देशातील एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक असा लौकिक असलेल्या ‘मार्मिक’च्या ६१व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’च्या आठवणींना उजाळा दिला, आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले व्यंगचित्रकलेचे अनमोल धडे सांगितले आणि मराठी माणसाच्या लढ्यातील, शिवसेनेच्या इतिहासातील ‘मार्मिक’चे योगदान उलगडून सांगितले… त्यांचे हे मार्गदर्शन ‘मार्मिक’च्या वाचकांसाठी खास… जसेच्या तसे.
—-
बरेच दिवस झाले भाषण करण्याची सवय आता जात चाललेली आहे. सभा, समारंभ यांची जी सुरुवात असते, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… साहजिकच आहे या वाक्याशिवाय आपली भाषणाची सुरुवात होऊच शकत नाही.
सर्वप्रथम मी या दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित असणार्या सर्वांना ‘मार्मिक’ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. नेहमी आपण हा सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात साजरा करायचो. नंतर षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करण्याची आपली परंपरा आहे. पण गेली दोन वर्षे हे जे शुक्लकाष्ठ मागे लागलंय कोरोनाचं, त्याच्यामुळे या माध्यमातून आपण तो साजरा करतोय.
‘मार्मिक’च्या जन्माची कथा आपणही (मा. उद्योग मंत्री सुभाष देसाई) सांगितलीत, बर्याच जणांना त्याची माहितीसुद्धा आहे. पण अनेकजण या पिढीतले असे आहेत त्यांना त्याची तशी कल्पना नाहीये. मघाशी आपण सर्वांना म्हणजे मा. शिवसेनाप्रमुख, प्रबोधनकार, माझे काका श्रीकांतजी यांना अभिवादन केलं. आत्ताच आपण ‘मार्मिक’बद्दलचं सादरीकरण, स्किट (याला मराठीत काय म्हणतात हा वेगळा विषय आहे) पाहिलंत. ते पाहिल्यानंतर मला प्रमोद नवलकरांची आठवण आली. प्रसाद खांडेकरला बघून… नवलकरांचासुद्धा मोठा सहभाग या ‘मार्मिक’च्या वाटचालीत आहे. तसं पाहिलं तर सर्व शिवसैनिकांचाच मोठा सहभाग ‘मार्मिक’च्या वाटचालीमध्ये आहे. ‘मार्मिक’ने नेमकं काय दिलं? एक आत्मविश्वास दिला. या स्किटच्या माध्यमातून आपल्यासमोर एक प्रेरणा देण्याचा जो प्रयत्न झाला की नोकरी सोडा आणि व्यवसायाकडे वळा- हे सांगायला खूप सोपं आहे, पण करणं खूप अवघड असतं. हेसुद्धा शिवसेनाप्रमुखांनी करून दाखवलं आणि मग लोकांना सांगितलं. ते स्वत: व्यंगचित्रकार म्हणून ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये होते. त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वत:चं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं.
काळ हा नेहमी आव्हानात्मकच असतो. त्याही वेळेचा होता आणि आताचाही आहे. त्याही वेळेला स्वत:चं साप्ताहिक सुरू करणं, तेही व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करणं हा विचारच मुळात धाडसाचा होता. पण कशामुळे ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाची कल्पना समोर आली? असं काय होतं नेमकं? स्वत: बाळासाहेब आणि माझे काका व्यंगचित्रकार तर होतेच. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ते मावळा या नावाने ‘नवयुग’ आणि ‘मराठा’मध्ये व्यंगचित्रे काढायचे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई घेऊन महाराष्ट्राने यशस्वी केला. त्यालादेखील ६०-६१ वर्षे झालेली आहेत. मग मुंबई मिळवली खरी, पण त्यानंतर सतत लढा लढा लढा, संघर्ष सुरू राहिला. मराठी माणसाला कुणी आळशी म्हणत असेल, मराठी माणूस व्यवसाय करत नाही असं कुणी म्हणत असेल; हा समज असेल किंवा ते खरेही असेल, पण मराठी माणूस लढ्यासाठी मात्र कधीही मागे हटत नाही. मागेपुढे पाहात नाही. जर अन्याय असेल तर तो करणारा कितीही मोठा असेल, त्याच्या छाताडावर वार करण्याची हिंमत या मराठी माणसाने पिढ्यानपिढ्या दाखवली आहे. ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही राहणार आहे. अशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं ते आंदोलन यशस्वी झालं. मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
मग बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांनी आणि माझ्या काकांनी असा विचार केला की, सतत लढणार्या मराठी माणसाच्या आयुष्यात थोडा एक काहीतरी विरंगुळ्याचा क्षण हा आला पाहिजे. कारण रोजचे जे पेपर असायचे, आजही साधारण तसंच आहे- दुर्घटना असली की मोठी हेडलाईन असते, चांगल्या बातम्या या छोट्या असतात. वाईट घटनेची बातमी ही मोठी असते. मग कुठे अपघात, घातपात वगैरे अशा बर्याच गोष्टी असायच्या. तेच तेच बघून त्यातून चेतना कशी मिळणार? त्या एका विचारातून ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला.
सुरुवातीला त्याचं स्वरूप मराठी माणसाचं नाही म्हटलं तरी थोडंसं मनोरंजन करायचं असं होतं, जरूर होतं. पण पाहता पाहता ही परिस्थिती लक्षात आली की मराठी माणसावर त्याच्याच घरामध्ये परप्रांतीय त्याच्या हक्कांवर आक्रमण करताहेत. मग ती मनोरंजनाची जागा मनोव्यथा व्यक्त करणारी झाली. अन्यायावर धारदार वार करणारी झाली. त्यातून पाहता पाहता एक चळवळ निर्माण झाली. लढा निर्माण झाला. संघटना जन्माला आली. तिचं नाव शिवसेना… जी मी आज माझ्यासमोर बघतोय. चांदा ते बांदा, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक हे माझ्या स्क्रीनवर मला दिसताहेत. ही मोठी चळवळ या व्यंगचित्रांतून निर्माण केली गेली. अनेकदा मी सांगितलेलं आहे, बरेचजण हेही मानतात की कदाचित नव्हे, नक्कीच शिवसेना ही एकमेव संघटना अशी आहे, जी एका व्यंगचित्रकाराने आपल्या व्यंगचित्रांच्या जोरावर उभी केली. पाहता पाहता तिची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात पोहोचली.
एक व्यंगचित्रकार नुसत्या ब्रशचे फटकारे वापरून काय करू शकतात याच्यापेक्षा दुसरं जास्त मोठं उदाहरण मला तरी आठवत नाहीये. हां. एक मात्र नक्की, व्यंगचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख ज्यांना आपले गुरू मानायचे ते डेव्हीड लो… दुसर्या महायुद्धाच्या काळामध्ये मूळचे न्यूझीलंडचे डेव्हीड लो ब्रिटनमध्ये जाऊन स्थायिक झाले. तिथून ते हिटलरवर फटकारे मारायचे. त्यांनी हिटलरला एवढं बेजार केलं की असं म्हणतात, हिटलर एवढा त्रासला त्यांच्या व्यंगचित्रांनी की त्यांनी त्यांच्या सहकार्यांना आदेश दिला होता की हा कोण आहे व्यंगचित्रकार… यांना जसा असेल तसा… हिंदी पिक्चरमधला डॉयलॉग आहे ना, जिंदा या मुर्दा लेके आओ उसको… ही व्यंगचित्रकारांची आणि व्यंगचित्रांची ताकद आहे.
काहीजणांना वाटत असेल की काहीही वेड्यावाकड्या रेषा जरी मारल्या की व्यंगचित्र होतं. पण तसं नाहीये. अजिबात तसं नाहीये. व्यंगचित्रामध्ये नुसत्या वेड्यावाकड्या रेषा असून चालत नाही. ‘व्यंग’ हा शब्द याला कितपत योग्य आहे हाही एक विषय होऊ शकतो, पण व्यंगचित्र म्हणजे दुसर्याचं नुसतं व्यंग काढणं नव्हे, व्यंग म्हणजे त्याच्या विचारातलं व्यंग, त्याच्या वागणुकीतलं व्यंग, त्याच्या निर्णयातलं व्यंग, ते व्यवस्थितपणे, सोप्यात सोप्या आणि कमीतकमी रेषांमध्ये दाखवणं हे मला वाटतं व्यंगचित्रकाराचं मोठं यश आणि मोठी कला आहे. मीसुद्धा सुरुवातीला काही काळ व्यंगचित्रं काढलेली आहेत ‘मार्मिक’मध्ये. आता व्यंगचित्रं सोडाच साधा कॅमेराही हातात घ्यायला वेळ मिळत नाही, तर ब्रश आणि पेन्सिल तर माझ्या हातून सुटून कित्येक वर्षे झालीत. पण पूर्वी मी व्यंगचित्रं काढत होतो. बाळासाहेबांसारखा गुरू लाभल्यानंतर आणखी काय पाहिजे जगामध्ये? तेव्हा त्यांनी मला काही धडे सांगितले होते. म्हणाले, बघ उद्धव हे लक्षात घे. एक चित्रकार आणि व्यंगचित्रकार यातला फरक काय? मी म्हटलं काय फरक आहे? ते म्हणाले, उत्कृष्ट व्यंगचित्रकार हा पहिल्यांदा उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे. ज्याला अॅनाटॉमी म्हणतो ते शरीरशास्त्र त्याला अवगत पाहिजेच. ड्रॉइंगमध्ये चेहरा आणि इतर शरीर कसं काढायचं, त्याचं प्रमाण काय आहे ते त्याला कळलंच पाहिजे. पण जो उत्कृष्ट चित्रकार असतो तो उत्कृष्ट व्यंगचित्रकार असेलच असे मात्र नाही. म्हणजे चित्रकाराच्या कलेच्या पुढचं एक पाऊल म्हणजे व्यंगचित्रकार.
चित्रकार काय करू शकतो? तो हुबेहूब पोट्रेट काढू शकतो. म्हणजे डोळे कसे आहेत, केस कसे आहेत, नाक कसं, कान कसे ते तो हुबेहूब काढू शकतो. आपण म्हणतो, काय हुबेहूब चित्र काढलंय. पण व्यंगचित्रकार त्याच्या पलिकडे जातो. म्हणजे मला आठवतंय, या बाळासाहेबांनीच सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. ते जेव्हा ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये होते, तेव्हा त्यांच्यासोबत इतर व्यंगचित्रकार होते त्यातला एक व्यंगचित्रकार एकदा खूप विचार करत बसला होता. काय करायचं, काय करायचं… बाळासाहेब म्हणाले मी सकाळपासून दुपारपर्यंत त्याच्याकडे बघत होतो. व्यंगचित्राचं माझं काम झालं होतं. तरीपण याचा हात काही हलत नव्हता. मग लंच टाईमच्या वेळेला मी त्याला विचारलं की काय रे काय पाहिजे? तो म्हणाला, नेहरू मला रडताना दाखवायचे आहेत. बाळासाहेब म्हटले, मग काय अडचण आहे? तो म्हणाला, नेहरू रडतानाचा रेफरन्स मिळत नाहीये. आता नेहरू रडतानाचा रेफरन्स कसा मिळणार? असा रडतानाचा फोटो, हसतानाचा फोटो असं नाहीये… एक साधारणत: देहयष्टी आणि चेहरा, नाक, डोळे, कान हे एकदा ठरल्यानंतर त्याच्यात वेगळे वेगळे हावभाव दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं खरं कसब आहे. मला आजही आठवतंय, ‘सामना’चा दसरा अंक होता. त्यात एक मुखपृष्ठ होतं. महिषासूरमर्दिनीचं चित्र काढायचं होतं. त्या चित्रात खाली पडलेला जो राक्षस होता ते हेगडे होते. तेव्हाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते ते. त्यांना या अँगलचा हेगडेंचा चेहरा मिळत नव्हता. बाळासाहेबांनी घेतला कागद आणि एका मिनिटामध्ये तो चेहरा काढून दिला. तर हे सगळं नसानसांमध्ये भिनलेलं असायला लागतं.
आज मला खरंच समाधान वाटतंय, माझंही वय ६१. ‘मार्मिक’चं वय ६१ आहे. कारण माझा जन्म १९६०चा, संयुक्त महाराष्ट्र संघर्ष १९६०चा आणि ‘मार्मिक’ही १९६०चा. १ मेला संयुक्त महाराष्ट्र, २७ जुलै माझा जन्मदिवस असतो आणि १३ ऑगस्ट हा ‘मार्मिक’चा. योगायोग म्हणजे आमचं वय… ‘मार्मिक’ आणि माझं वय हे ६१ आहे. दोघांनी नवीन रूपात महाराष्ट्राला आपली रूपं दाखवलेली आहेत. ‘मार्मिक’ नवीन रूपात आलाय आणि मलासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नवीन रूप धारण करावं लागलंय. मलाही कल्पना नव्हती की, माझं हे नवीन रूप मला आत्ताच दाखवावं लागेल. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी खांद्यावर घेतलीये. खांद्यावर घेतलेली जबाबदारी कधीच सोडणार नाही. मघाशी सुभाष देसाई म्हणालेच, जबाबदारी आणि संघर्षाला डरेल, तो मराठी माणूस कसला? आणि त्याच्यातून तो ठाकरे कसला? मी याच्या मागे लागलेलो नाही, पण जबाबदारी आली तेव्हा जबाबदारी टाकून पळणाराही मी नाहीये. कारण हे बाळासाहेबांनी जे मराठी माणसाला दिलं ते मला नाही देणार? ते घेऊनच मी मैदानात उतरलेलो आहे. दुसरं म्हणजे मला खरंच एका गोष्टीचं खूप समाधान आहे की, आता बोलायचं किती… कारण हा ६०-६१ वर्षांचा इतिहास आहे. टप्प्या टप्प्याने या सगळ्या गोष्टी आत्ता येथे बसल्यानंतर मला आठवताहेत.
देसाई साहेब, मघाशी जो तुम्ही उल्लेख केलात, तो ‘प्रेस’ हा खूप मोठा शब्द झाला. याला छापखाना म्हणू. असा एक छोटासा छापखाना दादरच्या शिवाजी पार्कला होता. याबाबत पंढरीनाथ सावंत सांगू शकतील किंवा दिवाकर रावते सांगतील. तिथला तो छापखाना, तिकडे खिळ्यांचा छापखाना होता. आता सगळे खट खट खट फोनवर टाईप करून मजकूर डायरेक्ट प्रिंटिंगला जाऊ शकतो. अग्रलेख वगैरेही तसा जाऊ शकतो. पण तेव्हाचा जो प्रेस होता, तो खिळ्यांचा प्रेस होता. ते खिळे जोडून मग प्रूफरीडींग व्हायचं. सगळं ओके आहे ना, ध चा मा होत नाहीये ना… र्हस्व दीर्घ सगळं बघून मग एक प्रूफ काढून त्याच्यावर ओके करून करून मग ते प्रिंटींगला जायचं. तिथे ‘मार्मिक’ची छपाई व्हायची. मग स्वत:चं हक्काचं मातोश्री मुद्रणालय आलं. आता आपलं स्वत:चं ‘सामना’चं प्रबोधन प्रकाशनचं मुद्रणालय.
अनेक संकटं आली… संकटं तर येतच असतात. पण संकटावरती विजय मिळवतो तो खरा मर्द असतो. माझ्या आजोबांचं जे वाक्य ‘संकटाच्या छाताडावर चालून जा’ ही खरी मर्दानगी आहे. ज्याच्या हातात हत्यार नाही, ज्याची शक्ती नाही त्याच्यावर वार करणं हे काही शौर्य नाहीये. तुल्यबळ लढत हे खरं शौर्य आहे. तेव्हाची आणीबाणीची जी एक आठवण सांगितली, तेव्हाही एक विचित्र असं बंधन ‘मार्मिक’वर होतं. ‘मार्मिक’वर बंदी नव्हती. पण ‘मार्मिक’च्या प्रेसला टाळं होतं. म्हणजे ‘मार्मिक’चं प्रकाशन करू शकता. म्हणजे काय… घरी नाही जेवायचं, घरी लॉक. बाहेर जाऊन जेवा. बाहेर जाऊन जेऊ शकता. अशी आणीबाणीची दहशत होती. त्या दहशतीखाली ‘मार्मिक’ कुणी छापायला तयार व्हायचं नाही. त्यावेळी वितरक ‘मार्मिक’ मार्केटमध्ये आणायला तयार नसायचे. तेव्हा दिवाकर रावतेंसारखे तरूण (म्हणजे आताही ते तरूणच आहेत) अक्षरश: हातगाडीवरून ‘मार्मिक’ बाजारात घेऊन जायचे. तर हे सगळे साथी, सोबती ‘मार्मिक’ने तयार केले. उभे केले. लढायचं नाही हा जो खाक्या होता तो बदलून ‘रडायचं नाही लढायचं’ ही जी एक भावना आहे, वृत्ती आहे ती ‘मार्मिक’ने दिली… त्याच ‘मार्मिक’ने शिवसेनेला जन्म दिला… आणि शिवसेनेसाठी ‘सामना’ला जन्म घ्यावा लागला. आजसुद्धा शिवसेना आणि ‘सामना’ काय करत आहेत हे पूर्ण देश बघतोय. ‘सामना’चा अग्रलेख हा दूरदर्शनवर, सगळ्या चॅनेल्सवरती प्रसिद्ध केला जातो. ही ‘सामना’ची, शिवसेनेची ताकद… आणि तिचा जन्मदाता हा ‘मार्मिक’. अशा या ‘मार्मिक’चं देणं आपल्याला जपलं पाहिजे. ‘मार्मिक’ला जपलं पाहिजे. नवीन रूपामध्ये ‘मार्मिक’ आलेला आहे. ऑनलाइन जरी तो उपलब्ध असला तरीही ‘मार्मिक’ जो हातात घेऊन वाचण्यात जो आनंद आहे, मला आठवतंय, त्या काळी दर गुरुवारी लोक ‘मार्मिक’ची वाट बघत असायचे. ‘मार्मिक’ कधी येतोय, ‘मार्मिक’ कधी येतोय… तो जो काही ताजेपणा आहे तो ‘मार्मिक’ने ६१ वर्षांचा झाल्यानंतरही टिकवलेला आहे. आत्ताच ‘मोगरा फुलला’ हे गाणं सादर करण्यात आलं. तोच हा ६१ वर्षांपूर्वी फुललेला मोगरा आजसुद्धा ताजा टवटवीत आहे. त्याचा सुगंध आजसुद्धा दळवळतो आहे. जसं आपल्या बाबासाहेब पुरंदरेंनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण ‘मार्मिक’लासुद्धा मी शुभेच्छा देतो आहे. नुसत्या शुभेच्छा नाहीत तर आपल्या सगळ्यांचं ते कामच आहे की ‘मार्मिक’सुद्धा शतायुषी होईल. कारण ‘मार्मिक’चं आयुष्य, ‘मार्मिक’ची पुढची वाटचाल ही केवळ स्वत:साठी नाही, तर मराठी माणसाच्या पुढच्या वाटचालीसाठी आहे.
‘मार्मिक’ ही एक मशाल आहे. ती हातात असल्यानंतर स्वाभिमान म्हणजे काय हे मराठी माणूस विसरू शकत नाही. त्याची ताकद देणारा हा ‘मार्मिक’ चिरायू होवो, शतायुषी होवो अशा माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!