(गावातलं मंदिर, जुन्या नक्षीदार कलाकुसरीवर सिमेंट थापून गुळगुळीत केलेल्या भिंती, नागड्या मूर्तीला भारंभार अडकवलेले कपडे, समोरील बळी चढवण्याच्या दगडाला हटवून गणपती स्थापलेला, बाजूला कधीकाळचं श्रद्धेचं, आस्थेचं ठिकाण असलेलं पण आता भग्नावस्थेत असलेलं पीराचं स्थान. सभामंडपात कुणी भगव्या कपड्यात बसलेला जटाधारी बुवा. तिथे गावकरी जमतात. आरोपी मौलिक घायाळ याला आणलं जातं, सरपंच लुखारावजीसाहेब आणि इतर मान्यवर, बुवा जवळ बसतात, न्यायनिवाडा सुरू होतो.)
समाधान : तर इथे जमलेल्या समस्त गावकर्यांना सांगू इच्छितो की आपलं श्रद्धास्थान असलेल्या श्री श्वानेश्वरास ह्या मौलिकने दगडाने मारण्याचं निंदनीय कृत्य केलं आहे.
मौलिक : अहो, मी माझ्या अंगावर धावून आलेल्या एका कुत्र्याला हाकलण्यासाठी फक्त दोनेक दगड मारलेले हो! कुठल्याही ईश्वराला मी धक्का लावलेला नाहीय.
समाधान : मूर्खा, आम्ही त्याच श्वानेश्वराबद्दल बोलतोय. आमच्या लेखी ते दत्ताचे एक गुरू, मानवजातीचे पिता आहेत. आमच्या गावात त्यांचा एकेरी उल्लेख हा अवमान समजला जातो. तू आमच्या गावात येऊन हे धाडस केलंच कसं?
मौलिक : अहो, पण एकही दगड कुत्र्याला लागला नाही हो! आणि माझा उद्देश फक्त माझा स्वत:चा जीव वाचवण्याचा होता.
पंच बुवा : याने श्री श्वानेश्वरास दगड मारले हे कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे का?
(त्यावेळी कुणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने मौलिक क्षणभर आनंदतो, पण बुवाच्या आवाहनावर पुढल्याच क्षणी पूर्ण गाव हात वर करतो.)
पंच बुवा : महत्त्वपूर्ण साक्ष दिल्याबद्दल गावकर्यांचे आभार. तर श्री श्वानेश्वरास ह्या तरुणाने दगड मारल्याबद्दल याने श्री श्वानेश्वराची जाहीर माफी मागावी आणि आपल्या गावातल्या दत्ताच्या प्रस्तावित मंदिरासाठी एक लाख रुपये रोख जमा करावेत, हीच याची शिक्षा!
मौलिक : (समाधानचं बखोट धरून बाजूला घेतो.) का हो, काय बकवास गाव आहे तुमचं?
समाधान : ओ, गावाला काही बोलू नका. पंचक्रोशीत नाव आहे आमच्या गावाचं! आदर्श गाव आहे आमचं!
मौलिक : कशावरून? असल्या फडतूस गोष्टीवरून दंड करणारं गाव आदर्श?
समाधान : हे बघा, ते मधले गावचे सरपंच लुखारावजी साहेब, समोरील ग्रामस्थ मंडळी अर्थात ग्रामसभा, सरपंचांच्या शेजारी बसलेले पत्रकार लाळघोटे नि पंच बुवा ह्या चार मजबूत स्तंभावर आमच्या गावात लोकशाही टिकून आहे. म्हणून आमचं गाव आदर्श आहे!
मौलिक : हा भपकेबाज माणूस जो केव्हाचा आपण फार मोठे विद्वान असल्याचा आव आणून इंग्रजी पेप्रातल्या बायांचे फोटो न्याहाळतोय, हा सरपंच?
समाधान : काही काय आरोप करताय? ते फार चांगले गृहस्थ आहेत…
मौलिक : त्या माणसाने इथं बसल्या बसल्या दानपेटीतील काही ठोकळे खिशात टाकले तो माणूस चांगला? आणि हे सगळं बघून देखील गप्प बसलेली ही ग्रामस्थ मंडळी अर्थात ग्रामसभाही चांगली? कमाल आहे.
समाधान : एक निर्णय विरोधात दिला म्हणून तुम्ही आरोप करताय?
मौलिक : नाही हो! तो बघा तुमचा एक खांब लाळघोटे! सरपंचांच्या हातून सांडलेला चहा बॅगेतील कागदाने पुसतोय. त्यावर तो मघा बातमी लिहीत होता ना?
समाधान : शेवट स्वच्छता महत्त्वाचीच आहे की नाही!
मौलिक : आणि हा गोसावड्या बुवा तुमचा पंच कम न्यायाधीश?
समाधान : निष्पक्ष! नि स्वतंत्र बाण्याचे न्यायाधीश आहेत हे…
मौलिक : हां विनाकण्याचे! यांनीच काही वादग्रस्त निकाल दिलेले ना?
समाधान : ऐतिहासिक निर्णय बहुतेकदा वादग्रस्तच असतात की!
मौलिक : हो, हो! काय त्या एक मुलीने छेडछाड होतेय म्हणून यांना फोन केलेला, तर यांनी सांगितलं की काय व्हायचं ते होऊ दे! तू थांब! मला झोप येतेय, आपण यावर लवकरच ग्रामसभेत निर्णय घेऊ. चारित्र्यहननाच्या भीतीने त्या बिचार्या मुलीने विहिरीत उडी घेतलेली. वर हे बुवा फुशारक्या झोडतायत, ती मुलगी तो अविचार न करता थोडी थांबली असती तर तिचे रक्षण आम्ही केले असते, कधी? रात्रभर त्या वखवखलेल्या टवाळखोरांच्या तावडीत ती सुरक्षित राहिली असती?
समाधान : पण त्यांनी त्या टवाळखोरांना कडक शब्दांत खडसावलं की!
मौलिक : हो, आणि तिला शोधण्याची तसेच जपण्याची जबाबदारी त्यांनाच दिलेली की!
समाधान : हीच तर आमची आदर्श लोकशाही आहे की!
मौलिक : कोणती? कसायाच्या हाती गाय देणारी? की विहिरीत उडी घेतलेली?
समाधान : बाकी आडनावाप्रमाणे घायाळ करणारे प्रश्न विचारता तुम्ही?
मौलिक : माझं नाव विसरू नका… ते मौलिक असं आहे… तेही विसरू नका. कारण, माझे प्रश्नही मौलिक आहेत… त्यांच्यावर किमान विचार तरी करा… नुसतेच घायाळ होऊ नका.