येडगाव हे केवळ हजार बाराशे वस्तीचं गाव. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरचं. त्यामुळे मातीपासून मतीपर्यंत सगळं मिसळलेलं. सोयरिकी पण तशाच. त्यामुळे भाषा पण सरमिसळ. तर ह्या गावातलं एक तालेवार कुटुंब. येडगवे कुटुंब. येडगाववर पिढ्यान पिढ्या ह्याच कुटुंबाची सत्ता आहे. येडगवे बोले आणि गाव चाले अशीच प्रथा. आजवर गावची ग्राम पंचायतही येडगवे खानदानाच्या ताब्यात बिनविरोध होती. पण यावेळी मात्र गावात दोन गट पडले. आणि तेही येडगावकर कुटुंबातच. आज्या येडगवे आता थकला. म्हातारा झाला. अंथरुणाला खिळला. त्याचं नेमकं वय किती हे सांगणारा गावात आता कुणीच उरला नाही. त्याला स्वतःलाही त्याचं वय सांगता येत नाही. तो सांगतो ‘एकदा वादळ झालं व्हतं बगा आनी त्यात विठू शिंद्याची म्हातारी उडून सागाच्या झाडावं लटाकली व्हती तवाचा माझा जल्म’. आजवर आज्या बोलेल तेच गावात होत आलंय. त्याची प्रचंड दहशत होती. शरीराने पाप्याचं पितळ. पण डेरिंग जाम.. पण वयोमानाने डोळे गेले, पण अजूनही बंदुकीने अचूक नेम साधतो. दिवसाचं दिसत नाही पण रात्री नजर फुटते आज्याला. नाक कुत्र्यावानी आहे ह्याचं. वासावरून सगळं ओळखतो. ऐकू कमी येऊ लागलं, म्हणजे ह्याच्या कानांना जवळचा नंबर आहे लांबचा नाही. लांबचं सपष्ट ऐकू येतं. स्मृतीभ्रंश झाला.. तरी वाणी अजून तशीच शिवराळ. त्याच्या तोंडून उच्चारल्या गेलेल्या शिव्या ह्या त्याच्या खास असतात. आज्याचा शिव्या ऐकल्याशिवाय गावकर्यांचा दिवस सुरु होत नाही. आज्यानं शिवी दिली नाही तर आज्या कोपला असं मानतात सगळे. आज्याचा, दगडी मूर्तीला कौल लावतात तसाच कौल लावूनच सगळी कारूकं होतात. आज्या ज्याच्या कानफटात मारेल त्याला कौल मिळाला असं मानलं जातं. पण आता मात्र आज्याच्या घरातच राडा झाला.
त्याचं झालं असं.. आज्याच्या दोन बायका. म्हणजे त्याला मजबुरीमुळे दुसरं लग्नं करावं लागलं. पहिल्या बायकोला एक पोरगी झाली आणि नंतर काही तिची कूस धरंना. घराण्याला वारस हवा. राजपुत्र हवाच. नाना उपाय करून झाले. श्यामू भटाने नियोग करून घ्या असाही सल्ला दिला. आज्याने कोयत्याने त्याचा एक कुल्ला कापला. आता श्यामू भट एका कुल्ल्याने जगतोय. तर आज्याला दुसरं लगीन करण्यावाचून पर्याय उरला नाही. वयाच्या साठीनंतर. म्हणजे हे अंदाजे वय हो, कारण त्याची ढोपरं नुकतीच बैल गाडीच्या कण्यावानी कुरकुराय लागली होती म्हणून साठ मानू.. तर त्याने साठीला कोकणातल्या एका गरजू गरीब मुलीला साथीला आणलं आणि चीमित्कारच झाला की हो.. कर्मधर्मसंयोगाने आज्याच्या दोन्ही भार्या एकाच वेळी गर्भवती की हो जाहल्या. आणि दोघींना एकाच दिवशी एकाच वेळी पुत्ररत्ने की हो प्राप्त जाहली. बंधू आणि चंदू. दुसरीच्या पायगुणाने पहिलीला पण पुत्र झाला म्हणून आज्याचा दुसरीवर जास्तच जीव जडला. दोन्ही बाळं जुळी असल्यागत वाढू लागली. एकाच ताटात जेवू लागली. एकाच खेळण्याशी खेळू लागली. दोघांचा एकाच मुलीवर जीव जडला. दोघात एकच बायको करूया असा दोघांचा ठराव पण झाला. पण ही बातमी आज्याला आणि तिच्या बापाला कळली आणि एका रात्रीत तिचं लगीन लावून लांबच्या गावात पाठवलं गेलं. प्रेमभंगाच्या नशेत दोघांनी बाप म्हणेल त्या मुलींशी लग्न केलं. पुन्हा एक घाटी आणि दुसरी कोकणी सून घरात आली. दोन्ही भावांनी मिरगाच्या पहिल्या पावसातच पेरणी केली. आणि वर्षभरात पुन्हा दोन नातू एकाच दिवशी एकाच वेळी अवतरले. घर गोकुळ झालं. आज्याचे दिवस नातवांशी खेळण्यात मजेत जाऊ लागले.
पण हे सुख कुणाच्या तरी डोळ्यात खुपलं. आज्याच्या दोन बायकांचं एकमेकींशी झोम्बाड जुपलं आणि त्याचं कारण ठरली ग्रामपंचायतीची निवडणूक. आज्याच्या दोन पोरानीच एकमेकांविरुद्ध बंड केलं. आज्याला फाट्यावर मारून ते ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण लोच्या तेव्हा सुरु झाला जेव्हा धाकट्याची कोकणी बायको लग्न करून घरात आली. तिने तिच्या नवर्याच्या, चंदूच्या मनात बंडाची बीजं पेरली आणि वाढवली. चंदूवर आज्याचा जास्त जीव. त्यामुळे त्याच्या बीजाला अजून खतपाणी मिळालं.
ग्रामपंचायत निवडणुकीचा हा वार्ड नेमका महिलांसाठी राखीव झाला आणि चंदूच्या बायकोने अर्ज भरला.. त्यामुळे इच्छा आणि कुवत नसताना पण थोरल्या बंधूने त्याच्या बायकोला तिच्याविरुद्ध उभं केलं. त्यात गावात अजून एकाने आपलं पॅनेल उभं केलं. तो पप्पू पिसाळ रिक्षावाला. त्याला येडगवे कुटुंबाच्या पारंपरिक सत्तेला सुरुंग लावायचा आहे. पण खरं कारण वेगळेच आहे. त्याचं आज्याच्या थोरल्या मुलीशी अफेयर होतं. पण येडगवेनी त्याला विरोध केला. बहीण लग्न करून सासरी गेली. पप्पू बिनलग्नाचा राहिला. त्याचा सूड म्हणून आता हा उभा राहिला. गावातले अनेक तरुण त्याच्यासोबत जाऊ लागले. सत्ता आपल्या कुटुंबातच राहावी म्हणून आज्यानेच आपल्याच घरात बंद खोलीत बंडखोरीचा सल्ला दिला असावा असा संशय अनेकांना आला. पण ह्यामागे अजून एका स्त्रीचा हात आहे. ती म्हणजे आज्याची पहिली आडदांड बायको भीमा. तिचं आणि तिच्या सख्या सुनेचं छत्तीस. म्हणून तिनेच धाकटीला आतून प्रेरणा दिली. दोघी जावा जावा आणि भाऊ भाऊ मात्र एकमेकांविरुद्ध त्वेषाने लढले. आणि शेवटी ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि बंधू चंदू पॅनेलचे दहा दहा आणि पपू पिसाळच्या पॅनेलचा एकटाच पपू निवडून आला. त्याला पण सरपंचपदाची स्वप्नं पडू लागली. पण ऐनवेळी सरपंचपद महिलांसाठी राखीव जाहीर झालं आणि पप्पूचा पोपट झाला. पण पपूचा भाव वधारला. कारण आता गावचा सरपंच त्याच्या एकट्याच्या मतावर ठरणार होता. त्याला पटवण्याचे दोन्ही बाजूने सगळे प्रयत्न झाले. अगदी त्याच्या आधीच्या प्रेयसीची, म्हणजेच बंधू चंदूच्या बहिणीची पण मदत घेतली गेली. तिला पप्पूच्या प्रेमाला जागरूक करून त्याला फितवायचा प्रयत्न झाला. पण तो बधत नाही म्हणून शेवटी त्याला मतदानाच्या वेळी किडनॅप करायचा प्लान दोन्ही गटांनी केला. आणि त्यात अनेक गोंधळ उडाले. पप्पू समजून रात्रीच्या अंधारात आपल्याच गटातला उमेदवार किडनॅप केला गेला. मतदानाच्या वेळेला पप्पू अचानक प्रगट झाला आणि कळलं की पण ज्याला किडनॅप केलं तो पप्पू नव्हता. आपलाच माणूस होता. त्याला जिथे बांधून ठेवलाय तिथून आणायला गेले, तर दुसर्या गटाने आधीच त्याला उचललेलं होतं. तो उमेदवार शेवटपर्यंत काही सापडला नाही.
शेवटी मतदान पार पडलं आणि दुर्दैवाने दोन्ही बायकांना समान मतं मिळाली. म्हणजे पप्पूने कुणातरी एकीला मत दिलंय पण कुणाला हे कळलं नाही. पण आता सरपंच कोण होणार? अर्धा अर्धा कार्यकाळ वाटून घ्यावा असा एक पर्याय निघाला. पण आधी कोण ह्यावरून तो बाद झाला. नंतर जिच्या नावाच्या चिट्ठीवर माशी बसेल ती सरपंच असं ठरलं. पण माशी कुठल्याच चिट्ठीवर बसली नाही. जवळ येऊन अनेक माशा घोंगावून गेल्या पण त्यांनी कुठल्याच चिठ्ठीला स्पर्श काही केला नाही. आता एकच पर्याय उरला तो ईश्वर चिठ्ठीचा. एक लहान मूल जी चिठ्ठी उचलेल तो सरपंच.
एक मूल ठरलं ते बंधूचा मुलगा चिंट्या. पण त्याला चंदूच्या गटाने विरोध केला. तसं कारण काहीच नाही. फक्त हे मूल आपल्या विरोधी मतदाराचं आहे हा संशय. मग चंदूने आपल्या लेकाला आणलं. पहिल्या गटाचा त्याला विरोध. एकच राडा. शेवटी ईश्वर चिट्ठी कुठल्या मुलाने उचलावी ह्यासाठी निवडणूक घ्यावी असा निर्णय झाला आणि गावात त्या दोन मुलांसाठी प्रचार सुरु झाला. त्या बिचार्या निष्पाप अज्ञानी मुलांच्या मिरवणुका निघाल्या. प्रचारसभा सुरु झाल्या. त्यांना भाषण लिहून पाठ करून बोलवली गेली. फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं. त्या मुलांचे गुणदोष काढले गेले. स्थानिक ग्रामीण
चॅनेलवर चर्चासत्रे सुरु झाली. त्यात आरोप प्रत्यारोप होऊन मामला घरगुती लफडी कुलंगडी बाहेर काढून हाणामारीपर्यंत गेला.
आता ती पोरं पण तयार झाली. एकमेकांविरुद्ध आरोप करू लागली. त्या त्या पोरांचे मित्रमैत्रिणीचे गट पडले. त्यातून त्यांच्यात राडे सुरु झाले. त्यांचे आईबाप, नातेवाईक पण ह्यात सामील झाले. त्यांच्या त्यांच्या वर्गाचे शिक्षक पण आपल्या आपल्या विद्यार्थ्याची बाजू घेऊन लढू लागले. गावात एकच कल्ला झाला.
शेवटी मतदान पार पडलं. आता उत्सुकता लागली निकालाची. मतमोजणी सुरु झाली. हे सगळं प्रकरण वरपर्यंत गेलं. मीडिया पण ही मजा कव्हर करू लागला. येडगावची निवडणूक राज्यभर फेमस होऊ लागली. आघाडी पिछाडीच्या बातम्या येऊ लागल्या. जल्लोष.. निराशेचा गेम सुरु राहिला. एव्हाना मध्यरात्र उलटून गेली. शेवटी निकाल लागला. दोन्ही मुलांना पुन्हा समान मतं पडली. पुन्हा एकच राडा सुरु झाला. फेरमोजणीची मागणी झाली.. आरोप, संशय ह्यातून मारामारी सुरु झाली.. कोण कुणाला आणि का मारतोय हेच कळेना झालं. वैयक्तिक हेवेदावे काढून हात धुवून घेतले गेले.. गावात दंगल उसळली.. आणि त्याचवेळी हे दोन नन्हे उमेदवार आणि त्यांचे छोटे समर्थक एका कोपर्यात थंडीमुळे एकमेकांना बिलगून गाढ झोपी गेलेले दिसले. भावी राजकीय कारकिर्दीची स्वप्नं बघत.