चित्रा वाघ
संस्कृती रक्षण करण्या जाता
चारी बाजूंनी मलाच घेरले
चक्रव्युहात सापडले मी
असे कसे दिवस फिरले?
कोण कुठली मॉडेल ऊर्फी
नंगटपणा थांबवा तिचा
बिघडवेल ती महाराष्ट्राला
डोळ्यांच्या मग होतील खाचा
अमृता, रुपाली, पक्षश्रेष्ठीही
का बरं तिची बाजू घेता
तिच्याशी मी एकटी लढेन
आवाजाचे खोबरे होता
—– —– —–
रुपाली चाकणकर
केवळ फेमस होण्यासाठी
नसत्या उचापती करते चित्रा
म्हणे स्वत:ला संस्कृती रक्षक
मूळ स्वभावही आहे भित्रा
माझ्यावरही तुटून पडली
मला शिकवण्या गेली अक्कल
स्वपक्षीयांनीच केली कोंडी
भारी पडली ढोंगी नक्कल
दुसर्या पक्षातून ही आली
करते केवळ पब्लिसिटी स्टंट
ऊर्फीला तोंड देता देता
तिची गेली हिट्ट विकेट
—– —– —–
ऊर्फी जावेद
कशी जिरवली सासूबाईंची
एकदा मॉडेल बनून बघा
असले स्टंट करण्यापेक्षा
प्रसिद्धीचा फुगेल फुगा
आज विरुद्ध बोलणारेही
घुटमळतील मग पुढे मागे
माझ्या सोबत मैत्री करा
कुठल्या कुठे जाऊ आगे
माझ्याबद्दल बोंबलून बोंबलून
का खरवडता उगाच घसा
शिरा किती ताणता तुम्ही
रिलॅक्स व्हा नि गालात हसा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
मोदींच्या त्या दौर्यामुळे
आयती डावोस वारी हुकली
माझी वट दाखवण्याची
आणखी एक संधी चुकली
तरीही काही हरकत नाही
मुख्यमंत्र्यांची काळजी मला
सोबत सल्लागार धाडले होते
तेव्हात जीव शांत झाला
मोदी साहेब आले तेव्हा
माझी हजेरी होती मोठी
नाहीतरी राज्य मीच चालवतो
डेप्युटीची खुर्ची खोटी
—– —– —–
निर्मला सीतारामन
अर्थसंकल्पीय अधिवेशनात
बघा पाडते माझी छाप
पीएम सुद्धा चाट होतील
पाहून विचारांचे माप
खूप तयारी केलीय मी पण
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची
बजेटपेक्षा चर्चा होईल
त्याच्या जाडजूड पुस्तकाची
बजेट वाचेन तेव्हा मात्र
मागच्यासारखे नाही होणार
आत्तापासून घेतेय काळजी
पीएम सुद्धा खूश होणार