राज्याचे सर्वगुणसंपन्न मशहूर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आझाद मैदानावरील शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अदबीने मान झुकवून लाचारीचे जे उच्च कोटीचे दीनवाणे महाप्रदर्शन केले त्यामुळे स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.
ही माझी नव्हे तर माझा मानलेला परमप्रिय मित्र मि. पोक्याचीही प्रतिक्रिया आहे. एकीकडे ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळी तारस्वरात म्हणायच्या आणि दुसरीकडे दिल्लीश्वरांसमोर नतमस्तक होताना, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, अशा आविर्भावात नको इतकी मान झुकवायची या देहबोलीला नेमकं काय म्हणावं हे सांग पोक्या, असं मी म्हणताच पोक्याने ताबडतोब ‘बंदा हाजीर है जहाँपन्हा’ असं शिंदेंची आझाद मैदानवरील साभिनय नक्कल करत उत्तर दिलं. त्यावर मी त्याला म्हणालो, यावर फार विचार न करता तू प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया घे.
पोक्या ताबडतोब कामगिरीवर निघाला आणि एका दिवसात बर्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन परत आला. त्यापैकी या निवडक प्रतिक्रिया…
फडणवीस : तुम्ही प्लीज याचं भांडवल करू नका. त्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. अडीच वर्षे मुख्यमंत्री होते या गतस्मृतींमधून आजही ते बाहेर आलेले नाहीत. जेव्हा माननीय अमित शहांनी बडगा दाखवला तेव्हा आपण काहीही न बोलता शरण आलेलं बरं हे जाणून त्यांनी त्या ऐतिहासिक शपथविधीच्या वेळी मोदींपुढे लाजिरवाणी शरणागती पत्करली. त्यांनी नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला मान्यता दिली, हे सत्य आहे. मात्र सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. ते किती भावनाशील आहेत हे सार्या महाराष्ट्राला माहीताय. मान झुकवताना त्यांना किती वेदना होत होत्या, हे सार्या महाराष्ट्राने पाहिलंय. नंतर चेहर्यावर उसनं हासू आणण्याचं नाटकही त्यांना जमत नव्हतं. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवलं, त्या महाराजांचं नाव घेणार्या शिंदेंनी मोदींपुढे मान टाकली हे खरंय. मी त्या प्रसंगाचे सर्व दिशांनी व्हिडीओ मिळवलेत. कधी काळी उपयोगी पडतील ते. नाटक करून लक्ष वेधून घेणं हा त्यांचा स्वभाव आहे. आपण कोण, कुठून आलो, काय होतो आणि काय झालो हेच त्यांना कळेनासं झालंय. आदरणीय शहांनी माझ्याजवळ नंतर बोलताना सांगितलं, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.
अजितदादा : वरून चाप लावला की अशीच चिमट्यात सापडल्यासारखी अवस्था होते. मग फक्त मान झुकवण्याचीच नव्हे तर साष्टांग लोटांगण घालण्याचीही मनाची तयारी होते. मी जन्मात असा लाळघोटेपणा करण्याची कृती केली नाही. आपण तर पदरात पडेल त्यावर खूश होतो. मला हे पाहिजे ते पाहिजे असा बालहट्ट फक्त काकांपाशी केला आणि ते उशिरा का होईना, मिळवलंसुद्धा. तेही ताठ मानेनं. माझ्यावर अशी हतबलतेची पाळी येणार असती तर मी कोरड्या विहिरीत उडी मारून आधीच जिवाची अमावस्या केली असती. उपकारकर्त्याविषयी सदैव आदराची भावना बाळगावी, जशी मी काकांविषयी बाळगतो, पण असं पायावर लोळण घेण्यासारखं कुणापुढे मिंधा होत नाही. आपल्या पाठीचा कणा ताठ असला तर कुणापुढेही अशी लवण्याची वेळ येत नाही. तुमची लायकी असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला न मागता मिळून जाते. झुकेंगे तो रुकेंगे हे माझं घोषवाक्य ध्यानात ठेवा. मग पाठीच्या मणक्यावर, कमरेवर, मानेवर उपचार करण्याची वेळ येणार नाही.
केसरकर : झुकणं, लवणं या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आध्यात्मिक असला पाहिजे. ज्या कोनातून तुम्ही पाहाल, तशी ती गोष्ट तुम्हाला दिसेल. मला त्यांचं झुकणं स्वाभाविक वाटतं. त्यांच्या कोमल अंत:करणात उठलेल्या वादळानं त्यांच्यावर ही पाळी आणली असं आपण म्हणू शकत नाही. ज्यांनी गोहातीला त्यांचं डोलणं पाहिलंय त्यांना यात आश्चर्य वाटणार नाही. त्यांच्या दृष्टीने ते ज्या अत्युच्च स्थानावरून पायउतार झाले, त्याचवेळी त्यांच्या मनाची अवस्था आणि व्यवस्था पार कोलमडली होती हे त्यांच्या चेहर्यावरून आणि देहबोलीवरून मानवजातीच्या लक्षात येत होतं. आपण ईश्वराच्या चरणी लीन होतो तसे ते माननीय मोदींच्या चरणी लीन झाले. आदरणीय मोदींच्या तेजस्वी डोळ्यांना ते डोळे भिडवणं शक्यच नव्हतं, तेव्हा मान शक्य होईल तितकी खाली घालणं याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यांचे डोळे भूमितत्त्वाला भिडले होते. भूमीने त्यांच्या अंत:चक्षूला प्रतिसाद दिला तर त्यांची सातही चक्रे हळूहळू कार्यरत होतील आणि त्यांना दिव्यानुभूती प्राप्त होईल. त्याचा फायदा त्यांच्या पक्षातील आमच्यासारख्या नेत्यांना मंत्रीपदं मिळण्यात होईल, असा साक्षात्कार मला त्यांच्या झुकण्यानंतर झालाय. प्रत्यंतर तुम्हाला दिसेलच.
५२कुळे : आमच्या भाजपला झुकायला लावण्याची स्वप्नं पाहणार्याला नियतीनेच आमच्या प्रिय मोदीसाहेबांसमोर झुकायला लावलं. आमच्या लाडक्या अमित शहा साहेबांनी असा धोबीपछाड डाव टाकला की झुक गया आसमान. अडीच वर्षे नुसते हवेत उडत होते. आपण कोणाच्या जिवावर उडतो आहोत याचा त्यांना विसर पडला आणि शहा साहेबांनी त्यांची कटी पतंग केली. मला तर ते पाण्यातच पाहात होते. शेवटी फुगा फुटला आणि त्यातून बुडबुडे आले. मला त्यात नवल वाटत नाही. मी लोकसभा निवडणुकीत पडलो तेव्हा त्यांनी माझ्यावर अपमानास्पद कॉमेन्ट्स केल्या होत्या. त्याचं फळ त्यांना मिळालं. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत असा त्यांनी उगाचच गोड गैरसमज करून घेतला होता. शेवटी तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं. गर्वानं छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा हा संत एकनाथांचा भारुडातील सल्ला या आधुनिक एकनाथांना कळला नाही आणि त्याची परिणिती त्यांच्या झुकण्यात झाली.
– टोक्या टोचणकर