मराठी रंगभूमीवरील नवनवीन प्रयोग आणि अनोख्या संकल्पनांमध्ये ‘मि. ४२०’ या नव्या नाटकाची भर पडणार आहे. आमच्या नाटकातून प्रेक्षक मनोरंजनासोबतच काहीतरी विचार घरी घेऊन जाईल, हे वैशिष्ट्य आहे, असे लेखक संतोष जगताप म्हणाले. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा समजुतीने कामधंदा न करता उधार उसनवारी करत दिवस ढकलणार्या, चारसो बीसी करून याची टोपी त्याला फिरवणार्या माणसाची गोष्ट आम्ही गंमतीदार पद्धतीने मांडली आहे, हे नाटक म्हणजे गमतीजमतींनी भरलेला ‘गोड घोटाळा’ आहे, असे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शक प्रदीप वेलोंडे म्हणाले की हे फ्री फॉर्म मधील नाटक असल्याने सर्व कलाकार अष्टपैलू असावे ही संहितेची मागणी होती. रात्री दोन वाजता विनोदवीर भूषण घाडी यांना फोन करून ही भूमिका तुम्ही करताय, हे सांगितले. निकिता सावंतचा अवखळपणा नाटकातील भूमिकेला अनुरूप आहे. दक्षता जोईल ही गुणी अभिनेत्री मालिकेमुळे लोकप्रिय झाली असली तरी एकांकिका स्पर्धांमधील तिचं काम मला भावलं होतं. अभिनेता अक्षय पाटील याच्या चेहर्यातील निरागसपणा या नाटकातील भूमिकेला साजेसा होता. डॉ. संदीप वंजारी, प्रदीप वेलोंडे यांनीही भूमिका साकारल्या आहेत.
श्री दत्तविजय प्रॉडक्शनचे हे सोळावे नाट्यपुष्प आहे. निर्माते अरविंद घोसाळकर म्हणाले की नवीन कलाकाराला संधी देणं ही आमच्या संस्थेची खासियत आहे. यदाकदाचित, हम पाँच, लाली लीला, यंदा कदाचित, यदा कदाचित रिटर्न्स अशा आमच्या नाटकांतून अनेक नवीन कलाकार मनोरंजन क्षेत्राला मिळाले आहेत. अत्यंत बिझी असलेले कलाकार टाळून तितक्याच गुणवत्तेचे पण थोडं कमी नाव असलेले कलाकार आम्ही घेतो, त्यामुळे तारखांची अडचण होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
अभिनेत्री दक्षता जोईल म्हणाल्या, मी महाविद्यालयीन स्पर्धेत एकांकिका करतच या क्षेत्रात आले आहे. मला मालिकेची संधी आधी मिळाली म्हणून मी तिथे गेले, पण मी मनातून रंगकर्मीच आहे. मी आजवर कधी विनोदी भूमिका साकारली नाही, त्यामुळे दिग्गज विनोदी कलाकारांसोबत काम करताना टायमिंगची कसोटी लागतेय. देखणे अभिनेते अक्षय पाटील म्हणाले, की राजा व्यक्तिरेखेच्या विविध छटा रंगभूमीवर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांना हे नाटक पाहून त्यांच्या आजूबाजूला ४२० वृत्तीचा पाहिलेला एखादा राजा नक्कीच आठवेल.
महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना आणि दत्ता भाटकर यांची रंगभूषा लाभलेल्या या नाटकाची निर्मिती डॉ. संदीप वंजारी आणि संजय कुमार यांनी केली आहे.
– नाटकवाला