नेमेचि येतो मग पावसाळा, असं जे सृष्टीचं कौतुक सांगितलं जातं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बेळगावात मराठीजनांचे आंदोलन नियमित होते, कर्नाटकाचे सरकार, मग ते भाजपचे असो की काँग्रेसचे, ते नियमितपणे हे आंदोलन चिरडते, अगदी पाशवी बळ त्यासाठी वापरलं जातं. महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया फक्त शिवसेनेत उमटते. बाकीचे पक्ष फक्त तोंडपूजा करतात. पुन्हा बेळगाव महाराष्ट्रात येणार की नाही, हा प्रश्न लोंबकळत राहतो. कर्नाटक सरकार तिथे आणखी काही नव्या योजना, नवी कार्यालयं आणून आपला खुंटा बळकट करते. महाराष्ट्राने आपल्याला इतकं वार्यावर सोडलेलं आहे, शिवसेना सोडल्यास कोणालाही आतून बेळगाव, कारवार, निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं आतड्यापासून वाटतच नाही, मग आपण तरी कशाला मातृराज्यात परत जाण्याची आस ठेवायची, अशी निराशा बेळगाववासीयांत दाटते… हे चक्र अविरत सुरू आहे. त्याची सुरुवात कुठे, कशी झाली हे दाखवून देणारी अनेक जळजळीत व्यंगचित्रे बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरली आहेत. त्यातलंच हे एक व्यंगचित्र. महाजन आयोगाने महाराष्ट्रावर केलेल्या अन्यायाचं रोखठोक दर्शन घडवणारं, महाराष्ट्राच्या बोटचेप्या वृत्तीवर बोट ठेवणारं… आता तर इतक्या भयंकर वृत्तीचे लोक सत्तेत आले आहेत की अशा किती पत्रावळी तोंडाला पुसल्या जाणार आहेत, त्याची गणती नाही.