शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब अतिशय फटकळ, परखड. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कधी कोणाचा मुलाहिजा राखला नाही, त्यांच्या कुंचल्याचे फटकारे सगळ्यांनाच सहन करावे लागले. तरीही राजकारणात, सर्व पक्षांमध्ये त्यांचा मित्रपरिवार होता आणि तो मोठा होता. शरद पवार आणि बाळासाहेब एकीकडे निवडणुकांच्या रणधुमाळीत एकमेकांवर तोफा डागायचे, भाषणांमध्ये एकमेकांवर प्रखर टीका करायचे; पण, ते शरदबाबू रात्रीच्या जेवणाला सहकुटुंब मातोश्रीवर यायचे आणि हास्यविनोदांची अफाट मैफल रंगायची… जॉर्ज फर्नांडिस हे बाळासाहेबांचे ‘अरे तुरे’मधले मित्र. बाळासाहेबांना बाळ म्हणू शकणारे. त्यांच्या धडाडीवर बाळासाहेब फिदा होते, मात्र, ही बेबंद धडाडी अनेकदा आत्मघातकी ठरते, हेही त्यांना माहिती होते. त्यामुळे, १९७९ साली जनता पक्ष निवडणुकीत मार खाणार, हे भाकीत जॉर्ज यांनी केलं तेव्हा बाळासाहेबांनी सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न त्यांना विचारला, डायनामाइट तुम्हीच लावणार असाल?… जॉर्ज यांच्या प्रसिद्ध बडोदा डायनामाइट खटल्याचा संदर्भ त्याला होता. जॉर्ज यांच्या विघातक राजकारणावरचं हे मार्मिक भाष्य होतं. मैत्री मैत्रीच्या जागी, व्यंगचित्रकार म्हणून तडाखे खावेच लागणार, हा बाळासाहेबांचा ठाकरी बाणा त्यांच्या मित्रांनीही फार प्रेमाने स्वीकारला होता मात्र.