भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय पक्ष आहे. पण, काँग्रेस पक्ष ज्या अर्थाने राष्ट्रव्यापी होता, राष्ट्रीय होता, देशाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचला होता, त्या अर्थाने भाजप कधीच राष्ट्रीयही नव्हता आणि राष्ट्रव्यापीही नव्हता. देशाच्या अनेक भागांमध्ये भाजप औषधापुरताही नाही. हेच शल्य सतत खुपत असतं, म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर उठसूट तोंडसुख घेत असतात. कर्नाटक विधानसभेच्या निकालांनी भाजपला फक्त गुजरात, उत्तर प्रदेश जनता पार्टी बनवून टाकले आहे.
देशात भाजपची सत्ता प्रामुख्याने उत्तर-मध्य भारत आणि ईशान्य भारतात शिल्लक आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश इथली सरकारं बेकायदा आणि/किंवा अनैतिक आहेत. धाकदपटशा, फोडाफोड्या वगैरे करून जमवलेल्या त्या तकलादू जुळण्या आहेत. निवडणुका होतील, तेव्हा त्या मोडून पडणार आहेत. भाजपची खर्या अर्थाने सत्ता फक्त गुजरात आणि उत्तर प्रदेशात आहे. म्हणून कर्नाटक हरल्यावर महाराष्ट्राचे केविलवाणे उपमुख्यमंत्री म्हणाले की देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेश ठरवतो. हे त्यांनी आधीच पंतप्रधान मोदी यांना सांगितलं असतं, तर त्यांनी प्रचारमंत्री बनून कर्नाटकाच्या निवडणुकीत देशाच्या पैशावर भाजपचा तारांकित प्रचार करण्यात वेळ घालवला नसता. थोडीफार पंतप्रधानपदाचीही कामं केली असती. काही काळाने हे उत्तर प्रदेश आणि गुजरात म्हणजेच देश असंच जाहीर करण्याची वेळ यांच्यावर येणार आहे. त्यांच्या विचारांचा देश खरंतर तेवढाच आहे.
कर्नाटकाच्या निकालांचं सर्वस्तरीय विश्लेषण आतापर्यंत झालं आहे. मात्र, त्यात गोदी मीडियाने पंतप्रधानांचं ढळढळीत अपयश हा मुद्दा पुढे आणलेला नाही. किंबहुना काँग्रेसच्या विजयाचं श्रेय राहुल गांधी किंवा त्यांच्या कर्नाटकातील सहकार्यांना देण्याच्या ऐवजी निवडणूक प्रचाराची आखणी करणार्या रणनीतीकाराला देण्याचा विनोदी प्रकारही करून झाला. मग केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये आणि वर्तमानपत्रांच्या जाहिरातींमध्ये मोदींच्या जागी प्रशांत किशोर यांचा फोटो असला पाहिजे ना? भाजपच्या २०१४च्या विजयाचे शिल्पकार ते नव्हते का या न्यायाने?
कर्नाटकाचे निवडणूक निकाल गोदी मीडियाने विलक्षण मनोरंजक बनवून टाकले. ज्या वेळी काँग्रेसने १३६ जागांवर निर्णायक आघाडी घेतली होती, तेव्हा ही तथाकथित ‘राष्ट्रीय’ माध्यमे काँग्रेसची आघाडी ११५-१२० जागांच्या घरात दाखवत होती. कोणी दोन हिंदीभाषी कन्यका टपाली मतदानाच्या आकड्यांवरून चेकाळून भाजपला विजयी घोषित करून मोकळ्या होण्याच्या बेताला होत्या. टाइम्स नाऊसारख्या चॅनेलने तर कर्नाटकाचे निकाल दाखवणं बंद करून उत्तर प्रदेश महापालिकेचे निकाल दाखवायला सुरुवात केली, कारण तिथे भाजपचा विजय होत होता. भाजप ग्रामपंचायत जिंकत असेल तरी मोदींचा फोटो आणि ती हरत असली की नड्डा किंवा इतर कोणाचा फोटो, अशी यांची मांडणी कायमच असते. इतका लाचार आणि बुद्धिगहाण चौथा स्तंभ या देशाने कधीच, अगदी मोदींना जिची मधून मधून उबळ येते त्या आणीबाणीतही, पाहिला नव्हता.
मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत आणि ते एकटेच स्टार प्रचारक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते निवडणुका जिंकून देतात, हेही अर्धसत्य आहे. बहुतेक वेळा सुबुद्ध मतदार राज्यात प्रादेशिक पक्ष आणि केंद्रात राष्ट्रीय पक्ष असं मतदान करतात. तिथे मोदींचा प्रभाव पडतो. पण, राज्य पातळीवरच्या निवडणुका भाजपला एकहाती जिंकून देणारा करिश्मा मोदींकडेही नाही, हे एव्हाना लागोपाठच्या पराभवांतून स्पष्ट झालेलं आहे. त्यांच्या संमोहनात गुजरात आणि उत्तर प्रदेश हीच दोन राज्ये आहेत. त्यातल्या गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपच्या तोंडाला मोदीकाळातच एकदा फेस आणला होता. उत्तर प्रदेशातल्या विजयांचं श्रेय मोदींचं किती आणि योगींचं किती याबद्दल मतभेद संभवतात. कर्नाटकात तरी मोदींनी सभा घेतलेल्या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येण्याचं प्रमाण कमी आहे. राज्यातलं नेतृत्त्व कमकुवत ठेवायचं, सगळ्यांचे पंख कापायचे, सगळीकडे माझीच सत्ता चालणार, मीच मोठा, असा आव आणायचा, हे काँग्रेसच्या एकेकाळच्या पतनाला कारणीभूत ठरलेले दुर्गुण भाजपने फारच वेगाने आत्मसात केले आहेत. त्याचाच फटका कर्नाटकात बसला.
गोदी मीडियाने दडवून ठेवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे कर्नाटकातली काँग्रेसची लाट. कर्नाटकात जनता दल सेक्युलर हा तिसरा पक्ष मैदानात होता आणि तिरंगी लढतींमध्ये या दोघांना एकत्रित मात देऊन काँग्रेसने ऑपरेशन लोटसची शक्यताच मावळवून टाकणारा मोठा विजय मिळवला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्नाटकातले मतदार केंद्रात वेगळं मतदान करतात, हे गृहित धरलं तरी आज कर्नाटकातून काँग्रेसचा एकच खासदार आहे, त्याचे शून्य तर होणार नाहीत. एकाचे दोन झाले तरी भाजपचे नुकसान आहे, काँग्रेसचे बळ वाढणार आहे आणि किमान १८ जागांवर काँग्रेसला लोकसभेतही यश मिळेल अशी आजची परिस्थिती आहे. देशभरात भाजपविरोधकांचा प्रयत्न एकास एक लढत व्हावी, असा आहे. त्यात एमआयएम वगैरे भाजपच्या बी टीम मतविभागणीचा खोडा घालतीलच. पण लोकांनी निर्धार केला असेल, तर तिहेरी लढतींमध्येही भाजपचा पराभव होऊ शकतो, हा विश्वास कर्नाटकाने दिला आहे.
देशाला काँग्रेसमुक्त करण्याची आसुरी घोषणा देत शड्डू ठोकत फिरणार्या सत्तामदांध भाजपच्या टाळक्यात बजरंगबलींनी गदा हाणून संपूर्ण दक्षिण भारत भाजपमुक्त करून दाखवला आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवरून लक्ष उडवायला केरळ स्टोरी, हिजाब, आरक्षण वगैरे मुस्लिमद्वेषी फंडे सतत चालत नाहीत, हेही या निवडणुकीने स्पष्ट केले आहेच. कधीतरी उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील जनताही याच निर्णयावर आल्याशिवाय राहणार नाही.
तेव्हा, झोला तयार ठेवा.