भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले उमेदवार पीयूष गोयल यांना प्रचारासाठी कोळीवाड्यात जाण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी तिथली दुर्गंधी सहन न होऊन नाकाला रूमाल लावला म्हणे! आमच्या रोजीरोटीच्या व्यवसायाबद्दल तुमची हीच भावना असेल, तर आमची मते तरी कशाला मागायला येता, अशी संतप्त भावना कोळी बांधवांनी हे पाहून व्यक्त केली.
जो माणूस मांसमच्छी खात नाही, त्याला त्याचा वास सहन होत नाही, हे मांसमच्छी खाणारा माणूसही मान्य करेल. सुक्या मासळीचा, वशाटाचा वास तर बाकीचा मांसाहार करणार्या मांसाहारी माणसांनाही काही वेळा सहन होत नाही. ते नैसर्गिक आहे. परंतु, हे गोयल, त्यांचा पक्ष, त्यांचे बांधव यांच्या या वर्तनाला घृणेचा, तिरस्काराचा, मराठीद्वेषाचा वास आहे. तो सडलेल्या मासळीपेक्षा खराब आहे. गोयलांपासून मिरा भाईंदरच्या गीता जैनांपर्यंत या पक्षाच्या अनेक पुढार्यांनी वेळोवेळी ही दुर्गंधी पसरवली आहे.
पण, त्यात काही आश्चर्य नाही. इकडे हे नाकाला रुमाल लावत होते, तेव्हा तिकडे त्यांचे परमोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या घशात तेजस्वी यादव यांनी खाल्लेल्या माशाचे काटे अडकले होते. तेजस्वी यादव यांनी मासा खाल्ला होता ८ एप्रिलला (देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या धुमाळीत पंतप्रधानांच्या प्रचाराचा मुद्दा कुणीतरी खाल्लेले मासे हा आहे, हे देशाचं दुर्दैव). त्याचा फोटो त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी समाजमाध्यमांवर टाकताच मोदींनी सनातनी हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून कांगावे सुरू केले. मग राहुल गांधींनी गेल्या वर्षी श्रावणात मटणाचे फोटो टाकले होते, त्याची आठवण करून दिली गेली. हे लोक मुद्दाम आमच्या भावना दुखावायला असं करतात, म्हणून देशाचे सर्वोच्च नेते छप्पन्न इंची छाती पिटून घेत आहेत.
कोण आहात तुम्ही? कोणाचे नेते आहात? हे कोणते हिंदू आहेत ज्यांचे तुम्ही प्रतिनिधी आहात?
या देशात आजही ७५ ते ८० टक्के हिंदू मांसाहारी आहेत. जे मांसाहारी आहेत त्यांच्यातले काही आठवड्यातून काही वारांना मांसाहार करत नाहीत, महाराष्ट्रात अनेक मांसाहारी लोक श्रावणात आणि अलीकडे माघ महिन्यातही मांसाहार करत नाहीत. पण त्याचवेळी अनेक सश्रद्ध हिंदू या काळात मांसाहार करतात. जो जे वांछील तो ते खावो, हा या देशाचा मुख्य धर्म आहे. केरळमधले हिंदू सर्व प्रकारचं मांस खातात, बंगालमधल्या हिंदूंचं पान मत्स्याहाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तिथल्या कालीमातेपासून इकडच्या ग्रामदैवतांपर्यंत अनेक देवतांना मांसाहारी नैवेद्य दाखवले जातात. आम्ही खातो तेच अन्न आमचे देव खातात, असा हा देव आणि भक्त यांच्यातला सुरेख भावबंध आहे. ज्या काश्मिरी हिंदूंच्या, पंडितांच्या नावाने मोदी आणि त्यांचा पक्ष मतलबी कंठशोष करत असतो, त्यांचा वाझवानही मांसाहारी पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही.
हे सगळे हिंदूच आहेत. अस्सल हिंदू. ज्या पुराणग्रंथांमध्ये देवादिकांच्या सुरापानाचे, मांसाहाराचे उल्लेख आहेत, त्यांचे वारसदार असलेले हिंदू.
या देशातल्या हिंदू संस्कृतीचा खरा मोठेपणा हा आहे की इथे प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत, तसे रावणाचेही भक्त आहेत, दोन्ही हिंदूच आहेत. हे सर्वसमावेशक वैविध्य किती काळ नाकारणार आहेत मोदी आणि त्यांचं भजनी मंडळ? देशातल्या ८० टक्के हिंदूंच्या खानपानाला नावं ठेवण्याची हिंमत मोदी कोणत्या अल्पसंख्यकांच्या अनुनयासाठी करत आहेत? भाजप कोणत्या शाकाहाराग्रही अल्पसंख्यकांचं लांगूलचालन करतो आहे?
मुळात कोणाच्याही ताटाकडे नजर रोखून पाहणं आणि एखाद्याच्या खानपानावरून त्याच्याबद्दल मतं बनवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे सभ्य समाजात. मोदी आणि त्यांची पार्टी (यांच्यापेक्षा तमाशा पार्टी अधिक दर्जेदार मनोरंजन करते) हे देशात त्यांनीच घालून ठेवलेल्या गोंधळाबद्दल चकार शब्द काढत नाहीत, महागाई, बेरोजगारी यांच्याबद्दल बोलत नाहीत. मणिपूरबद्दल बोलत नाहीत, चीनबद्दल चकार शब्द काढण्याची हिंमत नाही; येऊन जाऊन याने मासा खाल्ला हो, त्याने मटण खाल्लं हो- अरे हो हो, तुम्ही खा ना तुमचा ढोकळा आणि फाफडा! कुणी हे पदार्थ खातो म्हणून दुसरा नाकाला रुमाल लावून चालतो का?
मोदी हे भाबडेपणाने करत असते तरी त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. पण, तुम्ही देशात गोमांसावर बंदी घालणार आणि शाकाहाराचं स्तोम माजवणार्यांच्या मालकीच्या गोमांसनिर्यातीच्या व्यवसायाला उठाव येणार, त्यातून तुम्हाला रोख्यांच्या माध्यमातून कमाई होणार, हे चालतं? मांसाहाराने ढवळून येतं, मांसनिर्यातीतून येणारा पैसा खाल्ला तर चालतो? निवडणूक रोख्यांच्या नावाखाली खंडणी तिन्ही त्रिकाळ ओरपली तरी कुणाच्या भावना दुखावत नाहीत. इतका निर्ढावलेपणा येतो कशाच्या बळावर?
आपण मांसाहार करतो म्हणजे जीवहत्या करतो (जणू शाकाहारात जीवहत्या होतच नाही), अशी पापभावना गेल्या काही वर्षांत पद्धतशीरपणे बहुजन हिंदूंच्या मनात भरण्याचा प्रयत्न चहूबाजूंनी सुरू आहे, त्यातून हा आहारश्रेष्ठत्वाचा निराधार अहंकार या अल्पसंख्यकांच्या मनात निर्माण होतो. खानपानवैविध्याने समृद्ध असलेल्या आपल्या बहुसांस्कृतिक देशाला खतरा नेमका कोणापासून आहे, ते आता तरी ओळखा आणि नाकाला रूमाल लावणार्यांच्या नाकाला कांदे लावण्याची वेळ आणा.