ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘बोक्या सातबंडे’ हा जणू मानसपुत्रच. थोडा खोडकर असला तरी तो खोडसाळ नाही. अडचणीत अडकलेल्यांना मदत करण्यास एका पायावर सज्ज असतो. फसव्या, बनावट ढोंगी माणसांचे मुखवटे तो अलगद काढून दाखवतो. दुष्टांचा पराभव आणि सज्जनांचा विजय त्यातूनच होतो. हा बोक्या लहानमोठ्यांच्या मनाचा ताबा घेतो. सर्वांनाच आपलंसं करून सोडतो. असे हे एक जबरदस्त छोटे व्यक्तिमत्व आणि त्याचे एकेक दे धम्माल कारनामे, हे प्रभावळकरांनी प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीतून कथाकार म्हणून जन्माला घातलंय. या बालनाट्याच्या सादरीकरणात मुक्या प्राण्यांवर प्रेम, पर्यावरणरक्षण, निसर्गप्रेम, याचा संदेशच बोक्या रसिकांना देतोय, जो यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत पूर्ण तयारीने रंगभूमीवर अवतरलाय!
बोक्या सातबंडे हे कॅरेक्टर म्हणून अनेक माध्यमातून यापूर्वी वाचक आणि रसिकांना भेटले आहे. राजहंस प्रकाशनने भाग एक ते भाग पाचपर्यंतची पुस्तक मालिका प्रसिद्ध केलीय. या पाचही आवृत्त्या १९९४पासून मराठी वाचकांना परिचित आहेत. शाळा-कॉलेजात आजही त्यांना चांगली मागणी दिसते. या पुस्तकमालिकेला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. २००९या वर्षी एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झाल्याचे आठवते, ज्याचे दिग्दर्शन राज पेंडूरकर यांचे होते, तर कांचन सातपुते हे निर्माते होते. त्यात प्रभावळकरांचीही भूमिका होती. यंदा या बालनाट्याने प्रभावळकरांच्या एका कथेतील प्रकरणाला शंभर टक्के न्याय दिलाय.
पहिल्या अंकात एका मध्यमवर्गीय घरातलं वातावरण. सोसायटीतलं वास्तव्य. घरात बाबा, आई, आजी आणि बोक्या! आजी आणि बोक्याचं ट्युनिंग चांगले आहे. आजी त्याला मूळ नावाने म्हणजे ‘चिन्मयानंद’ या नावाने बोलविते. या घरात बोक्याने कासव पाळलंय. ते लपवून ठेवलंय. घरातल्या मोठ्यांना याची काहीएक माहिती नाही. ‘बोक्या’च्या दोस्त मंडळींमध्ये यश, मिनी, रघू हे शेजारी साथ देताहेत. रघू वयाने या सर्वांपेक्षा मोठा आहे. त्याने ससा, कुत्रा, मांजर, साप, पोपट पाळलेत. ते सारे लपविण्यासाठी बोक्याच्या घरात येतात आणि सुरू होतो लपवालपवीचा खेळ. या सोसायटीचे सेक्रेटरी वाघमारे, जे नावाला जागून भलीमोठ्या बंदुकीसह संचार करतात. सोसायटीच्या आवारात, घरात कुठलेही प्राणी पाळण्यास त्यांचा विरोध असतो. ‘वास’ काढत ते या घरापर्यंत पोहचतात. अखेर एका प्रसंगात ही लपवाछपवी उघड होते आणि गुपित फुटते! मग या सार्या मुक्या प्राण्यांना सोबत घेऊन ही बच्चेकंपनी जंगलाकडे निघते. त्यांच्या हक्काच्या घरात रवानगी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आता हे कथानक नव्या वाटेवर पोहचते.
दुसर्या अंकात जंगलात पोहचतात. तिथे भलेमोठे वृक्ष, डोंगर, दर्या, नदीनाले. काहीसं थरकाप उडविणारं वातावरण. मोर, अस्वल, माकड, खारुताई, हरणाचं पिल्लू आणि जंगलचा राजा सिंह तिथे हजर आहे. मुक्या जनावरांना माणसाची भाषा समजते. परस्परांमधले मनातले मतभेद, गैरसमज ते त्यातून दूर करतात. एका प्रसंगात दरीत पडलेल्याचा जीव वाचवतात. त्यांना सर्वतोपरी मदतच करतात. अडकलेल्याची सुटका करतात. त्यांची मैत्री जुळते आणि माणूस आणि प्राणी यातला सुसंवाद सुरु होतो. या कथानकात अनेक संकटांची मालिका सुरू होते आणि ती या बच्चेकंपनीपुढे तसेच प्राण्यांपुढे पदोपदी उभी राहाते. त्यातून ते कसा काय मार्ग काढतात, तो भाग विलक्षण आहे. त्यामुळे दोन अंकातील हे नाट्य रसिकांना खिळवून ठेवते.
वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा हे तर बालनाट्याचं बलस्थानच ठरतं. बोक्या उर्फ चिन्मयानंद या टायटल रोलमध्ये आरुष बेडेकर चमकलाय! ‘योगयोगेश्वर जयशंकर’ या मालिकेत त्याने बालशंकराची भूमिका केली होती. भूमिकेतली सहजता आणि बालवयात असलेले रंगभूमीवरील पक्के भान हे नोंद घेण्याजोगे आहे. एक तयारीचा बालकलाकार आरुषच्या रुपाने रंगभूमीला मिळाला आहे. त्याला सोबत करणारी ‘टीम’ही शोभून दिसतेय. गोड खाण्याची बंदी असूनही गुपचूप गोड पदार्थ फस्त करणारी आणि स्वतःच्या खोलीत नाच करणारी आजी तसेच जंगलातल्या अस्वल म्हणून दिसणारी अमृता कुलकर्णी हिने बेअरिंग चांगले सांभाळले आहे. रात्री झोपेत चालणारी आई तसेच दुसर्या अंकात मयूरनृत्य करणारी स्वाती काळे यांनीही भूमिकेत रंग भरलेत. बंदूकधारी, मूछसम्राट सोसायटीचा सेक्रेटरी वाघमारे बनले आहेत सौरभ भिसे. त्याला बालरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सिंहाच्या देहबोलीत शोभून दिसणारा सागर पवारही उत्तम. रघु आणि पुष्पा या भूमिकेला न्याय देणारा ओंकार यादव याच्या रफ-टफ अल्लू अर्जुनछाप रांगड्या स्टाईलीला वन्समोअर मिळतात. पुष्पा चित्रपटातला डायलॉग – झुकेगा नही साला आणि हाताची स्टाईलही बालरसिकांना आकर्षित करते. प्रथमेश अंभोरे (ससा) आकाश मांजरे (कुत्रा व माकड), स्नेहा घडवई (खारुताई) आणि कोवळ्या, गोंडस हरणाच्या भूमिकेत शिवांश जोशी यांनीही ही जंगलची सफर यशस्वी केलीय. मुलांच्या भावविश्वात सारेजण पूर्ण तयारीने घेऊन जातात.
‘दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा नट जर परदेशी असता तर त्याने तिथे ‘रान’ पेटवले असते!’ असे कौतुकाचे शब्द हे साक्षात पु. ल. देशपांडे यांनी एकदा उद्गारले होते, त्यांची प्रचिती कथेतून येतेच. सोबतच बोक्यापुढे संकटकाळात निर्णय घेण्याच्या क्षणी प्रभावळकर यांच्याच आवाजात भर रानातही मार्गदर्शनाचे ‘बोल’ ऐकू येतात. हे सुखाविणारे वेगळेपण. हा कथाकार, नटश्रेष्ठ आवाजाने का होईना, या नाट्यात सहभागी होतो, साक्षीदार बनतो आणि अशा प्रकारेही बालनाट्याचे करमणुकीचे रान पेटते राहते! ‘पाहुणे कलाकार दिलीप प्रभावळकर!’ हा सुखद ध्वनीस्पर्श ठरतो.
संयम आणि विचार यातून केलेली कृती कठीण प्रसंगातूनही आपल्याला बाहेर काढते. खोटं बोलणं हे वाईटच आहे, पण त्यामागला हेतू चांगला असेल, तर ते खोटंही चालेल. पण नंतर ते कबूल करावं. मुक्या प्राण्यांना मदत आणि दया हीच खरी माणसाची ओळख आहे. एखाद्या प्राण्याचा जीव वाचविणे ही इतरांसाठी छोटी पण त्या अडचणीतल्या प्राण्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. समस्या ही काहीतरी चांगलं बाहेर आणण्याची सुवर्णसंधी असते. संकटांना आत्मविश्वासाने सामोरं जाणे हेच प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे! प्रभावळकरांच्या आवाजातले हे बोल या नाट्यात पेरले आहेत. जे कथेला अधिकच पूरक ठरतात. बोक्या त्यानुसार निर्णय घेतो. रंजन आणि अंजन असा दुहेरी डोसच रसिकांना त्यातून मिळतो.
प्रभावळकरांच्या कथेचे नाट्यरूपांतर डॉ. निलेश माने यांनी कल्पकतेने केले आहे. प्रत्येक प्रसंग बंदिस्त करण्यावर भर दिसतोय. विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम सांभाळली आहे. बालरसिकांसोबत पालकांनाही गुंतवून ठेवण्याची किमया दिसते. दृष्यसंकल्पना प्रणव जोशी यांची तर वैभव जोशी (गीते), निनाद म्हैसाळकर (संगीत), मिलिंद शिंत्रे (क्रिएटिव्ह) यांनीही अनुभव इथे सिद्ध करण्याची संधी मिळालीय. सध्या ‘सफरचंद’ नाटकाच्या नेपथ्यामुळे चर्चेत असणारे संदेश बेंद्रे यांनी घर आणि जंगल मस्त उभं केलंय, जे मुलांना त्यांच्या भावविश्वात घेऊन जाते. निर्मितीमूल्यांत कुठेही तडजोड केलेली नाही. राहुल जोगळेकर यांची प्रकाशयोजना आणि महेश शेरला, कमलेश बिचे या दोघांची वेशभूषा-रंगभूषा मस्तच. तांत्रिक अंगे नंबर वन. ती व्यावसायिक नाटकांनाही थक्क करून सोडणारी आहेत. ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव यांच्यापासून ते नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे आणि साहसदृश्येतज्ञ राकेश पाटील यांच्यापासून ग्राफिक कल्पनाकार कौस्तुभ हिंगणे, भारत पवार यांच्यापर्यंत कल्पक कलावंतांची मोठी ‘टीम’ पडद्यामागे आहे. नृत्य, गाणी, ताल, सुरात हे नाट्य कळसापर्यंत पोहचते, जे बालरसिकांची फुल्ल करमणूकही करते. तंत्रमंत्राने नाट्य परिपूर्ण. त्यात कुठेही कसलीही तडजोड नाही.
सुधाताई करमरकर, रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, सई परांजपे, कांचन सोनटक्के, वंदना विटणकर, नरेंद्र बल्लाळ, जयंत तारे, श्याम फडके या दिग्गजांनी बालरंगभूमी मराठीत रुजविण्याचे मोलाचे काम केलंय. त्यातून प्रौढ रंगभूमीला यापूर्वी अनेक नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञही मिळालेत. बदलत्या काळात केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीपुरती कार्यशाळा आणि त्यातून काही नाटुकल्या हा प्रकार सर्रास वाढत चालला आहे. ‘रंगभूमीवर दिसावं’ एवढाच त्यामागे मर्यादित हेतू पालकांचा असता कामा नये. मुलांचा संगणकावरला अतिरेक टाळण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून वर्षभर पूर्ण नाटक गरजेचं आहे. याचं भान नाट्यसृष्टी आणि रसिकांनाही असावे. बालनाटकांना संस्कारक्षम परंपरा आहे ती जपण्यासाठी बालरंगभूमीला चाकोरीबाहेर काढण्याचे जे काही थोडेबहुत लक्षवेधी प्रयत्न सुरू आहेत, त्यात या ‘बोक्या’ने यंदा बाजी मारली आहे!
बोक्या सातबंडे (बालनाटक)
मूळ कथा : दिलीप प्रभावळकर
लेखक : डॉ. निलेश माने
दिग्दर्शक : विक्रम पाटील, दीप्ती प्रणव जोशी
संकल्पना/सहाय्यक : प्रणव जोशी, मिलिंद शिंदे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाश : राहुल जोगळेकर
संगीत : निनाद म्हैसाळकर
सूत्रधार : श्रीकांत तटकरे