भारताचे विक्रमवीर लिटिल मास्टर सुनील गावसकर नुकतेच ७५ वर्षांचे झाले… आंतरराष्ट्रीय सामन्यांमधले गावसकर सर्वांनी पाहिले आहेतच, पण मुंबई क्रिकेटची शान असलेल्या कांगा लीग, हॅरिस शील्ड अशा स्पर्धांमध्ये, दादर युनियन क्लबच्या नेट्समध्ये अनुक्रमे त्यांच्या खेळी आणि त्यांचा सराव अगदी जवळून पाहिलेल्या एका ज्येष्ठ क्रीडापत्रकाराने घडवलेलं हे क्लोजअपमधलं दर्शन… अनोखं आणि अविस्मरणीय…
– – –
एकेकाळी मी ज्या वर्तमानपत्रात नोकरी करत होतो, त्यांनी एका वर्षी सुनील गावसकर यांचा एका शानदार पुरस्काराने गौरव करायचं ठरवलं. इतरही काहीजणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होतं, पण, सर्वोच्च पुरस्कार सुनील गावसकरला देण्यात येणार होता (महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा हा मानबिंदू आता पंचाहत्तर वर्षांचा झाला असला तरी क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ‘तो सुनील’च… या एकेरी उल्लेखात औद्धत्य नाही, प्रेम आहे, आपलेपणाचा जिव्हाळा आहे). या पुरस्कार सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मला त्याच्या घरी जायची संधी लाभली अन् माझे मित्र हेमंत वायंगणकर यांच्याबरोबर मी सुनीलच्या वरळीतील स्पोर्ट्सफील्डमधल्या घरी पोहोचलो. सुनीलबरोबर चहापान झालं. त्यांच्या घरी काही दुरुस्तीचं काम सुरू होतं. सुनीलची नात रिया (रोहनची मुलगी) छोटी असल्यामुळे सुनीलकडेच असायची. पण घरी दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे रियाला तिच्या घरी पाठवण्यात आल्याचे सांगताना सुनील म्हणाला, अरे, इकडे सामान पडलंय आणि ‘चुरमुरा’ समजून चुकून तिने चुका (बारीक खिळा) तोंडात टाकला तर गडबड होईल, म्हणून रियाला पाठवलं तिच्या घरी!… हे सांगताना आजोबा सुनीलने चुरमुरा या शब्दाचा बालसुलभ केलेला उच्चार खासच. मिश्कील आजोबा सुनीलची एक झलक त्यातून बघायला मिळाली. अर्धा तास गप्पागोष्टी केल्यावर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी सुनील दरवाजापर्यंत आला आणि उंबरठ्याच्या आत राहून त्याने फारोख इंजिनिअरची धमाल नक्कल करून दाखवली… ‘हम सनान को जाते हैं’ असं इंजिनिअरची परफेक्ट मिमिक्री करत सांगितलं. आम्ही हसून लोटपोट झालो.
मिश्किलपणा हा सुनीलचा स्वभाव. नर्मविनोदी टिप्पणी करण्यात तो माहीर आहे. टीव्हीवर त्याचं समालोचन ऐकताना या गुणाची सतत प्रचिती येते.
सुनील मनोहर गावसकर या श्रेष्ठ फलंदाजाचं ‘सनी’ असं नामकरण केलं वासू परांजपे यांनी. वासू म्हणजे दादर युनियनचा कर्णधार. अतिशय चाणाक्ष आणि धूर्त असा क्रिकेटजगतात वासूचा लौकिक… वासूच्या तालमीत सुनीलची जडणघडण झाली तरी क्रिकेटचं बाळकडू त्याला मिळालं ते मामाश्री माधव मंत्री आणि पिताश्री मनोहर गावसकर यांच्याकडून. मनोहर गावसकर एकेकाळी राजस्थान क्रिकेट क्लबकडून खेळत असत. माधव मंत्री हे भारताचे यष्टीरक्षक आणि फलंदाज तसेच मुंबईचे कर्णधार, फलंदाज म्हणून जास्त मशहूर… सेंट झेवियर्स शाळेत क्रिकेटचे धडे सुनीलने व्यवस्थित गिरवल्यामुळे हॅरिस आणि गाईल्स शील्ड स्पर्धेपासूनच धावांचे डोंगर उभारून शतकांची वेस ओलांडण्याची सवय त्याला शाळकरी वयातच जडली… परिणामी १९६५च्या मोसमात लंडन स्कूलबॉईजचा संघ भारतीय शालेय संघाविरुद्ध कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला, तेव्हा एकनाथ सोलकरच्या भारतीय शालेय संघात सुनील गावसकर होताच; सोबत रमेश नागदेव, सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ हे बंधुद्वय, मिलिंद रेगे, अशोक गंडोत्रा हे सुनीलचे संघ सहकारी होते. १९६५मध्ये ब्रेबर्न स्टेडियमवरील या सामन्यात सुनीलने शतकी सलामी दिली, पण मला हा सामना बघण्याची संधी मिळाली ती अखेरच्या दिवशी. सुनीलची बॅटिंग मला तेव्हा पाहता आली नाही, पण नंतर मात्र हा योग वारंवार आला.
मैदानी क्रिकेट ही मुंबई क्रिकेटची मोठी जमेची बाजू. शालेय क्रिकेटर्ससाठी हॅरिस आणि गाईल्स शील्ड क्रिकेट, ज्यातून विजय मर्चन्ट, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या खेळाडूंनी क्रिकेटची धुळाक्षरे गिरवली. नंतर इंटर-कॉलेजिएट क्रिकेट, शिवाय क्लब क्रिकेटचं मोठं जाळं मुंबईत विणलं गेलंय जवळपास सहासात दशकांपासून. त्यातही उल्लेखनीय म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना, दादर युनियन हे दादरमधील (एकेकाळचे ) प्रतिष्ठित क्रिकेट क्लब्ज. दादरच्या टिळक ब्रिजने याची विभागणी होते. ब्रिजखालील हद्दीत (दादर, माटुंगा भागात) दादर युनियन, माटुंगा जिमखाना, न्यू हिंद हे तीन मशहूर क्लब आहेत. रुईया कॉलेजसमोरील रमेश दडकर मैदानात दादर युनियनची छोटीशी वास्तू आहे. सुनीलच्या जमान्यात तर दादर युनियनची झोपडी किंवा पर्णकुटी होती म्हणू फार तर! अलीकडे दिलीप वेंगसरकरच्या पुढाकारामुळे या पर्णकुटीच्या जागी एकमजली छोटेखानी इमारत उभी आहे. दादर युनियनमुळे सुनील गावसकरसारखा ‘कोहिनूर’ भारताला लाभला. याच क्लबने माधव मंत्री, नरेन ताम्हाणे, रामनाथ केणी, रामनाथ पारकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर असे सात कसोटीपटू भारताला दिले आहेत.
गावसकर कुटुंबीय ग्रॅण्ट रोडच्या चिखलवाडीतून दादरला माधवी अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आणि सुनीलची कसोटी कारकीर्द बहरली. दादरपासून दादर युनियन क्लब अगदी जवळ. या नेट्समध्ये मार्शल ऊर्फ विठ्ठल पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली दररोज तीन तास सराव चालत असे यात दादर युनियनचे खेळाडू तसेच पोदार कॉलेजचं नेट्सदेखील तिथेच लागायचं. दादर युनियन नेट्सवर सुनील गावसकर सरावासाठी यायचा. टेस्ट प्लेयर झाला, नावलौकिक मिळाला, तरी सुनील व्हीएस (मार्शल) पाटील सरांच्या नेट्सवर सरावाला यायचाच अन् याची खबर
कॉलेजियन्सला लागली की त्यांची तिथे झुंबड उडायची. साक्षात तेव्हाचा सुपरस्टार, लिटिल मास्टर सुनीलला नेट्समध्ये बॅटिंग करताना अगदी जवळून बघण्याची संधी कोण सोडणार?
१९७०च्या सुरुवातीला भारतातील टेस्ट सिरीजमध्ये सुनीलला धावांसाठी संघर्ष करायला लागत होता. मी रुईया कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा. प्रिलीम परीक्षा होती. मुंबई विद्यापीठाने कडक धोरण स्वीकारलं होतं. ‘नो प्रिलीम्स, नो फॉर्म’चे बॅनर्स सर्वत्र लागले होते. गंमत म्हणजे त्याच काळात मुंबईत सगळीकडे ‘नो दुराणी नो टेस्ट ‘ असे बॅनर्सही झळकत होते. फटकेबाज सलीम दुराणीला ब्रेबर्न स्टेडियमवर होणार्या टेस्टसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात असल्याची चर्चा रंगत होती. सलीम दुराणी म्हणजे पब्लिक डिमांडनुसार षटकार खेचणारा स्टायलिश लेफ्ट हँडर बॅट्समन आणि सुनीलला त्याच काळात मायदेशातील पहिल्याच टेस्ट सिरीजमध्ये सूर गवसला नव्हता. सुनील त्या दिवशी दुपारी नेट्सवर येणार आहे, अशी कुणकुण मला लागली आणि प्रिलीमचा मराठीचा पेपर होता होता माझं सारं लक्ष सुनीलच्या सरावाकडे लागलं होतं. मी मराठीत पास होण्यापुरते मार्क मिळतील तेवढे प्रश्न सोडवून उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाच्या हाती सोपवून सरळ मैदानात धूम ठोकली आणि नेट्सच्याबरोबर मागे उभं राहून सुनीलची बॅटिंग डोळे भरून पाहिली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी आमची कॉलेजची इंटर डिव्हिजन क्रिकेट मॅच होती, टेनिस बॉलची. त्या मॅचमध्ये आमच्या टीमचा डाव घसरल्यावर मी माझा मित्र सुनील जुवळेबरोबर बर्यापैकी पार्टनरशिप करून डाव सावरला. त्यावेळी सुनीलची नेट्समधील बॅटिंग बघितल्याचा थोडाफार फायदा मला निश्चितच झाला.
आपल्या कारकीर्दीच्या ऐन बहरात धावांची टाकसाळ खोलणार्या सुनीलने जगातील सर्व मैदानं गाजवली. मद्रास, मेलबर्न, कराची, कोलकाता, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पैâसलाबाद, अशी सगळी… पण मुंबईत कांगा लीग, टाइम्स शील्डमध्येही सुनील तितक्याच उत्साहाने खेळत असे. शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन यांच्यातील सामना म्हणजे ‘बॅटल ऑफ रोझेस’ (यॉर्कशायर-लँकेशायर मॅच )असं त्याचं वर्णन केलं जायचं. उभय संघामध्ये टेस्ट प्लेयर्सचा भरणा असल्यामुळे शिवाजी पार्कवर रविवारी सकाळी कांगा लीगचे सामने बघायला सातआठ हजार प्रेक्षक गर्दी करत असत. एकदा कांगा लीगमध्ये शिवाजी पार्क जिमखाना-सीसीआय यांच्यात मॅच होती. सुनील त्या वर्षी सीसीआयकडून खेळत होता आणि शिवाजी पार्ककडून रमाकांत देसाई खेळत होते. देसाईंच्या गोलंदाजीवर सुनीलने एक चौकार मारला. पण लगेच रमाकांत देसाईने सुनील गावसकरचा त्रिफळा उडवल्यावर पार्कात सन्नाटा पसरला. सगळा क्राऊड आला होता वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी करणार्या सुनीलची बॅटिंग एन्जॉय करण्यासाठी. पण या सामन्यात सुनीलची खिलाडू वृत्ती दिसून आली. बुजुर्ग रमाकांत देसाईनी टाकलेल्या चांगल्या चेंडूला दाद देत सुनील शिवाजी पार्क जिमखान्यात परतला आणि तिथे उभ्या असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला ओळख देत सुनीलने त्याच्याशी संवाद साधला. त्या व्यक्तीने एक पॅकेट सुनीलला दिलं. ती होती फँटमची कॉमिक्स. ते होते टाइम्सचे रनर, म्हणजे पेपरला स्कोअरशीट देणारे गृहस्थ. ते सुनीलला हॅरिस, गाईल्स शील्डच्या सामन्यापासून ओळखत होते. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या देशांतील प्रदीर्घ दौर्यांमुळे सुनीलला फँटम कॉमिक्स वाचता आली नव्हती आणि त्या गृहस्थांनी सुनीलची आवड लक्षात ठेवून त्याच्याकडे ते कॉमिक्सचं बाड दिलं तेव्हा सुनीलची कळी खुलली आणि त्यांना थँक्स म्हणत सुनील पुन्हा मैदानात उतरला.
सुनीलला वाचनाची विलक्षण आवड. आजूबाजूला गोंधळ, गडबड असेल तरी त्याच्या वाचनात खंड पडत नाही. एकाग्रता हे सुनीलच्या एक वैशिष्ट्य.
दादर युनियन आणि शिवाजी पार्क यांच्यातील कांगा लीगची मॅच म्हणजे पर्वणीच. शिवाजी पार्क मैदानात वाढलेल्या हिरव्यागार गवतात बसून किंवा अक्षरश: लोळत पडून मॅच बघण्यासाठी दर्दी क्रिकेटप्रेमी विकेटच्या बरोबर मागे जागा पकडून असत… टीव्हीवर आपण ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिकेतील स्टेडियमवर ग्रास बँकवर क्रिकेटचा आनंद मनमुराद लुटणारे प्रेक्षक पाहतो. तिथली मजा काही औरच, पण शिवाजी पार्कचं ग्रासबँक निदान तेव्हा तरी निराळंच असायचं. अजित वाडेकर, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, मनोहर हर्डीकर (मास्तर) हे सारे शिवाजी पार्कचे टेस्ट प्लेयर्स आणि प्रतिस्पर्धी दादर युनियनकडे सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, रामनाथ पारकर, या त्रिकुटाचा नेता वासू परांजपे, स्विंग आणि कटर्सने फलंदाजाना जखडून ठेवणारे व्हीएस उर्फ मार्शल पाटील आणि त्यांच्या जोडीला डावखुर्या उर्मिकांत मोदीचा अचूक मारा. या सार्याची मजा शिवाजी पार्कला इतक्या जवळून बघायला मिळायची की बस रे बस्स! पुढचा रविवार येईपर्यंत या झुंजींच्या आठवणीत रमताना रुईया नाक्यावर चर्चा, वादविवाद रंगत. आम्ही रुईयावाले दादर युनियनचे कडवे समर्थक आणि शिवाजी पार्क म्हणजे होम टीमच्या बालेकिल्ल्यात जाऊन तिकडे आमच्या ग्रुपचा सपोर्ट दादर युनियनलाच असायचा. पण शिवाजी पार्कवाले काही कमी नव्हते. आम्ही रविवारी सकाळची एनसीसी परेड आटोपून बॅग पाठीवर मारून टिळक ब्रिज पार करून पार्कमध्ये धडकायचो आणि जागा अशी मोक्याची पकडायचो की एका वेळी दोन मॅचेसचा आनंद लुटता येईल. यंग महाराष्ट्रची टीम म्हणजे निम्मी टीम रुईयाचीच, भरत नाडकर्णी, मोहन नारकर, नरहर भांडारकर, आशिष भन्साली. कांगा लीगमध्ये षटक नव्हे तर अष्टक असायचं त्यामुळे चार-पाच मिनिटं लागायची एका ओव्हरसाठी आणि आमची शेरेबाजी सुरूच असायची. त्यामुळे, शिवाजी पार्कचे निस्सीम चाहते वैतागायचे. पण कधीही मारामारी नाही की शिवीगाळ नाही. आमच्या बॅगेत ही मंडळी गवत आणि दगडधोंडे टाकत असत. टी टाइमला गवतातून उठताना बॅग जड लागत असे, तेव्हा आम्हाला समजत असे की सपोर्टर्स नाराज असून अशाप्रकारे, अहिंसक मार्गाने त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
मुंबई स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या इंग्लंड, युरोप दौर्यादरम्यान एकदा लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर सुनीलशी गाठ पडली. आम्ही चारपाच पत्रकार भेटल्यावर सुनील खूष झाला. आमच्यातील एका तरुण पत्रकाराने शूज न घालता सँडल्स घातले होते. सुनीलचं लक्ष तिकडे गेलं तो म्हणाला, अरे, इंग्लंडला आला आहात तर काळजी घ्या. येथील लहरी हवामानात तब्येतीची काळजी घ्यायला हवी. प्रॉपर ड्रेस, शूज वापरा. एन्जॉय करा टूर… इतरांची काळजी करणं हा तर त्याचा स्वभाव. आजारी लोकांना मदत करण्यासाठी सुनील तत्पर असतो. वयस्कर आजारी क्रीडापटूंना मदत करण्यासाठी त्याने चॅम्प्स फॉउंडेशनची स्थापना केली. यंदा त्याची सिल्वर जुबिली झाली. गेल्या २५ वर्षांत या फाऊंडेशनने अनेक क्रिकेटेतर (अपवाद सलीम दुराणीचा) क्रीडापटूंना आर्थिक मदत केली असून हे कार्य सुरू राहील, याची ग्वाही सिल्वर जुबिली कार्यक्रमात दिसून आली… खारघर, नवी मुंबई येथे आजारी बालकांवर औषधोपचार तसेच महागड्या उपचारार्थ मदत करण्यात सुनीलचा पुढाकार असतो, पण, या मदतीचा कुठे गवगवा होतं नाही. आपल्या सहकारी आणि मित्रांना मदत करण्यात तो सदैव पुढे असतो…
…तर सांगत काय होतो की त्या वर्तमानपत्राचा गौरव सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि सुनीलला स्टेजपर्यंत नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. सुनीलबरोबर मी गेटबाहेर उभा होतो. कारण त्या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी कोण असणार आहे, ते सोहळ्यातल्या कोणालाही माहिती नव्हतं. विजेत्याच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती… भारतीय टीमचे माजी कर्णधार अजित वाडेकर, चंदू बोर्डे, उमेश कुलकर्णी, सुधीर नाईक, अजित पै, लालचंद राजपूत हे हजर होते. अजित पै हॉलमध्ये नसल्याने मी टेन्शनमध्ये होतो. कारण बॅकस्टेजला सोहळ्यास हजर असलेल्या मान्यवरांची यादी देण्यात आली होती. सुनीलला माझं टेन्शन जाणवलं आणि तो म्हणाला, तू कशाला टेन्शन घेतोस? मी त्याला म्हणालो, अजित पै हॉलमध्ये नाहीये. तो घरगुती कामामुळे तिथे नाहीये, असं सुनीलने मला सांगितलं. मी चटकन योग्य व्यक्तींना गाठून अजित पै नसल्याने त्याचं नाव पुकारू नका, असं कळवलं. दरम्यान एन्ट्रीला उशीर होत असल्यामुळे सुनील दाराच्या गॅपमधून आत काय चाललंय, ते बघत होता. बाजूच्या गेटला अभिनेत्री भारती आचरेकर होती. तिने सुनीलशी जरा मस्करी केली आणि सुनीलनेही खेळकरपणाने हे सारं घेतलं… त्या सगळ्यातून माझं टेन्शन गेलं… आपल्या सहकार्यांना कसं सावरून घ्यायचं असतं, याचं दर्शनच सुनीलने त्या दिवशी घडवलं… पुढे सोहळा यथासांग पार पडला आणि सुनीलचा इतका जवळून सहवास लाभल्यामुळे आणि त्याच्या मिश्कीलपणाचं दर्शन घडल्यामुळे मलाच मोठा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला… सुनीलच्या पुरस्काराचा त्याला झाला असेल, त्याहूनही कदाचित थोडा जास्तच.