‘मार्मिक’च्या ऑनलाइन वर्धापनदिनाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यात त्यांनी ‘मार्मिक’ची स्थापना कोणत्या परिस्थितीत झाली, त्याच्यासमोर कोणकोणत्या अडचणी उभ्या ठाकल्या, त्यांच्यावर कशी मात केली गेली, याच्या आठवणींना उजाळा दिला…
—-
बाळासाहेबांनी अगदी सुरुवातीच्या काळात डेव्हिड लो आणि दीनानाथ दलाल यांना प्रेरणास्थान मानलं. शाळकरी वयापासूनच व्यंगचित्रे काढण्याचा सराव त्यांनी सुरू ठेवला. त्यात प्रगती केली आणि तरुण वयातच ते ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘नवशक्ती’सारख्या वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढे दाक्षिणात्यांची अरेरावी सहन न झाल्यामुळे त्यांनी ‘फ्री प्रेस’चा राजीनामा दिला आणि स्वत:चं साप्ताहिक सुरू करायचं, तेही मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करायचं त्यांनी ठरवलं. आपले वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी हे धाडसी पाऊल टाकलं.
सुरुवातीचा तो काळ अत्यंत अडचणीचा होता. पहिली मोठी अडचण सुरू झाली तीच छपाईपासून… तेव्हा मुंबईतील प्रसिद्ध मुद्रक सापळे बंधू यांनी ‘मार्मिक’ची छपाई देण्याचं कबूल केलं होतं. मात्र अगदी आयत्या वेळेला अचानक त्यांनी निरोप दिला की आम्हाला ‘मार्मिक’ छापता येणार नाही. आता आली पंचाईत… आता काय करायचं? कारण नवीन वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक सुरू करायचं तर त्याची नोंदणी करताना मुद्रकाचं नाव द्यावं लागतं. ते सापळे बंधूंचं नाव दिलेलं होतं. पण त्यांनी तर आता नकार दिला. असं संकट आलं म्हणून खचून जातील तर ते ठाकरे कसले? बाळासाहेब मोठ्या जोमाने कामाला लागले आणि त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यावेळी ‘आवाज’ नावाचे एक लोकप्रिय मासिक प्रसिद्ध होत असे. त्याचे मालक, संपादक मधुकर पाटकर यांनी बाळासाहेबांना सांगितलं, मी तुमचं ‘मार्मिक’ छापून देणार… त्यामुळे ती अडचण सुटली. मग पुन्हा ती नोंदणी वगैरे सगळं झालं.
पण मग दुसरी अडचण आली.
दुसरी माशी शिंकली… ती म्हणजे नवं साप्ताहिक उभं करायचं, त्याचा संसार उभा करायचा म्हणजे भांडवल पाहिजे. त्या भांडवलासाठी बाळासाहेबांनी महाराष्ट्र बँकेकडे अर्ज केला होता. महाराष्ट्र बँकेने तो अर्ज फेटाळला. आम्ही कर्ज देऊ शकत नाही. आता पुन्हा आली पंचाईत… पण नियतीच्या मनात ‘मार्मिक’ सुरू करायचंच असं असल्यामुळे ती अडचणसुद्धा दूर झाली आणि त्यावेळी प्रसिद्ध वृत्तपत्र वितरक सावळाराम बुवा दांगट हे पुढे आले. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की काहीही अडचण येणार नाही. हे पाच हजार रुपये घ्या आणि तुमचं काम सुरू करा. अजून काही गरज पडली तर मी उभा आहे. त्या काळात पाच हजार रुपये हीसुद्धा खूप मोठी रक्कम होती. बाळासाहेबांनी आपलं काम सुरू केलं. १३ ऑगस्ट १९६० या दिवशी त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘मार्मिक’चा पहिला अंक मोठ्या दिमाखात प्रसिद्ध झाला. प्रकाशित झाला. आज ६०-६१ वर्षांनंतरसुद्धा मुख्यमंत्री आपल्या या वर्धापन दिनाला उपस्थित आहेत ते म्हणजे बाळासाहेबांचेच सुपुत्र उद्धवसाहेब ठाकरे… हा एक अपूर्व असा योगायोगच आहे.
एवढ्या अडचणींमधून मार्ग काढून सुरू झालेल्या ‘मार्मिक’ समोरील अडचणी संपल्या नाहीत. त्यानंतरसुद्धा हा मार्ग सगळा काट्याकुट्यांनी आणि दगडधोंड्यांनी भरलेलाच होता. अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे त्यावेळी आणीबाणीच्या काळामध्ये ‘मार्मिक’च्या एका व्यंगचित्रकाराच्या चित्रामुळे संतप्त झालेल्या सरकारने ‘मार्मिक’च्या अंकावर जप्ती आणली. त्यावेळी मातोश्री मुद्रणालय, जो ‘मार्मिक’चा छापखाना होता त्या मुद्रणालयावरही जप्ती आली. परंतु अशा अडचणींमुळे खचून जाईल असा ‘मार्मिक’ नव्हताच. ‘मार्मिक’ने तेव्हा थांबायचं नाही असं ठरवलेलंच होतं. ‘मार्मिक’ थांबला नाही, अजूनही थांबायला तयार नाही आणि त्याची वाटचाल ही सुरूच आहे. दिवाकर रावते मला वाटतं त्या काळातले आमचे साक्षीदार आहेत. त्या जप्तीच्या वेळी आमची धावपळ कशी झाली होती ते त्यांनी पाहिलं आहे. त्या इतक्या प्रसंगांनाही तोंड देत देत आज ६१ वर्षांनंतर ‘मार्मिक’ नव्या स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागला आहे. या महामारीच्या काळातसुद्धा ‘मार्मिक’ने घरपोच जायचं ठरवलं आणि आता आपण वार्षिक वर्गणीदार सुरू केले. या वर्गणीदारांना ‘मार्मिक’ घरपोच मिळत आहे. त्यामुळे कोरोना असो, महामारी असो, अडचणी असोत ‘मार्मिक’ थांबायला तयार नाही. म्हणून माझी सर्व वाचकांना, शिवसैनिकांना विनंती आहे की अजूनही ज्यांना वर्गणीदार होता आलं नसेल त्यांनी आपली वार्षिक वर्गणी भरून ‘मार्मिक’चा अंक घरपोच मिळेल अशी तजवीज करावी. ‘मार्मिक’चं व्यवस्थापन त्यासाठी सज्ज आहे. म्हणूनच मी या निमित्ताने ‘मार्मिक’ला शुभेच्छा देतो आणि मा. बाळासाहेबांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आपल्या सर्व वाचकांनीसुद्धा ज्या एकजुटीने आणि प्रेमाने, जिव्हाळ्याने आतापर्यंत ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक जोपासलं, वाढवलं तसंच हे प्रेम, ही साथ कायम राहील असा एक विश्वास व्यक्त करतो.