क्लासिक बाळासाहेब शैलीतलं हे मुखपृष्ठचित्र आहे. याची रचना नवोदित व्यंगचित्रकारांनी अनुभवावी अशी आहे. खुर्चीच्या स्प्रिंगचं चित्रण पाहा विशेषकरून. तिचं उपसून निघून समोर येणं, त्यातला वेग, त्यातली अॅक्शन स्थिरचित्रातही आपल्याला दिसते, जाणवते, हे थोर व्यंगचित्रकाराचं कसब. विषय आहे कशाची तरी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तर द्यायचा आहे, पण ते सोडवत तर नाहीये, अशी ही अवस्था. १९६९च्या या मुखपृष्ठचित्रात कासू ब्रह्मानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशाचे तेव्हाचे मुख्यमंत्री दिसत आहेत. त्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवरून पेटलेलं आंदोलन बळाचा वापर करून चिरडून टाकलं होतं. जवळपास ३७० तरुणांचे, विद्यार्थ्यांचे बळी घेणार्या या आंदोलनाच्या अयोग्य हाताळणीवरून राजीनामा देण्याचा दबाव त्यांच्यावर होता. तेव्हा त्यांनी केलेल्या कसरतींचं हे चित्रण आहे. आपल्या काळात झालेल्या गैरप्रकाराची किंवा आरोपाची जबाबदारी घेऊन, इच्छा असो वा नसो, राजीनामा देण्याची पद्धत तेव्हा होती. आताही असेच गैरप्रकार होत असतात, फक्त त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. ज्याचं त्याचं नशीब, सरकार सगळीकडे कसं पुरे पडणार, लोकांना कळायला नको का, इथपासून मोक्ष मिळाला, अशी कोणतीही स्पष्टीकरणं दिली जातात माणसं मरतात तेव्हा. त्यावर जिवंत माणसंही माना डोलावतात हे विशेष. महाराष्ट्रात तर राजीनाम्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा असं पक्षाध्यक्ष सांगतात, पक्षाध्यक्ष सांगतील ते मी करीन, असं ज्याने राजीनामा दिला पाहिजे तो सांगतो, मुख्यमंत्री या दोघांनाही काही सांगत नाहीत, असा एकमेकांकडे उशी पास करण्याचा खेळ असतो, तोच खेळला जातो सध्या.