भारतीय राजकारणातील सर्वशक्तिमान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षे परिधान केलेला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा मुकुट सोडून २६ मे २०१४ रोजी भारताच्या पंतप्रधानपदाचा मुकुट आपल्या डोईवर चढविला, तेव्हपासून प्रत्येक भाषणात, मग ते नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून असेल, संसदेच्या सभागृहात असेल किंवा राजकीय प्रचारसभा असतील. प्रत्येक ठिकाणी त्यांचा परवलीचा शब्द आहे घराणेशाही आणि भ्रष्टाचार. हे आवडते शब्द उच्चारल्याशिवाय नरेंद्रभाई आपले भाषण पूर्ण करीत नाहीत. पण या नरेंद्रभाईंना काय माहीत की आपलेच अनुयायी आपल्या संकल्पांचा फडशा पाडणारेत म्हणून.
गेल्या काही महिन्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्मिलेल्या संविधानाला चांगले दिवस (अच्छे दिन) आलेले दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकचे नेते बोलून गेले की अबकी बार चारसो पार होताच आम्ही संविधान बदलू. त्या महाशयांचे तिकिट कापले पण हा मुद्दा इंडिया आघाडीने उचलून धरीत रालोआला ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडले. इतके की चारशे पार तर सोडाच, जेमतेम २४० जागा हा पक्ष मिळवू शकला. स्वत: नरेंद्रभाई वाराणसीत तीन फेर्या पिछाडीवर होते. अखेर नीतिशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन एनडीएची (नीतिश-नायडू डिपेंडंस अलायन्स) सत्ता स्थापन केली. पण तेव्हापासून संविधान संविधानचा घोशा सुरु झाला. स्वपक्षीय नेत्याने संविधान बदलण्याचे केलेले विधान सोयीस्करपणे विसरून देवेंद्र फडणवीसांनी ‘फेक नरेटिव्ह’ हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात रुढ केला. याचेच हत्यार विरोधकांच्या विरोधात वापरले. दोन दिवस संसदेच्या सभागृहात संविधानावर चर्चा झाली आणि नरेंद्रभाईंना मोह आवरला नाही. त्यांनी राहुल गांधी यांना धोबीपछाड देण्याचा विडा उचलत नेहरू गांधी परिवारावर मुक्तकंठाने तोंड’सुख’ घेतले (यातही ‘सुख’ आहे ना!). राणा भीमदेवी थाटाने बोलायला आणि आरोप करायला कोणी रोखू शकतो का? या भाषणसमाप्तीच्या वेळी नरेंद्रभाईंनी अकरा संकल्प जाहीर केले. त्यात आवडता परवलीचा शब्द घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे ओघाने आलेच.
पण, वाजपेयी आणि आडवाणी यांचा भारतीय जनता पक्ष आणि मोदी शाह यांचा भारतीय जनता पक्ष यात जमीन अस्मानचा फरक आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायला निघालेल्या मोदी-शाह यांनी ‘काँग्रेसयुक्त भाजप’ आणि ‘काँग्रेसयुक्त एनडीए’ तसेच ‘परिवारयुक्त’, ‘भ्रष्टाचारयुक्त भाजप’ करायचा निर्णय घेतला असेल तर त्याला तुम्ही आम्ही तरी बापुडे काय करणार? ज्यांच्या ज्यांच्या विरोधात किरीटभायने भ्रष्टाचाराचे आरोप केले, हातावरचे घड्याळ भिरकावून कमलसुगंध घेणार्या चित्राताईंनी ‘वाघा’सारखी डरकाळी फोडली त्या सर्वसमावेशक नेत्यांना देवाभाऊंनी १५ डिसेंबर २०२४च्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले. मनोहर नाईक यांचा इंद्रनील हा मुलगा, रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना, पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश, रामदास कदम यांचा मुलगा योगेश, नारायण राणे यांचा मुलगा नितेश, अभयसिंहराजे यांचे पुत्र शिवेंद्रसिंह, बाळासाहेब देसाई यांचे पुतणे आणि शिवाजीराव देसाई यांचे पुत्र शंभूराज, मोरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे, बाळासाहेबांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील, स्वत: देवेंद्र हे गंगाधरपंत फडणवीस यांचे सुपुत्र तसेच शिवशाही सरकारमध्ये चणाडाळ घोटाळ्याचा आरोप झालेल्या शोभाताई फडणवीस यांचे पुतणे, शरद पवारांचे पुतणे अजितदादा, असे सुमारे तेरा घराण्यांचे प्रतिनिधीत्व हे मंत्रिमंडळ करीत असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात.
एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांचा फडशाच देवाभाऊ फडणवीस हे पाडत आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. एक तर आता नरेंद्रभाईंनी यापुढे आपल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचार या विषयावर बोलणे टाळून आपला मान आपणच राखावा, उगाच आपण समोरच्यावर एक बोट उगारून उरलेली तीन बोटे आपल्याकडे आहेत हे दाखविण्याची संधी देऊ नये.
– योगेश त्रिवेदी