ऐतिहासिक व्यक्तींवर सिनेमा काढताना इतिहासच गुंडाळून ठेवून अतिरंजित भव्य सिनेमे निर्माण करून आपण त्या इतिहासपुरुषांचा अवमानच करतो, हे निर्माता दिग्दर्शकांच्या कधी लक्षात येणार?
– अविनाश सहस्रबुद्धे, चिंचवड
अविनाश राव, आपण कलाकार आहात का? अशा अतिरंजित चित्रपटात तुम्हाला भूमिका मिळाली नाहीये का? तुम्ही निर्माता दिग्दर्शक आहात का? असे चित्रपट बनवण्याकरता तुम्हाला कोणी सांगत नाहीये का? पैसा पुरवत नाहीये का? इतकी चिडचिड होतेय तुमची? म्हणून विचारतोय… प्रेक्षक म्हणून चिडचिड होत असेल तर असे चित्रपट पोस्टर दाखवून, विनामूल्य दाखवले तरी बघायला जाऊ नका ना .. ना रहेंगे प्रेक्षक, तो नही बनेंगे पिक्चर… तभीच समजेंगे निर्माता दिग्दर्शक!
पूर्वी पुढारी टोपी घालून लोकांना टोप्या घालत. हल्ली तर नेत्यांच्या डोक्यावर टोपी नसतेच.
– यशवंत पेंढारकर, कोल्हापूर
चुकताय तुम्ही यशवंतराव… हल्लीचे नेते ज्या गावात जातात त्या गावाप्रमाणे टोपी बदलतात… सूट बदलतात, फेटे बदलतात, जॅकेट बदलतात, रंग बदलतात, ते लोकांना टोपी घालण्यासाठीच. तुम्हाला, आम्हाला टोपी कधीच घातलेली आहे. फक्त ती तुम्हाला दिसत नाहीये… घातलेली कळत नाहीये… इतकी सॉफ्ट आणि हलकी आहे ही टोपी… फार महागातली आहे… पंधरा लाखाची टोपी आहे ती… कळलं..?
संतोषराव, आजकाल माझा ऑफिसात जराही डोळ्याला डोळा लागत नाही… काही उपाय सुचवा.
– रवींद्र नरसे, नाशिक
सांगतो… आधी सांगा, ऑफिसात तुमचं कशाला काय लागतं? किंवा नेमकं कशाला काय लागायला पाहिजे?
महागाई इतकी वाढली आहे की आता केशकर्तनकारांनी हजामतीचे दरही वाढवले आहेत… आता जटा वाढवायच्या की टक्कलच करून घ्यायचं एकदाच?
– विनोद साबळे, पुणे
नुसतं टक्कल करून उपयोगाचे नाही… अंगावर बेशरमपणाची… सॉरी रंगाची शाल घ्या, भक्तीची उच्चतम पातळी गाठून बोलण्याची नीचतम पातळी गाठा… मग बघा महागाईचे किती फायदे तुम्हाला दिसतील ते…
लहानपणी तुमच्या घरी तुम्हाला कोणी ‘बास झाली तुझी नाटकं,’ ‘मला माहिती आहेत तुझी सगळी नाटकं,’ ‘माझ्यापुढे चालणार नाहीत ही नाटकं’ असं म्हणालं असतं तर तुम्ही पुढे रंगभूमीवर इतकी उत्तम कामगिरी करू शकला असता का?
– पूर्वा शेंडगे, कळमनुरी
लहानपणी केली ती नाटकं पुरी नाही का झाली? अशीच नाटकं मोठेपणी राजकारणात जाऊन केली असती तर राजकारणात उत्तम कामगिरी करून आज कुठल्यातरी पदावर जाऊन बसला असता असं म्हणतात आता घरचे… (पवार म्हटल्यावर सगळ्याच पवारांना राजकारण जमतं असं घरच्यांना वाटतं.. पण रंगभूमीवरील नाटक सगळ्यांना कळेल असं करावं लागतं… राजकारणातली नाटकं कोणालाही कळणार नाहीत अशी करावी लागतात… हे सगळ्याचं पवारांना (आमच्या घरच्या) कळत नाही ना…
शेवग्याची शेंग ३०० रुपये किलो, म्हणजे चिकनच्या भावापलीकडे पोहोचली. कांदे सत्तरीच्या खाली उतरायला तयार नाहीत. डाळी, तेलांचे भाव तर विचारूच नका. पेट्रोल, डिझेल, गॅस… सगळंच महाग… अच्छे दिन नेमके कोणाचे आले गेल्या १० वर्षांत?
– अमरेंद्र पाटील, सांगली
दहा वर्षात अच्छे दिन कोणाला आले असं विचारताय म्हणजे तुम्ही नक्कीच ‘अडाणी’ नाही आहात… (यापेक्षा जास्त विस्कटून सांगणार नाही कारण आम्ही पण ‘अडाणी’ नाही आहोत. ‘अडाणी’ आणि ‘अडाणी’ यांमधला फरक तुम्हाला कळतोय का बघा… तो कळला तर तुम्ही हुशार आहात… आणि तुम्ही हुशार आहात हे तुम्हाला कळलं, तर ‘अच्छे दिन कोणाचे आले?’ असा प्रश्न विचारण्याचा ‘अडाणी’पणा तुम्ही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
या वर्षात केलेल्या कोणत्या चुका तुम्ही पुढच्या वर्षी टाळणार आहात संतोषराव?
– अविनाश शेंडे, नागपूर
पुढच्या वर्षी काय करायचं? हे ठरवण्याचा संकल्प करायचा आम्ही टाळणार आहोत… असा संकल्प केलेला आहे… (समजा आम्ही ठरवलं पुढच्या वर्षी बॅलेटवरच मतदान करणार, ईव्हीएमवर मतदान करणार नाही… तर असा संकल्प करून आमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही… तर तो तुम्हाला सांगून तुमच्या आयुष्यात तरी काय फरक पडणार आहे?)