दामुअण्णांचा जन्म कर्नाटक प्रांतातील निपाणी गावचा. दामुअण्णा बापूशेठ मालवणकर हे पूर्ण नाव. जन्म ८ मार्च १८९३चा. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा व्यवसाय होता. आपल्या मुलानेही याच कामात अधिक लक्ष घालावे आणि या व्यवसायात उत्तम यश संपादन करावे ही वडिलांची इच्छा. पण बाळ दामुअण्णाचा सगळा कल नाटकाच्या आवडीकडे. घरातून त्यांच्या नाटकवेडाला विरोध, पण दामुअण्णा चोरून नाटकं पाहातच असत.
तरूणपणात नाटकाच्या वेडापायी ते घरातून पळून गेले आणि ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’त सामील झाले. वडिलांना ही खबर लागली. त्यांनी दामुअण्णांचे बखोटे धरून त्यांना नाटक कंपनीमधून घरी आणले आणि कामाला लावले. काही दिवस उलटले. तोच प्रसंग पुन्हा एकवार उभा राहिला. १९१३ साली दामुअण्णा सांगली मुक्कामी ‘चित्ताकर्षक नाटक मंडळी’त सामील झाले. तिथं त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली. नाटकाच्या जाहिराती ढकलगाडीवर घालवून रस्त्यांवरून फिरवून आणायच्या हे त्यांचे काम.
काही काळानंतर त्यांना ‘त्राटिका’ नाटकात शिंप्याची भूमिका देण्यात आली. भूमिका छोटीशीच, पण दामुअण्णांनी त्या भूमिकेवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ते वर्ष होते १९१५. पुढच्याच वर्षी म्हणजे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामुअण्णांनी ‘लोकमान्य नाटक मंडळी’त प्रवेश केला. त्यांना त्या ठिकाणी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशुची भूमिका मिळाली. ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरूवात झाली.
१९१८ साली त्यांनी केशवराव भोसले यांच्या ‘ललित कलादर्श’मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे डाळ शिजली नाही. मग ते गेले दीनानाथ मंगेशकर आणि चिंतामणराव कोल्हटकर यांच्या ‘बलवंत संगीत मंडळी’मध्ये. या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्तखड्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ अशा नाटकांतून भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. १९३३-३४च्या सुमारास ‘बलवंत संगीत मंडळी’ बंद करून त्याचे रूपांतर ‘बलवंत चित्रसंस्थे’त केले. १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. इथेच त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरूवात झाली. पुढील तीन वर्षांत ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले.
१९३८ साली दामुअण्णा कोल्हापुरात आले आणि मा. विनायक यांच्या चित्रपट कंपनीमधून ‘ब्रह्मचारी’ (१९३९), ‘ब्रँडीची बाटली’ (१९३९) नंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सरकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतून त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या. ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर या मराठी, त्याचप्रमाणे ‘सुभद्रा’, ‘बडी माँ’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी खास विनोदी भूमिका केल्या.
‘चूल आणि मूल’, ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्राह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’, ‘देव पावला’ (१९५०) अशा चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका गाजवून त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळवला. उमेदीच्या काळात केवळ दोन आणे रोजंदारीवर काम करणारे दामुअण्णा दोन-दोन हजार रुपये मानधन घेऊन भूमिका करीत असत.
हे सर्व रुपेरी पडद्यावरचं वैभव प्राप्त असूनसुद्धा दामुअण्णांचं नाट्यप्रेम किंचितही कमी झालेलं नव्हतं. ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळच्या भूमिकेसाठी ते त्या काळी रुपये तीनशे पन्नास नाइट घेत असत. दामुअण्णांनी स्वत:ची ‘प्रभाकर नाटक मंडळी’ सुरू केली आणि माधवराव जोशी यांचं ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणलं. चित्रपटसृष्टीतलं काम सांभाळून त्यांनी १९५२पर्यंत नाटक कंपनी चालवली. त्यानंतर मात्र त्यांनी सारं लक्ष चित्रपटसृष्टीवरच केंद्रित केलं.
राम गणेशांचा ‘तिंबूनाना’, चिं. वि. जोशींचा ‘चिंतामणराव’ आणि ना. धों. महानोरांचा ‘दाजी’ हे तीन मानसपुत्र दामुअण्णांनी अजरामर केले. जवळपास ५०-५० मराठी, हिंदी चित्रपटांतून आणि ५०हून अधिक नाटकांतून दामुअण्णांनी अभिनय कारकीर्द गाजवली. १४ मे १९७५ या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
दामुअण्णांची कन्या म्हणजे सौ. भारती हृदयनाथ मंगेशकर. वडिलांकडूनच तिला अभिनयाचा वारसा मिळालेला. अत्यंत सुस्वरूप व्यक्तिमत्व. ‘दामुअण्णांचा डोळा चुकवून भारती जन्माला आली आहे’ हे पु. ल. देशपांडे यांचं वाक्य शब्दश: खरं आहे. या गुणी अभिनेत्रीने विवाहानंतर कलाक्षेत्राकडे संपूर्णपणे पाठ फिरवली आणि हृदयनाथांचा संसार सांभाळला. हा त्यांचा फार मोठा त्याग आहे. वास्तविक त्यांनी दामुअण्णांच्या इतकीच कलाक्षेत्रातील कारकीर्द गाजवली असती, पण हे नाही होऊ शकले. श्री नटेश्वराच्या मनात जे असतं तेच घडतं, पण दामुअण्णा म्हटलं की भारती आणि भारती म्हटलं की दामुअण्णा ही दोन्हीही नावं डोळ्यांसमोर तरळतातच! ऐसे हे बापलेकींचे अनोखे नाते!
इ. स. १९५०. माझे मामा रंगा महाबळ यांच्या लग्नासाठी आम्ही सर्व सातार्याला गेलो होतो. यादव गोपाळ पेठेतील जोशी यांच्या वाड्यात. आमचा जानोरया या मुक्कामाला होता. शेजारीच ‘चित्रा’ टॉकीज. ‘देव पावला’ हा सिनेमा तिथे लागला होता. आईकडून तिकीटाचे पैसे घेऊन मी सिनेमा बघायला गेलो. सिनेमाची सुरूवात भलतीच भारी होती. गांजाकेस मंडळींचा अड्डा जमला आहे आणि ही सर्व तारवटलेली मंडळी लावणी गात आहेत.
ठेच लागेल हळू चाल, हळू चाल, हळू चाल
वाट गडे चढणीची, चाल तुझी हरिणीची ।
तिरीप ही वैशाखाची, तोल जाईल सांभाळ
हळू चाल, हळू चाल, हळू चाल ।
आश्चर्य म्हणजे या सिनेमाचे हिरो-हिरॉईन होते दामुअण्णा मालवणकर आणि सुलोचना. एक गरगर तिरळा डोळा फिरवणारे आणि दुसरी सुंदर सुलोचना. पण एकमेकांवर भाबडं प्रेम करणारी ही जोडी दोघांनीही उत्तम सजवली आहे. साधासरळ, भोळाभाबडा दिगू पाणक्या दामुअण्णांनी अतिशय प्रभावीपणे उभा केला आहे. सुलोचनाबाईंनी व्यसनी काकाच्या दबावाखाली असलेली, सद्गुणी अशी सरू उभी केली आहे. हातमागावर ‘कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम’ हे गीत भावपूर्ण रीतीने गाणारी. हा दिगू पाणक्या भाबडा आहे. त्याला छक्के पंजे काहीही माहीत नाहीत. तारा नायकिणीच्या माडीवर तो घरचा निरोप घेऊन आपल्या मालकाला भेटायला जातो. तेव्हा लावणी सुरू असते, ‘माझ्या संग पंक्तीत बोलू नका’… लावणी संपते. हे भाबडं उठून जेवणासाठी कपडे काढून पानावर बसायला लागतं. तेव्हा तारा त्याची चेष्टा करते. जमलेली मंडळीही त्याची टिंगल करतात.
या दिगूच्या घोड्याचं नाव हणमंता. दिगूचं त्याच्यावर प्रचंड प्रेम. या घोड्यामुळे आपलं दारिद्र्य फिटेल, आपल्याला वैभव मिळेल असं दिगूचं दिवास्वप्न असतं.
देव जाणता, हणमंता रे, मगासारखे होईल सारे,
या राजाची निघेल स्वारी, डोक्यावरती मंदिर भारी
गळ्यात माळा सोळा पदरी, हणमंता माझ्या हणमंता
छत्री चवरी, धरतील कोणी सावलीतुनी आणू पाणी
नकोच तू पण आणू पाणी, तोवर येईल माझी राणी
कुणी म्हणेल वेडी मला कुणी म्हणेल वेडा तुला
या वेडाचे वेड माहिती तुझे तुला अन् माझे मला
हा भाबडा प्रीत-प्रसंग, या दोन महान कलाकारांनी अतिशय सहजपणे रंगवला आहे. ओढ्याकाठी पाण्यात पाय सोडून दोघे बसलेले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवित आहेत. दिगू पाणक्या अगदी मोहरून गेला आहे. तो सरूच्याही अंगावर पाणी उडवतो. आपल्याही अंगावर पाणी उडवतो आणि मनमुराद सुखावतो.
बजरंगाच्या देवळात एक चमत्कार घडतो आणि दिगूच्या अंगात प्रचंड शक्ती येते. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास येतो. त्याच्या अंगात विलक्षण चापल्य येते. आता आपला दांडपट्टा पाजळीत तो थयथयाट करत, तारा नायकिणीच्या माडीवर घुसतो. गावच्या जत्रेतील कुस्तीच्या फडात भल्या दांडग्या पहिलवानाला पाठ टेकायला लावतो. अखेर दिगू पाणक्या आणि सरू यांचा विवाह होतो. ते जोडपं सुखानं संसार करायला लागतं.
कथा, पटकथा, संवाद, गीतरचना ग. दि. माडगुळकर, संगीत पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक राम गबाले. निर्मिती ‘मंगल पिक्चर्स’. वामनराव कुलकर्णी, विष्णुपंत चव्हाण हे निर्माते आणि दामुअण्णा मालवणकर, सुलोचना, कुसुम देशपांडे, शकुंतला जाधव, विष्णुपंत जोग, मधू आपटे आणि उपाध्ये असे हे कलाकार. मला आवडलेला हा खास चित्रपट. ‘देव पावला’.
याहीपेक्षा आधी दामुअण्णांचा ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट मी बघितला होता. ‘ब्रह्मचारी’मध्ये मास्टर विनायक, मीनाक्षी हे नायक-नायिका होते. दामुअण्णा हे त्यातील स्वावलंबन आश्रमाचे आचार्य होते. अत्यंत लुच्चा, स्वावलंबनाच्या नावाखाली स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेणारा असा हा आचार्य. ‘काय हो! या भागात पाऊस किती पडत असेल,’ असे विचारले असता मोठ्या आत्मविश्वासाने, अंगठ्यावर अंगठा ठेवून ‘पडत असेल इतका इतका’ अशी इरसाल थाप ठोकणारा, दुसर्याने लावलेल्या कलमी आंब्याच्या फोडी चवीचवीने खाणारा असा हा महालोभी आचार्य. ‘मीनाक्षीच्या डोळ्यावर दामुअण्णांच्या डोळ्यांनी मात केली’ अशा प्रकारची वृत्तपत्रातील चित्रपट परीक्षणातील शीर्षके. ही मला चांगलीच आठवतात.
दामुअण्णांचा कलाक्षेत्रातील प्रवास हा अतिशय कष्टातून झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर यांच्या ‘बलवंत संगीत मंडळी’त ते प्रथम अतिशय दुय्यम भूमिका करत असत. मास्टर विनायकांच्या नजरेस हे गुणी बाळ पडलं. त्यानंतर ‘सरकारी पाहुणे’, ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ हे चित्रपट त्यांना मिळाले आणि त्यांच्या नावाभोवती वलय निर्माण झालं. आपल्या प्रत्येक चित्रपटात दामुअण्णा पाहिजेतच असा आग्रह निर्माते धरू लागले आणि दामुअण्णांनीही त्यांची इच्छा पुरी केली. तिरळा डोळा हीच केवळ दामुअण्णांच्या अभिनयाची खरी ओळख नव्हती, तर ते ती भूमिका जगणारे, आपल्या सहज सुंदर अभिनयाने, सूक्ष्म निरीक्षणाने ती भूमिका साकारणारे श्रेष्ठ अभिनेते होते. अचूक संवादफेक, बोलका चेहरा, खांदा घुसळून घुसळून हसणे, समोरच्या पात्राच्या अभिनयाला उत्तम प्रतिसाद देणे ही दामुअण्णांच्या अभिनयाची खासियत होती. इंदिराबाई चिटणीस, कुसुम देशपांडे, राजा गोसावी, शरद तळवलकर, धुमाळ यांच्यासमवेत त्यांनी केलेले चित्रपट आठवून पाहा. दामुअण्णांच्या बरोबर या कलाकारांनी केलेले, चित्रपटातील प्रसंग आजही दिलखुलास दाद घेऊन जातात.
दामुअण्णांवर केवळ विनोदी कलाकार हा शिक्का मारणं हा त्यांच्या अभिनयकलेवर केलेला अन्याय आहे. एकच उदाहरण देतो. दिग्दर्शक दिनकर द. पाटलांनी दिग्दर्शित केलेला ‘राम राम पावनं’ हा चित्रपट. चंद्रकांत, रत्नमाला, कुमुद लेले, बाबुराव अथणे, कुसूम देशपांडे आणि दामुअण्णा मालवणकर हे कलाकार होते त्या चित्रपटात. ‘उपाशे सरकार’ ही त्यातली दामुअण्णांची भूमिका खलनायकाचीच होती, पण हा खलनायक नेहमीच्या पठडीतल्या खलनायकासारखा नाही, तर लांड्या-लबाड्या करून, गोड गोड बोलून, खोटंनाटं सांगून दोन राम-लक्ष्मणासारख्या भावंडांत वितुष्ट निर्माण करणारा आहे. व्यसनात आणि बाईबाटलीत त्याने आपली संपत्ती उधळलीच आहे. आता हा ‘उपाशे सरकार’ दुसर्याचं घर भेदायला निघालेला आहे. धाकट्या भावाच्या भोळेपणाचा आणि त्याच्या स्वैर वृत्तीचा आधार घेऊन तो त्याला व्यसनात गुंगवतो. मोठ्या भावापासून त्याला बाजूला करतो आणि आपला स्वार्थ साधतो. अखेर हे सारे बिंग बाहेर फुटते. उपाशे सरकारांना राम राम पावनं म्हणावं लागतं. दामुअण्णांनी वठवलेला हा अजब खलनायक.
दामुअण्णांच्या सहज अभिनयाचा माझ्यावर व आमच्या पिढीवर जबरदस्त पगडा आहे. आज चित्रपटाचे सर्वच तंत्र-मंत्र बदलले आहे. पण दर्जेदार कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट गीतरचना, उत्कृष्ट संगीत आणि सहज उत्तम अभिनय म्हणजे दामुअण्णांचे चित्रपट!