ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी कोरोनाकाळात खास साप्ताहिक ‘मार्मिक’साठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ‘हा असा अगदी आपल्यातला वाटणारा!’ ही अफलातून कविता लिहिली होती… कोरोनाकाळात मुख्यमंत्री टीव्हीवरून, फेसबुक लाइव्हवरून जनतेशी थेट संवाद साधत होते आणि अगदी घरातला कर्ता पुरुष, मोठा भाऊ, वडील माणूस असावेत, अशी भावना त्यांच्याविषयी निर्माण झाली होती. राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा नाहीत, उगाच अमोघ वक्तृत्त्वाचं दर्शन नाही, कृत्रिम नाट्यनिर्मिती नाही, उसासे नाहीत, सरळ साधं, थेट मनाला भिडणारं बोलणं… त्यातून मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच नव्हे तर आपलेही कुटुंबप्रमुख आहेत, अशी भावना महाराष्ट्रवासीयांच्या मनात निर्माण झाली… तीच भावना व्यक्त करणारी ही कविता आणि तिला ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांच्या चित्रांची जोड यामुळे दुधात केशरच मिसळलं होतं. ती कविता प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाली. दिवाळीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी या निवासस्थानी रंगलेल्या काव्यसंध्येत साक्षात मुख्यमंत्री आणि सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही कविता नायगावकरांनी सादर केली आणि मुख्यमंत्र्यांबरोबरच ‘वहिनीं’चीही दिलखुलास दाद मिळवली.