पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तो दिवस म्हणजे १४ ऑगस्ट हा यापुढे ‘फाळणी भयावह स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आणि टीकेची झोड उठली. मुळात मोदींवर टीका करण्यात काही हंशील नाही. कारण हे करून त्यांनी काही नवं किंवा वेगळं केलेलं नाही. जुन्या योजनांना नवी नावं देणं, त्यांचं मार्केटिंग आणि इव्हेंटीकरण करणं, त्यांच्यातल्या कशाचाच पाठपुरावा न करता, एकही योजना सिद्धीस न नेता दुसरी तेवढीच चकचकीत घोषणा करणं, हे त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आपण काहीतरी नवीन शोधून काढलं आहे (जे नेहरूंना सापडलं नव्हतं), असं सतत भासवत राहणं हा त्यांच्या नेहरूग्रस्ततेतून उद्भवलेलं एक आजारलक्षण आहे. ते समजून घेतलं पाहिजे. शिवाय निंदकाचे घर असावे शेजारी, असं म्हणणारा माणूस टीकेची दखल घेऊन, तिच्यातल्या रास्त मुद्द्यांच्या आधारे स्वत:त काही बदल घडवत असतो- तीही शक्यता इथे नाही. मग मोदींवर टीका करणं हे वार्याशी झगडा करण्याइतकं निरर्थक नाही का!
शिवाय, यावेळी मोदींनी जे केलं आहे, ते स्वागतार्हच आहे. यानिमित्ताने ते सतत काहीतरी ‘साजरं’ करण्यापासून काहीतरी ‘पाळण्या’पर्यंत आले, ही काही दुर्लक्षिण्याजोगी गोष्ट नाही. देशाची रक्तरंजित फाळणी ही आजही भळभळत असलेली जखम आहे. ती भरू द्यायची नाही, ती सुकू लागली, तिच्यावर खपल्या धरू लागल्या की ती नखाने खरवडायची आणि पुन्हा भळभळवायची ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या सत्ताधीशांची राजकीय मजबुरी आहे. दोन्हीकडे काही राजकारण्यांना द्वेष चेतवल्याशिवाय मतं मिळत नाहीत, धार्मिक ध्रुवीकरण हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे, त्यामुळे ज्या पिढीला आणीबाणीही माहिती नाही, तिच्या मनात फाळणीच्या ‘भयावह स्मृती’ पेरण्याची राजकीय गरज आपण लक्षात घेतली पाहिजे.
मात्र, तेवढंच नाही. फाळणी भयावह स्मृती दिन पाळताना धडावर डोकं शाबूत असलेले लोक फाळणीचे खरे जन्मदाते कोण आहेत, याचाही शोध घेतीलच. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला, राखीव मतदारसंघांची कल्पना कोणाची, मुस्लिम लीग या पक्षाबरोबर सत्ता कोणी उपभोगली, हे सगळं त्यानिमित्ताने शोधून काढलं जाईल आणि या भयावह स्मृतींचे निर्माते कोण आहेत, त्यांना स्वातंत्र्यदिनापेक्षा त्याच्या आधीचा दिवस मोठा करण्याची घाई का आहे, हे नव्या पिढीला समजू लागेल. आपल्या पक्षाचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या वर लावण्याची खुमखुमी कुठून येते, तेही कळून जाईल.
शिवाय दिवस पाळण्याचाच विषय सुरू झालेला आहे, तर कदाचित या आठ नोव्हेंबरला रात्री ठीक आठ वाजता जनतेला संबोधित करून मोदीजी तो दिवस ‘नोटबंदी भयावह स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय जाहीर करू शकतात. फाळणीचा नरसंहार काही महिने चालला. त्यानंतर शमला. नोटबंदीचे परिणाम देश अजूनही भोगतो आहे. तिने नोटाबदलीच्या रांगांमध्ये जेवढे मृत्यू घडवून आणले त्याहून अधिक अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवून घडवून आणले. त्याचीही आठवण ठेवायला हवी. याचप्रमाणे एक दिवस एक दिवस जीएसटी भयावह स्मृतीदिन म्हणून पाळायला हवा. या दिवसासाठी तर सगळी राज्येही पुढाकार घेतील. अशास्त्रीय पद्धतीने लावलेल्या आणि मूळ कल्पनेला हरताळ फासणार्या जीएसटीच्या घोळाच्या सगळ्यात कटु स्मृती राज्यांनाच जपाव्या लागत आहेत. त्यांना जीएसटीचा परतावाच दिला जात नाही. देशभरातल्या व्यापार्यांच्या आणि ग्राहकांच्या डोक्याला ताप झाला आहे तो वेगळाच.
पुढे मार्चमध्ये ‘कोरोना टाळेबंदी भयावह स्मृती दिवस’ पाळता येईल. त्या दिवशी लोक घरातच थांबून टाळ्या-थाळ्या वाजवतील आणि गोरगरीब मोलमजुरी करणारे लोक बोचकी घेऊन पदयात्रा काढतील. मोदींच्या पक्षाच्या काही नेत्यांनीही पदयात्रा करायला हरकत नाही. तेवढंच वजन कमी होईल- अर्थात फक्त शारीरिक- बाकी पक्षात वजन फक्त दोघांचेच आहे, हे देशाला माहिती आहे. पाठोपाठ ज्या दिवशी लसींचा तुटवडा असतानाही लस उत्सव साजरा केला गेला, तो दिवस यापुढे ‘लस भयावह स्मृती दिवस’ म्हणून पाळता येईल. खरंतर तो काही विशिष्ट दिवशी पाळण्याची गरज नाही. सर्वसामान्य नागरिक तो रोजच पाळत आहेत. सरकारी लसीकरण केंद्रावर जायचं आणि लस उपलब्ध नाही, याचा बोर्ड वाचून परत यायचं. तिथे नोंदणी करायची, रांगेत उभं राहायचं आणि आपला नंबर आल्यावर तुमच्या वयोगटासाठी लसच नाही, हे ऐकायचं, यातून रोज लसीकरणाच्या कटु स्मृती जमा होतच आहेत. याच देशाने याआधी ३६ लसी घरोघर जाऊन दिल्या होत्या, याचीही स्मृती त्यानिमित्ताने होईल लोकांना.
मध्यंतरी महाराष्ट्रातील एका प्रवत्तäयाने मोदींची तुलना राणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती आणि त्यांना शककर्ते ठरवले होते. त्यावरही नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठली होती. पण त्यांच्या त्या सूचनेत तथ्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. शककर्ता हा कशा ना कशासाठी ओळखला जातो. ती पूर्वअट मोदीजी निश्चितच पूर्ण करतात. शोधायला गेले तर अनेक असे दिवस सापडतील ज्यांच्या कटुस्मृती यापुढे जपाव्या लागणार आहेत आणि फळंही भोगावी लागणार आहेत. त्या अर्थाने ते भयावह कटुस्मृतिदिनांचे शककर्तेच आहेत, यात जराही शक म्हणजे शंका नाही.