. सांगायला थोडे अवघड वाटते, पण कदाचित आपल्याला तुमचे घर विकावेही लागेल. अर्थात वर्षभर दूर राहिल्याने तुमची घराची ओढ कमी झालेली असेलच हा भाग वेगळा. नवरा सविस्तर फोन करून बोलणार आहेच, त्याला कधी फोन करायला सांगू?
संध्याकाळपर्यंत काका आणि काकू दोघेही अदृश्य झाले आणि माझे प्रश्न अनुत्तरित राहिले.
– प्रसाद ताम्हनकर