जगात फुकट काहीही मिळत नाही, ना माणसांना ना देशाला. या देशाने स्वातंत्र्य मिळवले, त्यावेळी त्याची फार मोठी किंमत मोजलेली आहे. शेकडो नव्हे, हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले तेव्हा देशाला स्वातंत्र्याची पहाट दिसली.
देशाला स्वातंत्र्य मिळाले ते जसे ब्रिटिश राजवटीपासून मिळाले तसेच राजेशाहीपासूनही मिळाले. प्रमुख सहा धर्म, अनेक प्रांत, हजारो भाषा, हजारो जाती, बारा मैलावर बदलणारी खानपान संस्कृती, कुठे आभाळाला भिडणारे डोंगर, कुठे खोल दर्या, कुठे समृद्ध जंगल, कुठे वाळवंट, कुठे वैराण शुष्क जमिनी, कुठे मैलोनमैल पसरलेला समुद्रकिनारा. या विविधतेने नटलेल्या देशात पाचशेच्या वर असणारी संस्थाने होती. पाच दहा गावाचं राज्य असलेले राजे होते. बहुतांश ठिकाणी राजाचा धर्म वेगळा आणि रयतेचा वेगळा. या सगळ्या सामान्यांच्या विविधता कायम ठेवून भारत देश या समान सूत्राने हा देश बांधून उभारायला पिढ्या खर्ची पडल्या, ज्यांनी सर्वस्व देशासाठी झोकून दिले. ही स्वातंत्र्याची मोजलेली किंमत आपल्या पिढीला कदाचित नीट समजत नाहीये. विविधरंगी धाग्यांनी नटलेले हे महावस्त्र यामध्ये गंगाजमनी तहजीब नावाचे अद्भुत असे उभे आडवे धागे विणलेले आहेत, ज्यांनी हे महावस्त्र एकमेवाद्वितीय असं झालेलं आहे. ही वीण उसवून सगळ्या धाग्यांना एकाच रंगात रंगवण्याचा अट्टहास या वस्त्राची लक्तरे करण्याचा प्रयत्न आहे.
ही वीण घट्ट ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. ही वीण आहे देशाच्या संविधानाची, देशाच्या कायद्यांची आणि देशाने स्वीकारलेल्या मूलभूत मूल्यांची.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार कधीही नसतो. जसे माझे मला मिळालेले हक्क आहेत त्यासोबत नागरिक म्हणून जबाबदार्या आहेत. माझे स्वातंत्र्य जपताना इथल्या प्रत्येक माणसाचे स्वातंत्र्य तेवढेच महत्वाचे आहे, ही जबाबदारी माझी आहे. देश, राज्य, समाज, लोक, व्यक्ती कधीही आदर्श, अचूक असत नाहीत. जास्तीत जास्त लोक सुखी व्हावेत, जास्तीत जास्त लोकांना आनंदाने, समाधानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी राज्यव्यवस्था असतात. देश अशा हजारो माणसांनी बनतो. नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी आधी पार पाडेन, माझी कर्तव्य पार पाडेन, मग माझ्या हक्कांसाठी जागरूक राहून मी हक्क मिळवेन अशी भावना प्रत्येकाच्या मनात असेल तरच देश मोठा होतो. जगाच्या इतिहासात प्रगतीच्या वाटेवर असलेल्या देशांचा इतिहास अशाच प्रत्येक नागरिकाच्या सजगतेचा इतिहास आहे. देश मोठा व्हायला जास्तीत जास्त लोकांनी किमान त्याग आणि किमान योगदान देणे आवश्यक असते. हे आपल्या वाडवडिलांनी समजून आचरणात आणले म्हणून एवढ्या मोठ्या महासत्तेच्या शृंखला तोडून आपण स्वतंत्र झालो.
आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या मोजक्याच देशामध्ये लोकशाही रुजली आणि नांदली. जिथे जिथे समानता नष्ट झाली, कुणीतरी श्रेष्ठ आहे ही भावना निर्माण झाली तिथे तिथे लोकशाहीचा र्हास झाला आणि सोबतच लोकांच्या हक्कांचा आणि अधिकारांचा सुद्धा. हा ठेवा, हे महावस्त्र, ही विविधता, हे इंद्रधनुष्य जपण्याची, हातात हात घालून प्रगती करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, हे भान आपल्या पिढीला येवो याच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा!!
– आनंद शितोळे