लाखो लोकांनी इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, बलिदान केले तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तेही साधेसुधे स्वातंत्र्य नाही तर लोकशाहीसहित स्वातंत्र्य. इंग्रज जाताना सांगत होते की आम्ही ज्या राजे-रजवाड्यांकडून देश हाती घेतला त्या सगळ्यांना तो परत देऊन जातो. तसे झाले असते तर हा देश ५००पेक्षा जास्त तुकड्यांत विभागला गेला असता आणि आपल्याला आधीच्या हजारो वर्षांप्रमाणे त्या संस्थानिकांची गुलामी करावी लागली असती. गांधी, नेहरू, पटेल, मौलाना आझाद यांच्यामुळे हे राष्ट्र एक करणे शक्य झाले. माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीला हे सर्व आयते मिळाले. त्यामुळे त्यांना या बलिदान, त्यागाची काही किंमत नाही. उलट चित्रपट आणि इतर गोष्टी पाहून हिंसा, हुकूमशाही याबद्दल त्यांना जास्त आकर्षण वाटते. इतिहास हा दोन्ही बाजूंच्या पुस्तकांऐवजी
व्हॉट्सअप, फेसबुकवरील साहित्य यातून वाचल्यामुळे त्यांच्या मनात या स्वातंत्र्यनायकांविषयीही विचित्र चित्र असते. महापुरुषांना एकमेकांच्या विरुद्ध उभे करण्याच्या षडयंत्राला ते बळी पडलेले असतात. (गांधी विरुद्ध आझाद, नेहरू विरुद्ध भगतसिंग, पटेल विरुद्ध बोस…)
नेताजी सुभाषचंद्र बोस परदेशातून सशस्त्र स्वातंत्र्यलढा लढत असले तरी त्यांनी त्यात गांधी आणि नेहरू बटालियन तयार केली आणि गांधींना राष्ट्रपिता मानले. तेच इकडे चंद्रशेखर आझाद यांना ब्रिटिशांनी जे चाबकाचे फटके दिले त्याला कारण होते त्यांनी ‘महात्मा गांधी की जय’ म्हणणे. तीच परिस्थिती शिरीषकुमार, बाबू गेनू यांची, त्यांना तर या घोषणेपायी प्राणांचे बलिदान करावे लागले.
तर लक्षात घ्या- बोस, नेहरू, पटेल, भगतसिंग कोणीही असोत- जे स्वातंत्र्यलढा लढत होते आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता. ‘या भारताला स्वातंत्र्य देऊ नका नाहीतर हा देश १० वर्षांत १००पेक्षा जास्त तुकड्यात विभागला जाऊन बेचिराख होईल’ असे इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले हाेते. पण आजही हा देश मजबूत आहे. कारण आपल्या राष्ट्राची उभारणी, तर ती जपणे ही खूप महत्वाचे आहे. आपण अराजकवादी शक्तींना बळी पडून एकमेकांशी भांडू लागलो तर देश बेचिराख व्हायला किंवा त्याचा वेगळ्या प्रकारचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. या स्वातंत्र्यदिनानिमित्त एवढे करूया की कुणालाही त्याची धर्म-जात यांच्या आधारे कमी जास्त लेखणे सोडू या. एकत्र राहू या, निर्भयपणे पददलितांच्या हक्कांसाठी शोषणाविरुद्ध आवाज उठवू या.
– संकेत मुनोत