पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच झाला. तो कशासाठी होता, याचं उत्तर या दौर्याचा खर्च जिच्या पैशातून झाला त्या भारतीय जनतेला कधी मिळणार नाही… मोदी यांनी देशासाठी दौरा केला, असं म्हणावं, तर या दौर्यातून भारताच्या हिताचा एक तरी निर्णय झाला का?
अमेरिकेच्या अध्यक्षपदी मोदींचे एकतर्फी मित्र ‘माय फ्रांड डोलांड’ विराजमान झाल्यापासून भारताला हीन वागणूक देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो मोदींच्या अमेरिका भेटीतही कायम राहिला. ट्रम्प यांनी मोदींसाठी खुर्ची ओढली वगैरे बालिश माहिती फोटोसह फिरवून मोदींचे भक्त गेलेल्या अब्रूवर पाला घालण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. पण, व्हाइट
ऑफिसमध्ये आलेल्या सगळ्या नेत्यांसाठी ट्रम्प हे करतातच, तो प्रोटोकॉलचा भाग असतो. याच प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या थोर मित्राचं स्वागत करायला ट्रम्प विमानतळावर तर गेले नाहीतच, व्हाइट हाऊसमध्येही मोदींचं स्वागत कुणा दुय्यम अधिकारी महिलेनेच केलं. ट्रम्प मोठ्या तोंडाने मोदींना वुई मिस्ड यू असं म्हणाले, ते त्यांची फार आठवण येऊन उचक्या लागत होत्या, म्हणून नव्हे, तर सत्ताग्रहण समारंभाला तुम्हाला जाणीवपूर्वक टाळलं गेलं होतं, याची आठवण करून द्यायला! मिस्टर प्राइम मिनिस्टर, यू आर ग्रेट असं ट्रम्प म्हणतात, तेव्हा ते मोदींबद्दल बोलत नसतात, ते ग्रेट म्हणतायत ते सव्वाशे कोटींची बाजारपेठ असलेल्या भारताला आणि त्या देशाच्या संवैधानिक सर्वोच्च पदाला.
मोदीकाळातला भारत देश ट्रम्प यांना आणि अमेरिकेला ग्रेट वाटतो का, हे या काळातली अमेरिकेतली वर्तमानपत्रं आणि त्यांनी मोदी भेटीला दिलेलं नगण्य कव्हरेज पाहिल्यावर लक्षात येतं. त्यांच्यासाठी भारत ग्रेट आहे ते फक्त एक बाजारपेठ म्हणून. इतर बाबतीत भारत ग्रेट वाटावा, अशी कोणतीही कामगिरी भारताने मोदीकाळात केलेली नाही आणि अमेरिकेला दखल घ्यावीशी वाटेल असा पाठीचा कणाही दाखवलेला नाही. पं. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत की डॉ. मनमोहन सिंग असोत किंवा अगदी मोदी यांचे पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी असोत, भारताशी आणि भारतीय पंतप्रधानांशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत अमेरिकेने आधी केली नव्हती. १९७१ साली संघर्षाचा काळ होता तेव्हा, तेव्हा इंदिरा गांधींनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ठणकावून सांगितलं, भारत अमेरिकेला आपला मित्र मानतो, आपला बॉस नव्हे. स्वत:चे भवितव्य स्वत: लिहिण्याची क्षमता भारतात आहे. परिस्थितीनुरूप एकमेकांशी कसे वर्तन करायचे ते आम्हाला माहिती आहे. अमेरिकेच्या आरमार धाडण्याच्या धमकीची पर्वा न करता त्या दुर्गेने पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते.
आज काय चित्र आहे? चीनने बळकावलेली भारताची भूमी त्यांच्याच ताब्यात आहे, त्यात गावं वसवली गेली आहेत. प्रिय मित्र अदानीच्या नफ्यासाठी भारत पाकिस्तान सीमेची सुरक्षा धोक्यात घालण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली आहे. ज्या देशांकडून भारताला सर्वाधिक धोका आहे, तिथे आपण हे धोरण स्वीकारलं असेल, तर अमेरिका आपल्याला किंमत कशी देईल? मेक्सिको, ग्वाटेमाला, कोलंबिया यांच्यासारखे देश अमेरिकेच्या दादागिरीला आव्हान देतात, तुम्ही आयातकर वाढवाल तर आम्हीही तो वाढवू असं डोळ्याला डोळा भिडवून सांगतात. कोलंबिया अमेरिकेच्या, कोलंबियन घुसखोरांना घेऊन येणार्या विमानाला आपल्या भूमीवर उतरण्याची परवानगी देत नाही, त्यांना मानवी वागणूक देण्याची भूमिका घेते. आपल्याकडचे बोटचेपे सर्वोच्च नेते आणि मंत्री ‘बेकायदा वास्तव्य करणार्यांच्या बाबतीत नियमानुसार कारवाई होतेच’ अशा शब्दांत लोटांगण घालतात (जणू भाजपच्या काळात भारतात काटेकोर कायद्याचं राज्यचं चालू आहे!)… मग तिथे भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व मानतो, वगैरे उदात्त भाषणबाजी कशासाठी केली गेली? मुळात एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी सीएए आणि एनआरसी हे वादग्रस्त कायदे आणणार्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहिमा चालवणार्या राजवटीने ‘वसुधैव कुटुंबकम’ वगैरे न झेपणारी आणि न शोभणारी आदर्शवादी वचनं सांगावीत कशाला?… मोदी अमेरिकेत होते तेव्हा भारतीय घुसखोरांची पुढची तुकडी पुन्हा लष्करी विमानाने आणि बेड्या घालूनच पाठवण्यात आली. सुरक्षेचे कारण दाखवून शीख नागरिकांच्या पगड्याही उतरवण्यात आल्या. मोदींनी भारतीयांना अशी हीन वागणूक दिली जाऊ नये, यासाठी चकार शब्द उच्चारला का? मुळात त्यांना एक उद्योगपती मित्र सोडल्यास इतर भारतवासीयांबद्दल प्रेम, करुणा किमान आपलेपणा तरी आहे का? आपण केलेल्या अडाणी नोटबंदीच्या काळात ऐन लग्नसोहळ्यांमध्ये मुलींच्या बापांची कशी पंचाईत झाली, याचं जपानला जाऊन स्टँड अप कॉमेडी शैलीत वर्णन करून हसणार्या असंवेदनशील नेत्याकडून ही अपेक्षा जरा जास्तच झाली म्हणायची!
मग मोदींनी अमेरिकेत जाऊन केलं काय? त्यांच्या प्रिय मित्रावर अमेरिकेत होणारी कारवाई स्थगित होईल, अशी पक्की खात्रीही त्यांना तिथे मिळालेली नाही. असल्या व्यक्तिगत कामांसाठी देशांचे नेते एकमेकांना भेटत नाहीत म्हणे! पण मग ते भेटतात कशासाठी? अमेरिका आयात-निर्यातीसंदर्भात जे जे निर्बंध लादेल, आदेश देईल, ते निमूटपणे स्वीकारण्यासाठी?
डॉलर विकून रुपयाची इभ्रत वाचवली जात असताना इलॉन मस्क ज्यांना भंगार म्हणतो ती एफ ३५ विमानं आणि अशी इतर संरक्षण सामुग्री खरेदी करण्यासाठी?
भारतातल्या दुर्बलांपुढे बेटकुळ्या काढून दाखवणार्यांची त्यांच्यापेक्षा मोठ्या धटिंगणाशी गाठ पडली की त्यांचा कणा कसा लिबलिबीत होतो, त्याचं लाजिरवाणं दर्शन घडवण्यापलीकडे या दौर्याने साधलं तरी काय?