अवचित आलेल्या आणि वर्ष दोन वर्ष ठाण मांडून बसलेल्या कोरोना संकटानं आणि लॉकडाऊनमुळं दामू ज्याम कंटाळा होता. सोन्यासारखी नोकरी सुटली. खर्चापोटी भविष्यासाठी साठवलेली पुंजी बघता बघता संपली. हाताला काम नाही आणि छोटा मोठा व्यवसाय करायला हातात पैसा नाही. दामूपुढं मोठाच प्रश्न पडलेला. मोठा भाऊ कटकट न करता दोन वेळेला पोटाला घालतोय म्हणून ठीक. पण भावालाही त्याचा संसार आहे. बायको मुलांची जबाबदारी आहे. आपण मात्र आयतं खाऊन मस्त फुगलोय. केस, दाढी वाढल्यानं चेहरा भयावह दिसतोय. एखाद्या दरोडेखोरासारखा! दहतवाद्यासारखा! रात्री अंगणात काळोखात उभा असलो तर भावाची मुलं घाबरुन बुवाऽऽ असं ओरडत घरात पळतात. करायचं काय?
विचार करून दामू थकला. एकदा त्याला वाटलं जीव द्यावा. सगळाच प्रश्न मिटेल. पण मग त्याला आठवलं जीव देणारा जातो. मागच्यांना फुकटचा त्रास सोसावा लागतो. शिवाय आपल्यावर पळपुटा, भेकड, भित्रा इत्यादी स्टॅम्प आहेच. त्यापेक्षा नोकरीचं बघावं. ते बेस्ट. आणि दामू हळूहळू नोकरीच्या शोधात फिरू लागला. एकदा फिरता फिरता त्याला गण्या भेटला. गण्या शेजारच्या कॉम्प्लेक्समध्ये गाड्या धुण्याचं काम करायचा. त्यानं गण्याला थांबवलं `गण्या, लेका, फार वाईट दिवस जगतोय रे. भावाला भार झालोय.’ `का रे बाबा, तू तर फॅक्टरीत होतास ना? शिकलेला, टाईमकीपर.’ ‘होतो. लॉकडाऊन, कोरोनामुळं नोकरी गेली. आता नोकरी हवीच. `छोटी मोठी कामं मिळतील, पण ती तुला चालतील का? नाही, मी फालतू काम करणारा म्हणून म्हटलं.’ गण्यानं टोला हाणला. `कसलीही कामं दे. महिन्याकाठी पैसे मिळाले म्हणजे झालं.’ `कामं इमानेइतबारे करायची. लांडी लबाडी नको; कबूल हाय?’ `कसली कामं आहेत पण’ दामू गडबडला.
`मोटारी धुण्याची. तुला आठ गाड्या देतो. एका गाडीचे महिन्याचे बाराशे. साडे नऊ हजार मिळतील. पुढे वाढतील. शिवाय या
कॉलनीत खूप श्रीमंत माणसं राहतात.
फॅक्टरीमालक, फिल्म प्रोड्यूसर, बिल्डर्स, हॉटेलमालक त्यांच्याकडं तुझ्या नोकरीचं बघता येईल. बघ विचार कर काहीतरी मार्ग निघेल.’ `चालेल.’ दामू खूलला. गण्याचे आभार मानत राहिला. `थ्यँक्यू! `उद्या सकाळी सातला इथं ये तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो. तू बोल आणि ठरव.’
दुसर्या दिवसापासून दाम्याची नोकरी सुरू झाली. काम हलकं होतं. न शोभणारं होतं. पण दामू ते मनापासून करीत होता. गाड्या पुसता पुसता दामूला अनेक गोष्टी कळल्या. अनेकांबद्दलची मौल्यवान माहिती कळली. त्यात या कॉलनीत बरेच धनवान लोक राहतात. इथं पैशाचा पूर येतोय. पैसा कुजतोय. काळ्या पैशाचा कधी कधी इथं पाऊसही पडतोय. इन्कमटॅक्सवाल्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. इत्यादी बर्याच गोष्टींनी दामूला जाणवलं. दामूच्या डोक्यात लगेच धाडसी कामाची जुळणी सुरू झाली. ‘दुनिया झुकती है’ बोट थोडसं आडवं उभं करावं लागेल. धाडस करायचंच. संधीचं सोनं करायचं. हा प्रयोग यशस्वी झाला की नशीब फळफळेल. दामूनं मनोमन ठरवलं. त्यानं एक घर निवडलं. पैसेवालं. सावज भित्रं, अब्रुदार. जरा धैर्य दाखवलं तर हातात लाख भर रुपये नक्की येतील असं होतं. मग मनासारखा धंदा करायचा. मग पैसाच पैसा. दामू स्वप्नात रमला. वाहात गेला.
नंतर स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करून दामू एका दुपारी चाचपणी केलेल्या फ्लॅटवर गेला. त्यावेळचा दामू दरोडेखोर, डाकूसारखा भयंकर दिसत होता. क्रूर… सैतान वगैरे वगैरे!!
दामूनं फ्लॅटची बेल वाजवली.
`कोण आपण?’ दरवाजा अर्धवट उघडीत एक बाईनं विचारलंं. `मी कोण? मी अण्णाभाऊंचा फकीरा. मी दामाजीचा नोकर. मी उमाजी नाईक. मी पत्रीसरकार. गरीबांचा मसीहा.’
`आपल्याला काय हवंय?’
`आपणच!’ दामूनं खास ठेवणीतला खर्ज लावला. आणि उगाचच खिशातील पिस्तुल आणि चाकूचं मॅडमना दर्शन घडवलं. `पिस्तूल… चाकू… बापरे. कोण आहात तुम्ही?’ मॅडम घाबरल्या. `शांत… शांत घाबरू नका. हे पिस्तुल खेळण्यातलं आहे. आम्ही ते नाटकात वापरतो. आणि या चाकूची मूठ बसवायची आहे.’
`मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण आपण?’ मॅडमच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह.
`ओळख महत्त्वाची नाहीय. मॅडम, माणूस हीच ओळख समजा. तुमचे मिस्टर इन्कमटॅक्समध्ये आहेत ना?’
`हो. इन्स्पेक्टर म्हणून.’ मॅडम हसत म्हणाल्या, `तुमच्या खिश्यात ते पिस्तुल आणि चाकू कशासाठी? तुम्ही नक्की कोण आहात?’
`पिस्तुल. चाकूचं जाऊ द्या. ते सवंगडी आहेत आमचे. माणूस हीच आमची खरी ओळख. तुमच्या मिस्टरांनी `फोर व्हीलर’ बुक केलीय ना? छान…छान! अशीच प्रगती झाली पाहिजे मराठी माणसाची.
`अय्या हो, गाडी बुक केली कालच अॅडव्हान्स दिला.’ मॅडम आनंदून म्हणाल्या `गाडी बुक केलीत आनंद आहे. शुभेच्छा!! आता आमचा वाटा द्या?’ दामूनं त्याचा केसाळ, काळा ढोम हात पसरला.
`वाटा? कसला वाटा? आणि तुम्हाला हे कसं कळलं,’ `आम्हाला सगळं कळतं. आमचं नेटवर्क खूप पॉवरफुल आहे. या कॉम्प्लेक्समधला कोण फ्लॅट घेतो. कोण फार्महाऊस खरीदतो. कोण सिनेमा, टीव्ही. सिरीयल प्रोड्यूस करतो, सगळं सगळं आम्हाला लगेच कळतं. भायखळ्याच्या बेगडी चाळवाले आहोत आम्ही. भाईची माणसं. चला पटकन लाख रुपये काढा. नायतर… सिद्धा ढगात…!’
`बापरे एक लाख..?’ मॅडम घाबरून मागं सरकल्या.
`एवढी मोठी गाडी घेताय आाfण लाखभर द्यायला कचरताय? काय हे मॅडम?’ दामूच्या बोलण्यावर मॅडम गप्प. विचारमग्न.
`जास्त वाटतात का? चला, पन्नास हजार काढा?’
`तेही खूप होतायत,’ मॅडम निराश झाल्या. `जाऊ दे, त्यापेक्षा आम्ही त्या गाडीचं बुकिंगच कॅन्सल करतो.’
`नको, नको मॅडम, असं करू नका. ही गाडी म्हणजे तुमच्या माडीचा तुरा आहे. तो तसाच डौलानं फडकत राहू द्या. तुमचा आणखी उत्कर्ष होऊ द्या. तुमच्या एकाच्या दहा गाड्या होऊ द्या. मी वाटा आणखी कमी करतो. चला फक्त पंचवीस हजार द्या..’
`जरा थांबा. मी माझ्या सासर्यांना फोन करते.’
`फोन कशाला?’ दाम्याच्या मनात पालीची चुकचुक. छातीत धडधड, `तुमच्या वाट्याबद्दल विचारते.’ सासर्याचं नाव काढताच दाम्याला घाम फुटला. त्याला संशयानं घेरलं. ओढून ताणून आणलेलं बळ हळूहळू खचू लागलं. डोक्यात वेगळंच चक्र भिरभिरू लागलं.
`मॅडम तुमचे सासरे कुठं नोकरीला आहेत?’
`ते सी.आय.डी. ऑफिसर आहेत. आता दहा मिनिटात इथं येतील.’
`बापरेऽऽ, पोलीस इन्स्पेक्टर! त्यांना कशाला उगाच?’ सीआयडी म्हणताच दाम्या टरकला. त्याला नको नको ते आठवलं. काठी लाथाबुक्यांची मारहाण आठवली. काळा, शुष्क, कळकट तुरुंग डोळ्यांपुढं आला. जर्मनच्या ताटलीतील सुकी भाजीभाकरी समोर नाचली. शरीराचे होणारे हाल दिसू लागले. आणि दामू पूर्ण खचला.
`मॅडम, थोडं थांबा. फोन करू नका. मला फक्त पाच हजार रुपये द्या. मी जातो,’ दाम्याचा खर्ज वितळला. हात कापू लागले. `थांबा हो.’ असं म्हणत मॅडम फोनकडं वळताच दामूला रडू कोसळलं. दयनीय चेहरा करीत हात जोडीत, तो मॅडमला विनवू लागला, `मला वाटा नको. पैसे नकोत. मी जातो… जाऊ?’
`थांबा म्हटलं ना?’ आता मॅडमनी आवाज चढवला, `जाताय कुठं? तुम्ही बेगडी चाळवाले ना! सासरे आल्यावर तुमचा वाटा देते तो घ्या आणि जा. नाहीतरी तुमचे भाई रागावतील ना आमच्यावर.’
`मी तुमच्या पाया पडतो. मला माफ करा. मी बेगडी, दगडी चाळवाला नाहीय हो. मी एक सामान्य, बेरोजगार माणूस आहे. पत्राचाळमध्ये राहाणारा. मोठ्या भावाच्या अन्नावर जगणारा. मी माझ्याकडचे पन्नास रुपये तुम्हाला देतो. मला माफ करा. पुन्हा असं काही करणार नाही. मला प्लीज जाऊ द्या.
पन्नास रुपयाची नोट
मॅडमपुढं ठेवीत हात जोडीत उतरलेल्या चेहर्यानं दाम्यानं फ्लॅट सोडला. त्याच संध्याकाळी त्यानं दाढी मिश्या सफाचाट केल्या. डोक्याचा गोटा केला. स्वत:चा सगळा लुकच दाम्यानं बदलला. ओळखू न येण्याइतपत.
दुसर्या दिवशी डोक्यावर क्रिकेट कॅप घालून त्यानं सर्व गाड्या पुसल्या आणि गण्याला न भेटताच तो गुपचुप निघून गेला. तिसर्या दिवशी गाण्यानं त्याला गाठलंच.
`दामू, हाय कुठं तू? तुला आणखी एक गाडी मिळतेय. मजा आहे एकाची. आणखी बाराशे.’
`कुठली?’ दामूची जीभ टाळ्याला चिकटली.
`सी-४२०ची. नवी कोरी गाडी आहे. जास्त त्रास नाही.’ `मला नकोय ती?’ दामू चालू लागला.
`का रे बाबा?’ गण्या दाम्याकडं बघतच राहिला.
`ती माणसं डेंजरस आहेत. सीआयडी इन्स्पेक्टर. माझ्याकडून कधी चूक झाली तर ते मला जेलमध्ये टाकतील. नकोच ती भानगडं.
`अरे दाम्या लेका ते सीआयडी
ऑफिसमध्ये कामाला आहेत खरं पण इन्स्पेक्टर म्हणून नाही, कार ड्रायव्हर म्हणून आहेत.’ `काय सांगतोस? इन्स्पेक्टर नाहीत ते? अरे कर्मा!!’
दामूनं कपाळावर हात मारला. आणि तो गण्याकडं बघतच राहिला. खुळ्यागत!!