`मार्मिक’मध्ये मी अनेक वर्षे अनेक विषयांवर लेखन केले. ७/८ वर्षांपूर्वी मी गावाला गेलो होतो. कोकणात माझे गाव आहे. मी आमच्या शेतजमिनीत उभा होतो. तिला लागूनच एक वहाळ आहे. त्याच्या काठावर आपोआप झाडाझुडपांची दाट वई (कुंपण) तयार झाली आहे. वहाळापलीकडे एक विहीर आहे. तिच्यावर कोणीतरी पाणी भरायला किंवा आंघोळीला आले असणार. आमच्या पायखावरून त्यातील कोणीतरी एकाने मोठ्याने विचारले, “कोण आहे हो तिकडे?”, “प्रभुदेसाई” असे माझे उत्तर ऐकून, `मार्मिक’चे दि. मा. प्रभुदेसाई का?” असे त्याने विचारलेले ऐकूण मला फार आनंद झाला.
पण `मार्मिक’ला पाठविलेल्या पहिल्याच पत्रामुळे माझी फजितीच झाली होती. पूर्वी `मार्मिक’ सुट्या पानांच्या उभ्या आकारात ७/८ पानांचा असे. त्यात वाचकांच्या पत्रांना संपादकांनी दिलेली उत्तरे प्रसिद्ध होत. मी पत्र पाठवून विचारले होते, “हे दाक्षिणात्य उंदीर शिवसेनेच्या सिंहाची आयाळ कुरतडत आहेत. त्यांचा बंदोबस्त तुम्ही केव्हा आणि कसा करणार आहात?”
पुढच्याच अंकात साहेबांनी उत्तर दिले होते, “प्रभुदेसाई, शिवसेनेच्या वाघाला आयाळच नसल्यामुळे ती कुरतडण्याचा प्रश्नच नाही.”
सर्व प्राण्यांचा राजा असलेला सिंह हाच शिवसेनेचे प्रतीक असावे असे समजून उत्साहाच्या भरात मी चुकीचा प्रश्न विचारला होता!
त्यावेळी `शिवसेने’ची स्थापना झाली होती की पूर्वतयारी चालू होती हे काय आठवत नाही. पण त्यावेळचे `कार्यालय’ दादरच्या `टिळक पुला’खाली असलेल्या `ब्लू पर्ल’ या इमारतीत होते. कार्यालय म्हणजे साधारण बारा बाय पंधराची एक खोली. तिच्या एका भिंतीला टेकून ठेवलेले एक लाकडी टेबल व त्यामागे एक खुर्ची. टेबलाला लागून त्याच भिंतीला टेकवून ठेवलेले एक लाकडी बाक. समोर मोकळी जागा. खुर्चीत साहेब, बाकावर मी आणि मोकळ्या जागेत आपापली गार्हाणी सांगायला असलेले लोक बसत. बहुतांश त्यात तरुणांचाच भरणा असे आणि तक्रार बेरोजगारीची! त्यावेळी मी सुद्धा बेरोजगारच होतो आणि रोज जात होतो की नोकरीला असल्यामुळे फक्त आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी जात असे. पण ज्यावेळी कार्यालय उघडे असे तेव्हा मी बाकावर पहिल्या क्रमांकावर बसलेला असे.
आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्यांच्यात आणि माझ्यात एक शब्दानेही संवाद झाला नाही. मी गेलो की त्यांना `नमस्कार’ किंवा क्वचित `जय महाराष्ट्र’ म्हणत असे. (त्यावेळी `जय महाराष्ट्र’ फारसा प्रचलित झाला नव्हता.) आणि निघताना `जातो’ म्हणून सांगत असे. त्यांनीही मला कोण, कुठला, कशासाठी येऊन बसतो, काहीही विचारलेले नाही!
काहीवेळा साहेब तरुणांची फिरकी घेत, त्यांच्या बोलण्यावर विनोद करीत आणि मिस्कीलपणे हसत. या हास्यविनोदामुळे वातावरण एकदम मोकळे होत असे. साहेबसुद्धा त्यावेळी तरुणच होते म्हणून बेरोजगार असलेल्या त्या तरुणांचा ताण नाहीसा होऊन साहेब म्हणजे कोणी दृढ्ढाचार्य न वाटता ते आपल्या कुटुंबातीलच एक आहेत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होई. त्यावेळच्या शिवसैनिकांमध्ये शेवटपर्यंत त्यांच्याबद्दल हीच भावना होती आणि आहे. म्हणून `शिवसेना’ म्हणजे एक मोठे कुटुंब आणि साहेब कुटुंबप्रमुख म्हणून `शिवसेनाप्रमुखच’ शिवरायांचे सलगी देणे कसे असे’ हे प्रथम मला तेथे आढळून आले, अनुभवास आले!