(एक आत्यंतिक बिकट श्रीमंताचे घर. भसभंगळ घरात घरधणीन प्लास्टिकच्या बटव्यातील शिळ्या भाकरीचे कोरके (?) ज्याला ट्रायँगल की त्रिकोण म्हणून हिणवलं जातं, ते खात सोफ्यावर बसलीय. बिकट श्रीमंतीमुळे गुढघ्यावर फाटलेली जीन्स नि खांद्यावर कापड आटल्यानं दिसणारे खांदे उडवत एक दुर्दैवाने सुपोषित राहिलेली कन्यका आतून कुठल्याशा धान्याचे धिरडे, ज्यात तिन्हीसांजेचं नासके दूध वापरलेय नि निव्वळ झाडपाला पसरलाय, ते घेऊन सोफ्याच्या दुसर्या टोकाला बसते. मायलेकी आपली दयनीय श्रीमंती बघून उगाच गलबलून जातात. त्या एकमेकीकडे बघून केवळ धीर देत घास घशाखाली ढकलत वरून निळ्या-हिरव्या बाटलीतील कार्बोनेटेड वा सोडायुक्त पाणी पिऊन ओलाच आवंढा गिळतात. तितक्यात बाहेरून रेंज रोव्हर वा एसयूव्ही वगैरे खटारा गाड्यांचा हलकासा ध्वनी येतो.)
घरधणीन : (हातातील कोरक्यांना घश्याखाली ढकलत आतुरतेने) आलेत का गं हे? आलेत?
कन्यका : (अनिच्छेने हातातील धिरडे संपवत) इतका क दर्जाचा बारीक आवाज आपल्याच गाडीचा आहे मॉम! ह्या एरियात आपणच इतके दुर्दैवी श्रीमंत आहोत.
(कमनशिबी श्रीमंत घरधनी आत प्रवेश करतो.)
घरधणीन : (अपार उत्सुकतेने ) आलात? स्वामी आपण आलात? (जड पावलांनी घरधनी आत येऊन समोर बसतो. लेकीकडे बघत) बाळ, तुझ्या पपांना तेच प्युरिफाईड वॉटर आण.
कन्यका : (काहीशा रागाने) नो ममा!! आय हेट दॅट वॉटर! किती दिवस आपण हेच पिणार आहोत? आपल्याला कधी मिडल क्लास वा लोअर क्लाससारखं निव्वळ धरणाचं पाणी पिताच येणार नाही का? व्हाय ममा? इतकं डिस्क्रिमिनेशन का?
घरधणीन : (एकदम भडभडून येऊन लेकीला गच्च मिठीत घेत) बाळ! आपल्या हातून गेल्या जन्मी नक्कीच काही पातक घडलं असेल. त्याशिवाय आपल्याला ही अशी भयानक बिकट श्रीमंती ना मिळती!
घरधनी : (बसल्या जागी ओक्साबोक्शी रडत) हे पाप तुम्हा दोघींचं नसेल, ते माझ्याच हातून घडलं असावं! ज्याची फळं तुम्हाला भोगावी लागतायत! हे भगवंता, तू मला सरळ साधी गरिबी का दिली नाहीस रे? का हे भोग माझ्या नशिबी आलेत? का? (मोठ्याने टाहो फोडतो. तो आवाज ऐकून बाहेरून ड्रायव्हर आत डोकावतो.)
ड्रायव्हर : साहेब, जरा एको कमी करता का? नाही, मी मोबाईलवर बोलतोय. `हॅलो, हॅलो!’ चारदा करूनही बायकोला साधं `हॅ..’ ऐकू जात नाहीय. (घरधनी ड्रायव्हरला थंब दाखवत स्वतःचा एको घटवतो. तसा ड्रायव्हर समाधानाने दार लावून घेतो.)
घरधनी : (अश्रू आवारत) बाळ, तू अभ्यास केलास?
कन्यका : (आंबट चेहर्याने) पपा, सरांनी होमवर्कसाठी दिलेली क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी माझ्या गाईडमध्ये आहेत.
घरधनी : (धसक्याने) काय? हे भगवंता हा काय छळ चालवलास रे तू? (नवरा-बायको पुन्हा रडू लागतात. तोच दारामागून ड्रायव्हर डोकावतो व ते आवाजाचा एको कमी करतात.)
कन्यका : (कळवळून) पपा, प्लीज रडू नका ना! मी किनई खूप कष्ट करेन आणि तुमच्या स्वप्नातील अतिसामान्य गरीब नाहीतर कमीतकमी सर्वसामान्य मध्यमवर्गीय बनून दाखवेन.
घरधनी : (गलबलून ऊर भरून येत) बाऽऽळ, बा:ऽऽळ, बाऽहऽऽळ! किती तो पोक्तपणा! तुला बघितलं ना की मला… हे? ते… याची आठवण येते!
घरधणीन : (कोरक्याचे आणखी दोन प्लास्टिक बटवे सापडल्याने काहीशी किंचाळत) हे भगवंता, मला आणखी दोन पॅक मिळालेत हे!
घरधनी : (आश्चर्याने किंचाळत) काय? अजून हे संपले नाहीत? हे भगवंता, किमान आयुष्यातील दुर्दैवी श्रीमंती संपत नाहीये तर किमान असल्या थुकरट गोष्टी तर संपू दे! (रडू लागतो.)
ड्रायव्हर : (दार रागाने ढकलून आत येतो.) काय चालूय तुमचं? किती तो आवाज? मला डिस्टर्ब होतंय! यू ब्लडी रिच पीपल्स!
घरधणीन : (हात पसरत) भाऊ, मी हवंतर पदर पसरते. पण आम्हा श्रीमंतांना माफ करा!
ड्रायव्हर : ( मांडी घालून सोफ्यापुढे बसत) का रडताय तुम्ही? तुमची काही समस्या आहे का? भूतबाधा, अरेंज्ड मॅरेज, कोर्टकज्जा, संततीविषय, प्रॉपर्टी विषयक समस्या…
घरधणीन : (काहीतरी आठवल्यागत करत) प्रॉपर्टी विषयक समस्या…? नाही! पूर्वी होती!
ड्रायव्हर : होती म्हणजे?
घरधणीन : मला जमीन हवी होती, तेव्हा होती समस्या!
ड्रायव्हर : तेव्हा होती म्हणजे?
घरधणीन : हो, तेव्हाच होती. पण मी घोडा घेऊन गेले आणि समस्या सुटली!
ड्रायव्हर : (लगाम ओढल्याची खूण करत) घोडा?
घरधणीन : (कपाळाला दोन बोट लावत बंदुकीची खूण करत) हा घोडा!
ड्रायव्हर : ओह! मग नेमक्या कुठल्या समस्येने तुम्ही चिंतित आहात आता? कोर्टकज्जा…?
घरधनी : (आसवं पुसत) कोर्टकज्जा…? नाही, त्याचीही चिंता नव्हती.
ड्रायव्हर : का?
घरधनी : एक नातेवाईकाला कोर्टात नेण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हा मीही (कपाळाला दोन बोटं लावत बंदुकीची खूण करत) घोडा काढला होता…!
ड्रायव्हर : मग तुमच्या ह्या इतक्या भयानक दुःखाचं कारण काय? का रडताय तुम्ही?
घरधनी : भावा, तुला तर माहिती आहे आमची किती भयावह चिंताजनक श्रीमंती आहे ते? आणि ती वाढतच जातेय. आम्हालाही तुझ्यासारखी साधी सरळ गरिबी हवीय रे!
ड्रायव्हर : ते तर फार अवघड आहे बुवा! एकवेळ नौरंगजेब आणि पंतोजीकृपेने झटपट श्रीमंत होणं सोपं, पण गरीब होणं? महाकठीण!!!
घरधणीन : भाऊ, तू तर जाणतोच! सध्या श्रीमंतांच्या मुलांना रॅश ड्रायव्हिंगबद्दल कशी अटक करतायत. आमचीही मुलगी आहे…
घरधनी : ते तर फार भयानक आहे. सरकार गरिबांना झोपायला फुटपाथ देते, आम्हा श्रीमंतांना गाडी चालवण्यासाठी हवी ती लेन आरक्षित करू शकत नाही?
कन्यका : आणि क्रिकेटमध्ये दोन बाऊन्सर अलाउड असतात, मग आम्हाला डेली दोन गाड्या ठोकल्यास माफी मिळायला हवी ना?
ड्रायव्हर : बाळ, हा खरंच चिंतेचा विषय आहे. पण सध्या तुमच्या गंभीर श्रीमंतीवर आपण उपाय शोधायला बसलोय ना?
घरधणीन : भाऊ, खरंच ह्या चिंताजनक श्रीमंतीवर काही उपाय निघेल?
ड्रायव्हर : तुम्ही असं का करत नाही? बंद पडलेल्या कंपन्यांत, कारखान्यांत पैसे गुंतवत जा! आधीच बंद असल्यामुळे तुमचे पैसे बुडतील आणि तुम्ही झटपट गरीब व्हाल.
घरधनी : भाऊ, उलट आम्हाला अश्या प्रकरणांतून कैकपट नफा मिळालाय, आम्ही बँका, पतसंस्था, विवादित जमीन, दुकानं, धंदे सगळ्यांत पैसे गुंतवून बघितले, पण त्यातून काहीएक पटींनी अधिकच पैसे मिळाले. तू दुसरा काही उपाय सुचव.
ड्रायव्हर : (डोकं खाजवत) एक उपाय आहे, पण तो फार किचकट आहे नि त्यातून केवळ तुमची पत्नी आणि मुलगी यांनाच गरिबी मिळू शकते.
घरधनी : काय सांगतो भाऊ? निदान त्या तरी गरीब होतील? सांग, सांग! त्वरेने सांग, तो उपाय! माझे कान आतुरलेत!
ड्रायव्हर : तुम्ही पत्नीस टाकून द्या!
घरधनी : टाकून द्या? (फेकल्याची खूण करत) म्हणजे हे असं?
ड्रायव्हर : अहो, म्हणजे डीवोर्स द्या! फारकत, फारकत…!!
घरधणीन : पण त्याने काय होईल?
ड्रायव्हर : त्याने ते तुम्हाला बिना पोटगी देता घराबाहेर हाकलतील, प्रॉपर्टी देणार नाहीत, पैसे देणार नाहीत. तुम्ही मुलीला घेऊन दारोदार फिरावं, काही एनजीओना घेऊन कोर्टात जावं, पतीविरुद्ध केस करावी, केस संपेपर्यंत तेही गरीब होतील.
घरधणीन : व्वा! म्हणजे मी आणि माझी लेक झटपट गरीब होऊ तर… (ब्लॅक अँड व्हाइट स्वप्नात जात) मग मी ह्या चौसोपी घरात एक शिलाई मशीन आणेन, त्यावर शिवणकाम करून मुलीला शिकवीन, तिला आणखी गरिबीत ठेवण्यासाठी खूप शिकवीन, ह्या घरावर कर्ज काढून तिला एम्पेशी, युपेश्शी करायला लावून कारकून बनवीन!! बाई, कित्ती छान? (स्वप्नात हरखून जाते.)
कन्यका : (नुसत्या कल्पनेने मोहरत) वॉव! कित्ती भारी! म्हणजे माझ्याकडे गाईड नसतील, मग मी कॉपी करून परीक्षा देईन, ऐंशीऐवजी चाळीस टक्के घेईन, गरिबीचा स्ट्रगल माझ्याही नशिबी येईल, पण पपा अश्याने मी कारकून होईन कशी?
घरधनी : बाळ, आठव तुला एक डोळ्याने ब्रँडेड वस्तू दिसतात, पण त्याच डोळ्याने साध्या, साध्या वस्तू मात्र दिसत नाहीत…?
कन्यका : हो? पण याचा काय संबंध?
घरधनी : बाळ, तू जन्मापासून एक डोळ्याने उणे सत्तावन्न टक्के तर दुसर्या डोळ्याने गुणे बहात्तर टक्के अंध आहेस. आम्ही ते तुझ्यापासून लपवून ठेवलं. पण ह्या अश्या सुसह्य गरिबीत तू त्याचं सर्टिफिकेट घेऊन परीक्षा देऊ शकतेस बाळा!
कन्यका : बाबा, पण मला रिजर्वेशन घेता येईल?
ड्रायव्हर : मुली, तू कधी बीसी, वगैरे शिव्या ऐकल्यास?
कन्यका : हो! पण का?
ड्रायव्हर : मग बाळा तुला बेस्सीचं भेसळ कास्ट सर्टिफिकेट सहज मिळेल.
कन्यका : खरंच?
ड्रायव्हर : बाळा सदरहू कास्ट सर्टिफिकेट रोम गॅजेटप्रमाणे कुणाही कॅथॉलिक रोमन वा प्रोटेस्टंट वा इतर बेस्सी लोकांना सहज मिळते.
कन्यका : पण मला महाराष्ट्र केडर कसं मिळेल बाबा?
घरधनी : बाळा! आपल्या श्रीमंतीची कणव उभ्या म्हाराष्ट्रात कुणाला तरी येईलच! कुणी सेंद्रीय वजीर, दिवाण, मनसबदार हा स्ट्रगल बघून हेलावेलच.
कन्यका : बाबा, मग मला तुमची झॉडी द्याल? मी त्यावर झुंबर दिवा लावून आतापासूनच प्रॅक्टिस करेन!
घरधनी : हो, बाळा! का नाही?
ड्रायव्हर : बाळा, फक्त तुझ्यासारख्या इतर बिकट श्रीमंत व्यथित वरिष्ठांकडे केबिन मागू नको. नाहीतर ते नवीन कॅबिनऐवजी तुझीच `पूजा’ करवतील. आणि ह्या दुर्दैवी श्रीमंतीत तुला ढकलतील. काय?