डीपसीक नावाच्या एका एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स) मॉडेलची वाच्यता झाल्यावर मिनिटभरात जगभरच्या एआयसंबंधित कंपन्यांचे शेअर कोसळले. एनविडिया या चिप निर्माण करणार्या कंपनीच्या बाजारातल्या मूल्याला एका दिवसात ६०० अब्ज डॉलरचा फटका बसला. इथून पुढं डीपसीक दीर्घ काळ चर्चेत राहील.
– – –
हा लेख लिहिताना मी डीपसीकवर गेलो आणि ‘तुझ्याबद्दल मी पेपरात वाचलंय, मला जाणून घ्यायचंय की तू कसा आहेस,’ असा प्रश्न इंग्रजीत विचारला.
उत्तर आलं, ‘मी आभासी मदतनीस आहे. त्यामुळं मला शरीर नाही की भावना नाहीत. पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. सांगा मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?’
मी दिल्ली विधानसभेच्या निकालाचा तपशील विचारला.
डीपसीकचं उत्तर आलं ‘माझं ज्ञान ऑक्टोबर २०२३पर्यंतच आहे. त्यामुळे दिल्लीबद्दलची ताजी माहिती माझ्याजवळ नाही. तुम्ही ती माहिती टाइम्स ऑफ इंडिया, एनडीटीव्ही यांच्याकडून, निवडणूक आयोगाकडून मिळवा. आणखी काय हवंय?’
‘मला सबस्टन्स या चित्रपटाचं परीक्षण पाठवू शकाल काय?’ असं विचारलं.
उत्तर आलं, ‘तो चित्रपट ताजा असेल तर माझ्याजवळ माहिती नाही. पण तुम्ही चित्रपटाचं नाव, दिग्दर्शकाचं नाव इत्यादी तपशील कळवलात तर नक्की परीक्षण पाठवेन.’
मी झनक झनक पायल बाजे या सिनेमाचं परीक्षण पाठवायला सांगितलं. अगदी लगोलग सविस्तवर समीक्षण पडद्यावर आलं.
डीपसीक हा एक चॅटबॉट आहे. तो एक मदतनीस आहे. तो तुमच्याबरोबर राहातो. तुम्ही विचाराल ती माहिती देतो. तुमच्याबरोबर खेळतो, कोडी सोडवतो, तुम्हाला गाणी ऐकवतो, सिनेमे दाखवतो, तुम्हाला लिहायला मदत करतो. सारं काही करतो.
हे सारं डीपसीक व्यक्तिगत जिव्हाळा असल्यासारखं करतो, तसं बोलतो. गुगलवरही बरीच माहिती मिळते, पण ती माहिती मास्तरानं फळ्यावर लिहिल्यासारखी असते.डीपसीक मित्रासारखा वागतो.
डीपसीकचं उपशीर्षक आहे, इन टू द अननोन, अज्ञाताच्या शोधात.
– – –
डीपसीक हे एक चॅटबॉट आहे. तुम्हाला निर्णय घ्यायला ते मदत करतं. त्याच्याकडं प्रचंड डेटा आहे, तो डेटा डीपसीक तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी धुंडाळतो, त्याचं वर्गीकरण करतो, तुमची इच्छा समजून घेऊन त्यानुसार उत्तर तयार करतो.
हा बॉट मोफत आहे. पेपर, मासिकं इत्यादी गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागतात. ते देतात त्यापेक्षाही जास्त, अगणित प्रकारची माहिती हा बॉट तुम्हाला फुकट देतो. तुम्हाला परीक्षेची तयारी करायचीय. एखादा निबंध लिहायचाय. एखाद्या नाटकाचं परीक्षण करायचंय, कविता करायचीय, नाटक लिहायचंय. डीपसीक तुम्हाला मदत करेल, लिहून देईल.
डीपसीक असं काय क्रांतिकारक आहे की ज्याच्यामुळं बाजारातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर कोसळावेत? बाजारात उपलब्ध असलेल्या इतर अनेक बॉटसारखंच डीपसीक आहे. उदा. चॅटजीपीटी. ओपनएआयच्या सॅम आल्टमननं चॅटजीपीटी तयार केलंय. तेही डीपसीकएवढंच प्रभावी आहे.
डीपसीकची गंमत अशी की लियांग वेनफेंग या चिनी तरुणानं ते २०२३मध्ये फक्त सहा कोटी डॉलर खर्च करून तयार केलंय.
चॅटजीपीटी तयार करण्यासाठी आल्टमननं ३० हजार चिप्स वापरल्या आणि प्रत्येक चिपची किंमत १३ हजार ते १५ हजार डॉलर होती. फक्त चिप्सचीच किंमत सुमारे ४२ कोटी डॉलर होते. इतर खर्च वेगळेच.
२७ जानेवारी २०२५ रोजी डीपसीकची माहिती जाहीर झाली. लगोलग लक्षावधी अमेरिकन (व इतर) लोक डीपसीकवर गेले. त्यांचा डीपसीकचा अनुभव चांगला होता. इतक्या स्वस्तात एक बॉट मिळत असेल तर इतरांकडं लोक कशाला जातील? डीपसीकनं ज्या अर्थी इतक्या स्वस्तात मॉडेल तयार केलं त्या अर्थी त्यानं वापरेल्या चिप्स आणि इतर हार्डवेअरही स्वस्त असणार. स्वस्त चिप्सवर भागत असेल तर एनवीडिया किंवा इतर कंपन्यांनी तयार केलेल्या महाग चिप्स कोण वापरेल? झालं. तशा चिप्स तयार करणार्यांची मागणी कमी झाली, त्यांचं नुकसान सुरू झालं.
डीपसीकनं खूपच कमी वीज वापरली. म्हणजे कमी विजेवर डीपसीक काम करू शकतं. त्यामुळं विजेची महाग यंत्रं, उपकरणं इत्यादींचे उद्योग वांध्यात आले. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रम्प यांनी एआयच्या विकासाला गती देण्यासाठी वीजनिर्मिती व इतर गोष्टींसाठी ५०० अब्ज डॉलर सरकार खर्च करेल, असं म्हटलं होतं. ते ५०० अब्ज खर्च करणार्या कंपन्यांना भरपूर फायदा मिळणार होता. आता ते ५०० अब्ज लागणार नसतील, तर त्यावर डोळा ठेवून असणार्या कंपन्यांना फटका बसणार, त्या लोकांनी ट्रम्पना दिलेला पाठिंबाही डळमळीत होणार. डीपसीकची भावंडं चीन, हाँगकाँग इत्यादी ठिकाणी तयार झाली तर अमेरिकेतल्या एआय उद्योगावर जबर परिणाम होणार.
खरं म्हणजे डीपसीक हा खाजगी उपक्रम आहे. वेंगफेन या तरुणानं सरकारची मदत न घेता, सरकारला न कळवता स्वतःचे पैसे घालून डीपसीक तयार केलंय. त्यामुळं डोनल्ड ट्रम्प यांनी चिनी मालावर जकात मारण्याला प्रत्युत्तर म्हणून हा उद्योग चीननं केलाय असं म्हणता येत नाही. पण परहस्ते अमेरिकेला हा धक्का आहे हे निश्चित.
एआय उद्योग फार वीज खातो. डीपसीक कमी विजेवर चालतो. त्यामुळं विजेची बचत होईल असं म्हणतात. तसं होईल याची खात्री नाही, नव्हे तसं होणारच नाही. दोन हजार वर्षांपूर्वी तेलाचा दिवा लोक प्रकाश मिळवण्यासाठी वापरत. एक वॅट विजेपासून तेव्हा ०.०६ लुमेन प्रकाश मिळत असे. आता प्रकाशनिर्मितीचं तंत्रज्ञान कायच्या काय सुधारलं आहे, एलईडी दिवे आलेत. एलईडीमुळे एका वॅटमधून ११५ लुमेन प्रकाश मिळतो. खरं म्हणजे यामुळं विजेचा वापर कमी व्हायला हवा. पण तसं झालेलं नाही. माणसं बेडरूमधे चार दिवे, दिवाणखान्यात दहा दिवे लावतात. कारमधेही सीटच्या तळाशी पायाजवळही दिवे लावतात. रस्ते तर कायम दिवाळी असल्यासारखे उजळलेले असतात. तंत्रज्ञान सुधारलं आणि विजेचा वापर लाखपटींनी वाढला. चॅटबॉट स्वस्त होईल, कंप्युटिंग स्वस्त होईल, प्रसार वाढेल. अमेरिकेतल्या फार कमी कंपन्या एआयचा वापर करतात. उद्या त्यांची संख्या वाढेल. बॉट स्वस्त होतील, पण त्यांची संख्या वाढेल आणि विजेचा वापरही वाढेल.
पब्लिक चिंतेत आहे ते एकूणच एआयच्या प्रसार आणि उपयोगामुळं. आज शाळेतल्या मुलांना बेरीज वजाबाकी करता येत नाही, मुलं कॅलक्युलेटर वापरतात. मोजमापाची क्षमता मुलं गमावून बसत आहेत. विचार, विश्लेषण, अनेक गोष्टीतून योग्य गोष्टीची निवड, समज हा मानवी व्यवहाराचा आधार आहे. लिहिण्याशी ते जोडलेलं आहे. आता एक तर लेखणीच हाती धरावी लागत नाही. सेलफोनशी बोला, तो मजकूर लिहून देतो. झनक झनक पायल बाजे पाहून, त्याचा रसास्वाद घेऊन त्यावर लिहिणं याची आवश्यकता आता उरलेली नाही. न पहाताही मला चॅटजीपीटी किंवा डीपसीक झनक झनकचं झकास समीक्षण पाठवतोय. पु. ल. देशपांडे आणि पुशि रेगे. किवा मर्ढेकर आणि तेंडुलकर. त्यांच्या शैलीचं अनुकरण करून, मला चॅटबॉट नाटक लिहून देतो, कविता लिहून देतो. कशाला पुल, रेगे, तेंडुलकर, मर्ढेकरांसारखी मेहनत करायची? साहित्य आणि जीवन यातला संबंधच चॅटबॉट मोडायला निघालेत.
अशीही शक्यता आहे की मुलं कधी मैदानावर उतरणारच नाहीत, पडद्यावर क्रिकेट खेळतील. पडद्यावरच सचिन तेंडुलकर होतील.
पत्रकारी आणि वास्तव, पत्रकारी आणि सत्य यातला संबंध तुटलेला आपण पहात आहोतच. न घडलेल्या गोष्टीही माध्यमात अवतरतात. मेंदूचा वापर नको. हाताचा वापर नको. पायाचा वापर नको. आता तर व्हर्चुअल सेक्सही सुरू झालाय. असं सारं घडेल असं नाही. काही विचारवंत म्हणतात की शेवटी माणूस हा माणूस आहे, तो स्वतःचा नाश करून घेणार नाही, तो क्रियेटिव मार्ग काढेल. पण, ज्या रीतीनं सध्या जगातलं राजकीय आणि धार्मिक नेतृत्व आकार घेतंय, ज्या पद्धतीनं जगभरची पब्लिक वागतेय ते पहाता माणूस किती शहाणपणानं वागेल याबद्दल शंकाच वाटतेय.
डीपसीक बॉटांची संख्या वाढेल. ते बॉट अधिकाधिक गुणी आणि कसबी होतील. बॉट उद्योग श्रीमंत होईल, त्यांचे मालक श्रीमंत होतील. पण समाजाचं काय होईल? न वापरलेले मेंदू आणि अवयव असणारी माणसं कशी असतील, काय करतील?
नको बाबा. तसं न झालं तर बरं.
– निळू दामले