माझी मुलगी दहावीला आहे आणि माझा पुतण्या बारावीला आहे. त्यांचे काका म्हणून त्यांना काय मार्गदर्शक सूचना द्याल?
– बबिता कासार, पाचोरा
तुमच्या मुलीला शुभेच्छा देताना सांगेन की अभ्यासाच्या बाबतीत आईचं काही ऐकण्याआधी तिची दहावीची मार्कशीट बघ… आणि काका म्हणून पुतण्याला शुभेच्छा देताना काहीही सांगणार नाही… उगाच त्याने आमचे बारावीचे मार्क्स विचारले तर? पण त्याचा मुँहबोला ‘पवार काका’ म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या ह्यांना सांगा… ‘पुतण्यापासून सावध राहाच.. पण पुतण्याच्या मित्रांपासूनही लांब राहा… कोणालाही धनंजय… पार्थ… अर्जुन समजून, त्याला त्याच्या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी स्वत: कृष्ण बनू नका… तुमचा अभिमन्यू होईल.
तुम्ही नाट्यक्षेत्रात चमकला नसतात, तर आयुष्यात काय केलं असतं? काय बनला असतात?
– शरद तांबट, जुन्नर
अमेरिकेचा अध्यक्ष बनलो असतो… आणि आमच्या शपथविधीला तुम्हाला निमंत्रणच दिल नसतं. (तुम्ही काहीही प्रश्न विचारले तर आम्ही पण काहीही उत्तर देणार… पण म्हणून भारताचा पंतप्रधान झालो असतो असं कदापि म्हणणार नाही.. तेवढी पात्रता आमच्यात नाही… कारण काही बनता आलं नसतं तरी आम्ही कोणाला ‘बनवलं’ नसतं हा आमचा वीक पॉईंट आम्हाला माहिती आहे (आधीच्या लाईन्स राजकीय वाटल्या तरी शेवटची लाईन राजकीय नाही… स्वहितार्थ जारी)
एखादा माणूस तुमच्या आसपासच्या सगळ्या माणसांशी हस्तांदोलन करतो आणि तुमच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करून पुढे निघून जातो… असं का होत असेल? आपल्या बाबतीत असं झालं तर काय केलं पाहिजे?
– वनिता पितळे, ठाणे
कदाचित ‘त्या’ माणसाला ‘आमची’ भीती वाटत असेल की त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्यावर ‘आम्ही’ त्या माणसाच्या गळ्यात पडू… मिठ्या बिठ्या मारू.. ‘आमचा’ जुना रेकॉर्ड त्या माणसाला माहीत असेल.. अशा प्रसंगी आम्ही हात पुढे करून अवलक्षण करून घेत नाही .. पण हा असा प्रश्न तुम्ही का विचारलायत? तुमच्या ओळखीच्या कोणा बाबतीत असा प्रसंग घडलाय का?
तुम्ही कधी पत्रकार परिषद वगैरे घेतली आहे का? त्यात फार अवघड असं काही असतं का? काही लोक इतके का घाबरत असतील पत्रकारांच्या प्रश्नांना?
– सुभाष साळुंखे, नगर
पत्रकार परिषदेची भीती ‘भल्याभल्यांना’ वाटते. मग ती आम्हालाही वाटायलाच हवी… एकट्या दुकट्या पत्रकाराने प्रश्न विचारला आणि तोंडचं पाणी पळालं, तर पाणी प्यायचं निमित्त करून तिथून पळणं सोपं पडतं… परिषदेतून कसं पळणार? कोणीतरी प्रश्न विचारणार, ‘आंबा खाताना बाटा खाता का?’ लगेच दुसरा प्रश्न विचारणार, ‘मग तो गिळता की चोखून खाता?’ त्यावर तिसरा विचारणार, ‘बाटा अडकतो का?’ मग आपल्याला प्रश्न पडणार, ‘बाटा नक्की कुठे अडकतो? घशात की नरड्यात?’ आपण उत्तरासाठी टेलिप्रॉम्प्टरकडे बघणार, नेमका तेव्हाच तो बंद पडणार, नंतर बाकीचे लिब्रांडू पत्रकार बोंब मारणार…
जावई सासरी थोड्या दिवसांसाठी गेला की त्याला पाहुण्याचा मान मिळतो; दशमग्रह बनून अधिक दिवस राहिला की त्याला खळं सारवायला सांगितलं जातं, असं ऐकलंय… तुमचा काय अनुभव?
– विलास भिंगारदिवे, सोलापूर
सासरी कितीही खळं सारवायला सांगितलं, तरी ते सारवणं किती महान आहे अशी सारवासारवी करायला जावयाने माणसं पाळायला हवीत. (आमचा अनुभव विचारलायत म्हणून सांगतो. आम्हाला बोलवलं नाही तर आम्ही सासर्याच्या वाढदिवसालाही जात नाही. आम्हाला बोलवा म्हणून सांगायला सासर्याकडे माणूसही पाठवत नाही. मुळात आमच्या आधीच्या जावयाने असं केलंय म्हणून आम्ही तसं करायला जात नाही… थोडक्यात आम्ही आमच्या अकलेचं अंथरूण बघूनच पाय पसरतो… तुम्ही काय करता? आधीच्या जावयाची अक्कल काढून स्वतःची अक्कल दाखवता? की सगळ्यांना ‘अडाणी’ समजून, हा आमचा ‘निजी मामला’ आहे म्हणत सारवासारवी करता?
जिथे पापी जास्त तिथे महापुरुष जास्त, असं ओशो रजनीश म्हणायचे. आपल्या देशात इतके महापुरुष होऊन गेले, त्याचं हे स्पष्टीकरण पटतं का तुम्हाला?
– नरेश पाटकर, म्हसवड
मुळात महापुरुषांबद्दल बोलायला आम्ही ‘स्वयंघोषित’ सुद्धा महापुरुष नाही.. पण सर्वसामान्य माणूस म्हणून असं वाटतं, की ‘महापुरुषांचं महत्त्व आपल्याला ते गेल्यावरच पटतं…’ आता आम्हाला जे वाटतं ते तुम्हाला पटतं? (यावर ओशो असं म्हणतात, जे म्हणायचंय ते त्यांच्या तोंडी घालू नका.. तुमचं सांगा!)