महाराष्ट्राचे लाडके आणि बडबडे व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीसजी यांनी ‘मी पुन्हा येईन’ची हाळी दिल्यापासून महाराष्ट्राचे दाढीधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवालदिल झाल्याची बातमी माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याने दिली आणि तोच बेचैन आहे. तो मला म्हणाला, हा काय चावटपणा आहे. माणूस इतका निर्लज्ज कसा काय होऊ शकतो? त्यावर मी म्हणालो, अरे विनोदाने बोलले असतील ते. असं म्हटल्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही. वाटल्यास तू त्यांची खास मुलाखत घेऊन त्यांनाच विचार. तसा पोक्या गेला आणि पुन्हा आला तो टेप केलेली मुलाखत घेऊनच. म्हणाला, ऐक आता. टेप सुरू केली.
– नमस्कार मा. मुख्यमंत्री.
– नुसते मा. म्हणू नका. त्यातून बरेच अर्थ लोक घेतात. तुम्ही मला देवेंद्र किंवा देवेंद्रजी म्हणा. फडणवीसही म्हणू नका. ते ऐकताच पंख फडफडल्याचा आवाज येतो आणि शेवटी वीस असल्यामुळे त्याआधी चारशेचा आकडा असल्याचा भास होतो. असो. का आलात?
– नुकतीच तुम्ही पत्रकारांपाशी ‘मी पुन्हा येईन’ ही लोकप्रिय भविष्यवाणी पाचव्यांदा ऐकवलीत. ‘मी कसा येतो हे तुम्हाला माहीत आहे’ असं तुम्ही सुनावलंत. याचा नेमका अर्थ काय घ्यावा?
– पोक्याजी, वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. मागे तुम्हीच मला ‘खोटे बोला पण दामटून बोला’ असा सल्ला दिला होता. आज त्यामुळेच मी विरोधकांवर वाटेल तसे तोंडसुख घऊ शकतो. तुम्ही अधिकृतपणे भाजपात प्रवेश करा. आमदारकीची सोय मी करतो.
– ते राहू द्या. प्रथम मुख्यमंत्रीपदी तुमची सोय तुम्ही कशी काय करणार हे मला विस्कटून सांगा. त्या बिचार्या शिंदेंचे धाबे दणाणले आहे. सध्या ते विमनस्क असतात. तुमच्या बोलण्याचा कितीजणांवर विपरीत परिणाम होतो याची कल्पना तुम्हाला नाही, आम्हाला आहे.
– काळजी करू नका. मी कुठेही, कधीही, कसाही जातो हे तुम्हाला चांगलेच माहिताय. अगदी न बोलावताही जातो. त्या शिंद्यांचा कुठेही प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा समारंभ असला तरी मी न सांगता अचानक तिथे प्रगट होतो आणि सार्यांना आश्चर्याचा धक्का देतो. त्यांच्यासोबत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मी असतोच. मुख्यमंत्रीपदावर मी केव्हा, कधी, कसा बसेन हे तुम्हाला सांगत बसलो तर मग माझ्या पुन्हा येण्यात काय सस्पेन्स राहील? पण आता सगळे माझ्या इशार्याने सावध झालेत. अगदी अजितदादासुद्धा. त्यांची तर सगळीकडून हवाच काढून घेण्यात आलीय. मग राहिला कोण! अर्थात मीच. बुद्धिबळातल्या पटातील सोंगट्यांप्रमाणे मी सरळ, आडवा, तिरका, अडीच घरं, कसाही चालू शकतो. घरीसुद्धा मी कधी दारातून, कधी खिडकीतून, कधी भुयारातून, कधी घरातल्या सरकत्या चौकटीतून, कधी फोल्डिंग भिंतीतून आत प्रवेश करतो. रात्री-अपरात्री घरात सगळी सामसूम झाल्यावर मी बाहेर जातो आणि भेटीगाठी घेऊन पहाटे याच पद्धतीने परतही येतो. त्यामुळे सीएमची खुर्ची माझ्या दृष्टीने आता अप्रूप राहिलेली नाही आणि माझं स्पष्ट मत आहे की लायकी असलेल्या माणसालाच ती खुर्ची मिळायला हवी.
– म्हणजे शिंदे त्या पदाला लायक व्यक्तिमत्व नाही? अहो, एवढे आडदांड आहेत आणि त्यांना भरभक्कम दाढीही आहे. तुमच्यासारखे तुळतुळीत नाहीत गाल त्यांचे त्या कतरीनासारखे.
– पण नुसती बॉडी आणि दाढी असून चालत नाही. त्याबरोबर माझ्यासारखं डोकं लागतं. ‘डोका है तो खोका है’ कळलं?
– म्हणजे तुम्हीही खोके देऊन सीएम होणार?
– काहीतरीच काय बोलता? मला एवढंच म्हणायचंय की डोकं हे खोकं असून चालत नाही. त्यात काहीतरी हवं. ते माझ्यात आहे. म्हणूनच मी म्हणतो की, मी पुन्हा कसाही येईन. तुम्ही पाहात राहा.
– मागेही तुम्ही असंच बोलत होता. पण कुठे आलात! आलात ते दिपोटी सीएम म्हणून. या पदाला काही किंमत नसते. फक्त वरच्या माणसाच्या हाताला हात लावून ‘मम’ म्हणणं एवढंच त्याचं काम.
– पण माझ्या बाबतीत उलटं आहे. वरचेच ‘मम’ म्हणत असतात. मी दिपोटी असलो तरी मी म्हणेन ती पूर्वदिशा हाच प्रकार असतो, हे तुम्हालाही माहीत आहे. आज मी आहे म्हणून ते आहेत. त्यामुळे मला या दुय्यम समजल्या जाणार्या पदाचा कंटाळा आलाय.
– येत्या निवडणुकीतही तुम्हाला आणि पक्षाला महाराष्ट्रात त्यांच्याच नेतृत्त्वाखाली काम करावं लागेल, अशी तंबी तुमच्या शहा आणि मोदी यांनी दिलीय त्याचं काय?
– तोपर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर असले तर ना! त्यांचं मुख्यमंत्रीपदी राहणं भाजप नेतृत्वाला परवडणारं नाही आणि मान्यही नाही. फक्त आला त्याला हरभर्याच्या झाडावर चढवण्यासाठी नेतृत्वाला तसं बोलावं लागतं. सुप्रीम कोर्टाने तर बोर्या वाजवलाच आहे, आता सन्मानाने पायउतार करण्याची वेळ आली आहे. राव पडले आणि पंत चढले ही स्थिती आता लांब नाही.
– पण झेप चुकून नको त्या दरीत पडली तर कपाळमोक्ष होईल.
– नाही. खाली पक्षाची संरक्षक जाळी लावली आहे ना!
– तरीही तुमच्याच पक्षातले काही उंदीर ती कुरतडून कंडम करतील ना! मग तुमचं काय होईल?
– हे बघा, दिल्लीत आमचा सारा प्लान आधीच ठरला आहे. त्यात बदल होणार नाही. मला आधी त्यांनी त्यांच्या हाताखाली ठेवलं ते त्यांच्या बुद्धीचा आणि क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी. पण सगळाच ठणठणाट. फक्त पैसेवाटपाच्या घोषणा केल्या आणि मागाल ते मिळेल, अशी आश्वासने दिली म्हणजे कोणी लोकप्रिय होत नाही. इथे त्िाजोरीत खडखडाट झालाय. पाच-पाच लाख वाटूनही अपघात मात्र कमी होत नाहीत. महामार्गाच्या दुरुस्तीचा अभ्यास न करता प्रवाशांना वाचवण्याचे उपाय हे शोधतच नाहीत. त्यासाठी मला ‘त्या’ खुर्चीवर बसण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
– महाराष्ट्रातील तुमच्या पक्षात इतका कॅपेबल नेता दुसरा नाही?
– माझ्या सुदैवाने नाही. एकेक नमुने आहेत. टीव्हीवर ते तोडत असलेले अकलेचे तारे पाहातच असाल. आपण किती शहाणे आहोत हे दाखवून देण्यात वेळ खर्च करतात. कुठे, कसं, काय बोलावं याचा त्यांना पोच नाही. माझे पाय मजबूत करण्याऐवजी मला खाली खेचण्याची त्यांची कारस्थानं सुरूच असतात. मी त्यांच्यासह विरोधी पक्षांना लगाम घालू शकतो हे दिल्लीला माहीत आहे. त्यामुळे मी कसा पुन्हा येईन हे तुम्ही पाहालच.
– तुमचा मुंगेरीलाल न होवो म्हणजे झालं!