बरा कुणबी केलो ।
नाही तरी दंभेची असतो मेलो ।।१।।
भले केले देवराया ।
नाचे तुका लागे पाया ।।२।।
विद्या असती काही ।
तरी पडतो अपायी ।।३।।
सेवा चुकतो संतांची ।
नागवण हे फुकाची ।।४।।
गर्व होता ताठा ।
जातो यमपंथे वाटा ।।५।।
तुका म्हणे थोरपणे ।
नरक होती अभिमाने ।।६।।
तुकोबाराय त्यांच्या अनेक अभंगातून देवाशी संवाद साधतात. त्याच्या विरहात व्याकुळ होऊन अभंग रचतात. करुणापर अभंगातून त्याची आळवण करतात. या करुणापर आणि विरहपर अभंगात त्यांचा देवाशी वाद चाललेला असतो. वरच्या अभंगात मात्र तुकोबाराय देवाला ‘थँक्स’ म्हणत आहेत. देवाचे आभार मानणारा हा अभंग आहे. या अभंगात फार मोठी ताकद आहे. नवा विचार आहे. तुकोबाराय देवाला थँक्यू म्हणत आहेत ते त्यांना कुणबी म्हणून जन्माला घातलं यासाठी. कुणबीपणाचा सन्मान करणारा हा अभंग आहे. खरं तर या अभंगात कुणबीपणाचा सन्मान तर आहेच पण त्याचबरोबर माणूसपणाचाही सन्मान आहे. समतेची शिकवणही आहे.
संतांच्या काळात जातीविषमता अत्यंत तीव्र होती. साहजिकच खालच्या मानल्या गेलेल्या जातीतला जन्म अनेकांना त्रासदायक वाटत होता. कोणतीही चूक नसताना अपमानाचे आणि अवहेलनेचे चटके हयातभर सोसावे लागत होते. त्यामुळे बहुजन जातीतल्या लोकांच्या मनात न्यूनगंडाची भावना होती. त्या भावनेला तुकोबाराय छेद देतात. त्यांच्या मते कुणबी असल्यामुळेच दंभ निर्माण होणार नाही. उच्चवर्णीय लोक वर्णाभिमानामुळे दांभिक बनतात. कोणत्याही कर्तृत्वाशिवाय सन्मान मिळत असल्यामुळे उद्दाम बनतात. तुकोबांना नेमकं हेच नको आहे.
वारकरी संप्रदाय सामाजिक समतेचे तत्त्व सांगतो. त्यामुळे ज्यांना वर्णव्यवस्थेत विशेषाधिकार आहेत असे लोक या संप्रदायात सहसा येत नाहीत. वारकरी संप्रदायात बहुजन समाजातल्या लोकांचाच सहभाग जास्त असतो. साहजिकच उच्चवर्णातला जन्म हा वारकरी संप्रदायातल्या प्रवेशाला प्रतिकूल ठरतो. अर्थात जातभावनेवर मात करण्याचं सामर्थ्य असणारा ब्राह्मण वारकरी संप्रदायिक बनू शकतो. तो आदर्श एकनाथ महाराज आणि निळोबारायांसारख्या समतावादी संतांनी ब्राह्मणांसमोर ठेवला आहे. बहुजन समाजातला जन्म मात्र तुलनेने वारकरी संप्रदायातल्या प्रवेशाला अनुकूल आहे. त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात की, ‘देवा तू मला कुणबी म्हणून जन्माला घालून भलं केलं. त्यामुळे वारकरी संप्रदायात येता आलं. कीर्तनाच्या रंगात नाचून तुझ्या पाया पडता आलं. थोडीफार विद्या असली असती तर त्याचा अपाय झाला असता. संतांची सेवा चुकली असती. फुकटची नागवण झाली असती. गर्वाने ताठ होऊन वागलो असतो. थोरपणाच्या अभिमानाने नरकाची वाट धरावी लागली असती.’
इथे विद्येचा अर्थ वेदविद्या असा आहे. कुणबी असल्यामुळेच रुढार्थाने वेदांचा अधिकार नाही. ‘घोकाया अक्षर । मज नाही अधिकार ।’ असं तुकोबाराय म्हणतात. वेदांचा अधिकार नसल्यामुळे वेदविद्येत पारंगत असल्याच्या अभिमानाचाही प्रश्न नाही. कुणबी झाल्यामुळे अभिमानापासून दूर राहण्याची संधी मिळाली असं तुकोबांना वाटतं. इथे कुणबी हा शब्द ‘स्त्रीशूद्रातिशूद्र’ या समूहातला एक भाग म्हणून आलाय. आज याच समूहाला बहुजन अशी संज्ञा मिळाली आहे. अशाच अर्थाचा तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे. ‘शूद्रवंशी जन्मलो । म्हणोनी दंभे मोकलीलो ।’ असा हा अभंग आहे. या अभंगात फक्त कुणबीऐवजी शूद्र असा शब्द आलाय. आशय अर्थातच समान आहे. याचा अर्थ ‘कुणबी’ हा शब्द ‘शूद्रातिशूद्र’ या समूहाचा भाग या अर्थानेच आलेला आहे. कुणबी हा शब्द श्रमकरी-कष्टकरी या व्यापक अर्थानेही घेता येईल.
आपल्या भारतीय समाजात श्रमकर्यांना प्रतिष्ठा नाही. त्यामुळेच शेतकर्यांनाही ‘कुणबट’ म्हणूनच हिनवलं गेलंय. सारे श्रमकरी केवळ अपमानाचे आणि अवहेलनेचे धनी बनले आहेत. सारी प्रतिष्ठा आणि मानसन्मान केवळ पोपटपंची करणार्या पंडितांच्या वाट्यालाच आहे. त्याला छेद दिला तो साधुसंतांनी. सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरित्रातही असाच एक प्रसंग आहे. तो लीळाचरित्रात आला आहे. चक्रधर स्वामी त्यांच्या शिष्यांसह भटकंती करत असत. एकदा असंच संचार करत असताना ते एका शेताजवळ थांबले. तिथे एक शेतकरी नांगर सोडून झाडाखाली पाणी पित बसला होता. ते पाहून चक्रधर स्वामी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, ‘तुम्हाला नांगर हाकता येईल काय?’ त्यावर एका शिष्यानं नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते का, असं म्हणत नांगर हातात घेतला. त्याला नांगर हाकता आला नाही. त्यानंतर स्वामींनी नागदेवाचार्यांना विचारलं. नागदेवाचार्य अगोदर शेतीच करत असत. त्यांनी नांगर हाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही नीट जमलं नाही. शेवटी चक्रधर स्वामींनी अत्यंत व्यवस्थितपणे नांगर हाकून दाखवला. त्यांनी त्यांच्या या कृतीतून नांगर हाकणं ही ब्रह्मविद्येइतकीच श्रेष्ठ विद्या असल्याचं दाखवून दिलं. आपल्याकडे ब्रह्मविद्येला म्हणजे तत्वज्ञानाला फार सन्मान दिलेला आहे. कष्टकर्यांच्या कौशल्यांची मात्र आपण कधीच दखल घेतलेली नाही. याउलट चक्रधर स्वामी मात्र कुणब्यांच्या शेतीतल्या कामालाही ब्रह्मविद्येचा दर्जा देतात. त्या कृषीकौशल्याचा सन्मान करतात. तुकोबांनीही या अभंगातून तेच केलेलं आहे. कुणबी झाल्यामुळे सेवेचा आणि कष्टाच्ाी सवय होते असं तुकोबांना म्हणायचं आहे.
आपल्या भारतीय समाजात शेतकरी-कष्टकर्यांकडे उपेक्षेच्या नजरेने पाहिलं गेलं आहे. अक्षरविद्या तेवढी श्रेष्ठ मानून करोडो निरक्षरांच्या कौशल्याचे आणि प्रतिभेचे कोंभ कापले गेले आहेत. तरीही श्रमाच्या घामाने त्यांची प्रतिभा मात्र वेळोवेळी दिसते. रुढार्थाने अक्षर ओळख नसलेल्या अनेक लोकांनी थोर काम केलेलं आहे. बहिणाबाई चौधरी या अशाच कवयित्री. रानामाळात काम करणार्या शेतकरी बाई. त्यांना साधी अक्षरांची ओळखही नव्हती. तरीही त्यांच्या कविता थोर दर्जाच्या आहेत. त्यांच्या कविता म्हणजे ‘बावन्नकशी सोनं’ आहे असं आचार्य अत्रे म्हणाले होते. त्याचप्रमाणे गाडगेबाबांचं उदाहरण देता येईल. शाळेची पायरीही न चढलेल्या गाडगेबाबांच्या कीर्तनाची जादू भल्याभल्यांना मोहित करणारी होती. पूर्वीच्या काळी बहुजन समाजात शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता. त्यामुळे वारकरी लोक सहसा निरक्षर असत. निरक्षर असूनही केवळ मौखिक परंपरेतून आलेले संतांचे अभंग नीटपणे पाठ करत. हजारो अभंग पाठ असलेले अनेक निरक्षर वारकरी त्या काळात तत्त्वप्रचुर कीर्तन करत. अर्थात या वारकर्यांना अडाणी आणि खेडूत म्हणून हीन लेखणारे त्या काळातही होतेच. तरीही शेकडो वर्षं वारकरी परंपरा टिकवली ती याच निरक्षर लोकांनी. ‘अक्षरे आणती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावे ।’ असं तुकोबाराय म्हणतात. अक्षरे शिकली की माणसाला पूजनीय होण्याची आणि स्वत:चा गौरव करून घेण्याची जाणीव वाढत जाते. ज्ञानाचा दंभ वाढत जातो आणि प्रतिभेचे कोंभ आपोआप सुकत जातात. सेवेची वृत्ती संपून जाते. त्यामुळेच तुकोबाराय कुणबी म्हणून जन्माला घातलं ते बरं केलं असं म्हणतात.
‘विद्या असती काही । तरी पडतो अपायी।’ हे तुकोबारायांचे उद्गार आज समजून घेण्याची गरज आहे. थोडीफार जरी विद्या आली तरी अहंकार वाढत जातो. त्यामुळेच विद्येचा अधिकार नसलेल्या कुणब्याच्या कुळात जन्माला घातलं म्हणून तुकोबा देवाचे आभार मानत आहेत. वास्तविक पाहता अक्षरविद्या गरजेची आहेच. तिचा अधिकारही आवश्यक आहेच. तुकोबारायांनाही त्याची जाणीव होती. तरीही तुकोबा विद्येचा अधिकार मिळाला असता तर अपाय घडला असता असं म्हणतात, कारण विद्येतून विवेक जन्माला येण्याऐवजी अहंकार जन्माला येतो. ‘विद्येविना मती गेली’ अशी एक महात्मा फुल्यांची रचना आहे. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले’ अशी ती रचना आहे. त्या रचनेचा सार म्हणजे ‘शूद्रांच्या मागासलेपणाचं कारण अविद्या आहे’ असं ज्योतिबा सांगत आहेत. त्याचवेळी तुकोबा मात्र शूद्रवंशात जन्माला आल्यानं विद्येचा अपाय घडला नाही असं म्हणतात. एकीकडे ज्योतिबा विद्येला बहुजनांच्या प्रगतीचा ‘उपाय’ म्हणतात तर तुकोबा त्याला ‘अपाय’ म्हणतात. यात वरकरणी विसंगती दिसते. पण दोघांच्याही रचनांचं अंत:सूत्र मात्र समान आहे. दोघांनाही एकच सांगायचं आहे. महात्मा फुल्यांच्या मते विद्येतून नीती, मती आणि गती यायला हवी. ज्या विद्येतून नीती, मती आणि गती येत नाही ती विद्या काहीही उपयोगाची नाही.
तुकोबारायांच्या काळात ज्यांना विद्येचा अधिकार होता, त्यांना विद्येतून नीती आणि मती आलीच नव्हती. त्यांना विद्येतून फक्त अहंकार आला. इतरांवर वर्चस्व लादण्याची प्रवृत्ती आली. विद्येचा वापर इतरांच्या उद्धारासाठी नव्हे तर फसवणुकीसाठी केला गेला. त्यामुळेच तुकोबांना ती विद्या हा ‘अपाय’ वाटला. ज्योतिबांनाही हेच वाटत होतं. त्यांना ‘काट्यानेच काटा’ काढायचा होता. ज्या अक्षरविद्येच्या बळावर विद्याधारकांनी बहुजन समाजाला गुलाम बनवलं आहे तीच विद्या संपादन करून बहुजनांनी त्या गुलामीतून मुक्त व्हावं हा ज्योतिबांचा होरा होता. बहुजन समाजाने विद्येतून नीती आणि मती प्राप्त करावी असं महात्मा फुल्यांना वाटत होतं. त्यानुसार त्यांनी आणि पुढे त्यांना मानणार्या शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा आणि कैकाडीबाबा अशा अनेक महामानवांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केले.
त्या विद्येचा काही काळ ‘उपाय’ म्हणून वापर झालाही पण लगेच त्याचा ‘अपायही’ समोर यायला लागला. ‘शिकला तो हुकला’ असं काहीतरी घडू लागलं. पोटापाण्यासाठी आणि रोजीरोटीसाठी शिक्षण आहे असाच सर्वांचा समज आणि भ्रम झालाय. विद्येतून फुल्यांना अपेक्षित असलेली नीती आणि मती गायब झालीय. बहुतेकांना शिक्षणातून फक्त पैसा हवाय. एकदा पैसा आला की विद्येचा आणि पैशांचा अहंकार आलाच. त्यातून इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्तीही आली. वास्तविक पाहता शिक्षण हे एक साधन आहे. त्याचं साध्य पैसे कमावणं नसून विवेक कमावणं आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. विवेक आला की अक्षरविद्या हे एक साधन आहे हे लगेच समजतं. त्यामुळे अक्षरविद्येचा अहंकारही आपोआप गळून पडतो. इतर विद्यांचं श्रेष्ठत्व कळण्यासाठी अक्षरविद्या हे एक साधन आहे. ‘शत व्याखानाहूनी एक हात भू नांगरणे श्रेष्ठ आहे’ असं विनोबा म्हणतात त्याचा गाभा याच अभंगात सामावला आहे. नांगर हाकण्याची विद्याही ब्रह्मविद्येइतकीच श्रेष्ठ आहे असं सांगणारी ‘लीळा’ चक्रधर स्वामींनी यासाठीच करून दाखवली होती. या अभंगातूनही तुकोबा तेच सांगत आहेत.
तुकोबारायांचा हा अभंग अनेकांना प्रेरणा देणारा आहे. जेव्हा राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रसंगाचा सामना करावा लागला तेव्हा याच अभंगाने त्यांना प्रेरणा दिली. महाराजांना सनातनी पुरोहितांनी वेदोक्त मंत्राचा अधिकार नाकारला. ते जातीने शूद्र आहेत असं मानून त्यांना वेदमंत्राचा आणि अर्थातच वेदविद्येचा अधिकार नाही असं सांगितलं गेलं. त्यावेळी महाराजांना प्रचंड मन:स्ताप झाला. शाहू महाराज अस्वस्थ झाले तेव्हा त्यांना तुकोबांचा ‘बरा कुणबी केलो।’ हा अभंग आठवला. तुकोबांसारख्या साधूपुरुषालाही हे सनातनी लोक शूद्र मानत होते तर ते आपल्यालाही त्रास देणारच हे महाराजांना समजलं. शाहू महाराज समाधानी झाले. हा प्रसंग वासुदेवराव तोफखाने यांनी शाहू महाराजांच्या चरित्रात नोंदवून ठेवला आहे. तुकोबांचा एखादा अभंगही महामानवांच्या जडणघडणीला कारणीभूत ठरतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.
– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर