(स्मार्ट व्हिलेजचा स्मार्ट पार. तिथे दोघे मित्र पैलास नि कैलास रात्री शहरातून आल्यावर झोपलेले आहेत. आता सकाळची उन्हं वर चढलीत. ती दोघं अजूनही झोपलेली आहेत. पाराशेजारच्या त्यांच्या बंगलोतून पैलासची आई बकुळामती बकेटभर पंचामृत घेऊन येते. आणि दोघांवर टाकते. पंचामृत पडताच दोघं गडबडून घाईने उठतात.)
पैलास : (अंगावरलं पंचामृतानं भिजलेलं पांघरूण बाजूला करत) मॉम, दरवेळी असं का? आम्ही दमलो होतो ना? थोडावेळ आणखी झोपू दे ना!
बकुळामती : (पंजाबी ड्रेसवरील ओढणी नीट करत) माय डिअर सन, तुला ठाऊक नसेलच! पण आज इथे चित्ताकर्षक रिझल्ट डिलिव्हरी केली जाणार आहे. तुला त्वरेने आवरायला हवं!
पैलास : (रुमालाने तोंड पुसत) काहीतरीच काय मॉम? ह्या प्लेसवर असा कुठला रिझल्ट कोण डिलिव्हर करेल? आणि कश्यासंदर्भात आहे तो रिझल्ट?
बकुळामती : (हातातील बकेट सिंगल युझच्या प्लास्टिकच्या डस्टबिनमध्ये टाकत) बाळ, तुला मी आता इतकंच सांगू शकते, ३३ कंट्री ह्या रिझल्टकडे हार्ट उघडून बघत बसल्यात, हार्टचा नवीन एम्परर आणि त्याच्या दिलखेचक सवंगड्यांचे कारनामे लॉफुल आहेत की अनलॉफुल याचं डिसीजन यातून लागणार आहे. तुझा हा कॉट नि गाद्या आत आण. तोवर मी बदाम पिस्ता घालून तुझ्या न्यूट्रिशनल बिस्कीटचे छान वडे तळते. (बकुळामती आत जाते.)
कैलास : (उठून उभा रहात) तुझी मॉम किती ग्रेसफुली बोलते ना? वॉव! अशी मॉम सगळ्यांना मिळो!
पैलास : (मागील उंचावरील ब्यादश्या नौरंगजेबांच्या मोठ्या नि एकमेवाद्वितीय प्रतिमेच्या बॅनरकडे बोट दाखवत) हे सगळं
पॉसिबल झालं ते आमच्या चहापन्हामुळे, आधी आमच्याही व्हिलेजमध्ये कजाग, ओल्ड फॅशन्ड
मॉम असायच्या, पण आम्ही नौरंगजेबांच्या रिव्हॉल्युशनमध्ये पार्टीसिपेट केलं नि पूर्ण व्हिलेज बदलून गेलं.
कैलास : (आश्चर्याने भारावून जात) काय सांगतो? हे असं खरंच होऊ शकतं? नाही म्हणजे हे पॉसिबल आहे?
पैलास : यार, तुम्ही साऊथ इंडियन प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करतात. काही श्रद्धा वगैरे असते का नाही तुमच्यात? (गादीची घडी घालतो. कॉट फोल्ड करतो.) आता हेच बघ माझ्या स्वतःच्या नावावर काश्मीरमध्ये अॅपलची दहा हेक्टर बाग आहे. लक्षद्वीपमध्ये सी-फेस्ड एक सेव्हन स्टार हॉटेल आहे. माझ्या स्वत:च्या दोन एमेस्मीतून उभारलेल्या इंडस्ट्री आहेत, त्या एआयवर आधारित ऑटोरोबोटिक्सवर वर्क करतायत. तरीही मी नौरंगजेबांच्या मोहमाया त्यागण्याच्या सल्ल्यास अनुसरून तुझ्याबरोबर टोलनाक्यावर भाजके शेंगदाणे विकण्याचा बिझनेस पार्टनरशिपमध्ये करतोय.
कैलास : (अवाकच्या हॅवॉक अवस्थेत पोचत) काय सांगतोस?
(बंगलोतून एक गोंडस डॉगी दुडदुडत येतो नि तोंडाने गादी पकडत फोल्डेड कॉट ओढत आत नेतो. कैलास नवलाने तर पैलास कौतुकाने त्याकडे बघत राहातो.)
पैलास : (डोळ्यांनी कवतुक सोहळा न्याहळत) हे तर काहीच नाही. रोज रात्री हेळॉन मस्के मला व्हिडीओ कॉल करून स्पेस नि तिथे येणारे अनप्रेडिक्टेबल चॅलेंज याबद्दल बोलत असतो. पण आपण त्याला केवळ सजेशन देतो. तेही प्रायव्हेटमध्ये. पब्लिकली मी त्याला कधीच ओळख दाखवत नाही. अगदी कधी खारे शेंगदाणे घ्यायला तो टोलवर आला तरी!
कैलास : (सद्गदित होत) यार, तू इतका ग्रेट असशील हे वाटलंच नव्हतं…
पैलास : (डॉगी पुन्हा दुडदुडत व्हॅक्यूम क्लिनर घेऊन येतो, पैलासकडे देऊन आत जातो. पैलास पार व्हॅक्यूम क्लिनरने साफ करत) अरे आपण कॉमन मॅन! पण विचार कर, तुझ्या-माझ्या सारख्यांना लखपती करायला काय आयडिया काढल्या असतील वाटमारेंनी?
कैलास : (प्रश्नात पडतो.) काय?
पैलास : (वर न बघता) पूर्वी हे बिळ्ळेनियर लोक्सं साध्या व्हिलेजमध्ये वा रस्त्यात अधेमधे थांबत नसत. एवढंच काय? साधी काच खाली करून बघत नसत, आणि आऊटिंगला गेले तर दुसर्या देशांत. अशाने देशातला पैसा परदेशात जाई. त्यावर वाटमारेंनी टोलप्लाझा उभारून उत्तर शोधलं. आता देशांत किमान अशा सतराशे साठ टोलनाक्यांमुळे आपल्यासारख्या उद्योगशील मुलांना चांगले स्पॉट तयार झालेत, तिथं खारे शेंगदाणे, काकड्या, केळं, वगैरे विकण्याचे बिझनेस करून आपण देशाला पाचव्या नंबरची इकॉनॉमी बनवू शकतो. आता देशातले बिळ्ळेनियर असे नाक्यांनाक्यावर थांबून यंग टॅलेंट देखील न्याहाळू लागलेत… म्हणजे बघ.
(तितक्यात हवेत घिरट्या घेत एक वन सीटर फ्लाईंग कार पाराच्या मागे लँड होते. त्यातून बंडवंत उतरतात. त्याबरोबर चार दिशांनी चार एसयूव्ही येतात, सातआठ थ्री-पीस सूटमधले दाढीधारी उतरतात. सोबत आणलेल्या रूद्राक्षांच्या माळा घालून बंडवंतांचं स्वागत करतात. कपाळाला शेंदूर लावत पंचारतीचं ताट ओवाळत बंडवंतांची आरती करतात. बेंबीच्या देठापासून सुचेल त्या नावाने घोषणा देतात. मागाहून आपापसात ठरवून फोटोसेशन करू लागतात. तोच बकुळामती बाहेर येते. पैलास नि कैलास मात्र बंडवंतांकडे टक लावून बघत रहातात.)
बकुळामती : (लक्ष नसलेल्या पैलास नि कैलासच्या मागून) बाळांनो आवरलं का? बंडवंत आले म्हणजे खुर्च्या आणि टेबल लावून घ्यायला हवेत. त्यांना बसायला तातडीने जागा करावी लागेल.
पैलास : (शंकेने) पण कोण आहेत हे बंडवंत? यांना कधी व्हिलेजमध्ये यापूर्वी बघितल्याच आठवत नाही.
बकुळामती : हे होय? हे आहेत, कंवल कौरचे जावई!
पैलास : पण हे इथे का आलेत?
बकुळामती : आज त्यांच्याच मॅटरमध्ये डिसीजन होणार आहे.
पैलास : पण डिसीजन तर कोर्टात होतात, ते फायनल ऑर्डर देतात ना? मग पंच सोडून इथे का?
बकुळामती : ते मॅटर पंचांकडेच डिसीजनसाठी गेलं होतं. पण त्यांनी ते इथे पाठवलंय.
कैलास : (बराच वेळचं मौन तोडत) पण आंटी, मॅटर काय होतं?
बकुळामती : (ग्रामपंचायत शिपायास शीळेने खुर्च्या आणण्यास खुणावत) कंवल कौरनं हा जावई फितवून पळवून आणलेला. त्याने येताना वाडवडिलांची संपत्ती रॉबरी करून आणलेली. त्यात त्याने घरदार, फार्म कब्जेत घेत बायकोला परस्पर कसण्यास दिलं.
पैलास : (प्रश्नात पडत) मॉम पण कंवल कौरची मुलगी कधी व्हिलेजमध्ये फिरताना दिसायची नाही. मग तिने फितवलं कधी?
बकुळामती : (अत्यंत ममत्वभावाने) डिअर सन, ती लेट नाइट बाहेर पडायची, वेष पालटून.
कैलास : (कसल्यातरी उग्र शंकेने) पण आंटी, पंचांनी यावर काही ऑर्डर पास करणं सोडून हे मॅटर इथे का पाठवलंय?
बकुळामती : ऑर्डर तेच पास करणार होते, पण कंवल कौरचे मिस्टर मोटाभाय डोळे वटारून आणि बंदुकीच्या चापवर बोट ठेवून त्यांच्याकडे बघत होते. त्यात ते पंच एकदोन महिन्यांचेच सोबती. हलणार्या मानेनं झटका देत एक मेख ठेवत त्यांनी हे मॅटर डिसीजनसाठी इथे पाठवलेलं…
कैलास : कोणती मेख आंटी?
बकुळामती : त्यांनी सांगितलेलं की ओनरशिप चोरीने बदलवता येत नाही, हे ध्यानी ठेऊन डिसीजन घ्यावं. त्यात जे झालं ते फक्त व्हॅलिड, इनव्हॅलिड इतकं सांगावं.
पैलास : पण इतकं होईपर्यंत बंडवंतांच्या घरच्यांनी त्याला वेळीच घरात घेऊन कानझटकणी करायची ना?
बकुळामती : (कनवाळू होत) बाळ, मोटाभायचे दोन हात आहेत, एक येडी नि दुसरा सीभाय…
कैलास : हे सीभाय म्हणजे?
बकुळामती : छोटा भाय म्हणजे सीभाय, मोठाभाय म्हणजे एम भाय. असले शॉर्टकट आहेत ते! आणि यांची पुर्या गावात दहशत आहे. लहान मुलांपासून ते म्हातार्या व्यक्तीपर्यंत हे कुणालाही छळतात. कुणाचीही प्रॉपर्टी मन मानेल तोवर कब्जेत घेतात. त्यामुळे डरतात लोकं!
(शिपाई काही खुर्च्या आणि टेबल घेऊन तिथे येतो, त्याला गावकरी मदत करतात. अत्यंत वायूवेगाने खुर्च्या सेट करून समोर टेबल ठेऊन शिपाई सुनावणीची तयारी पूर्ण करतात. त्याबरोबर वेळेचा भोंगा होतो. गावकरी पाराजवळ जमतात. त्यात शेंदूर्णेचं कार्टं, मेमसरकर, मैलवाले, गुग्गुळावाले, वायझेन, झोलार आदी जमतात. पुढल्या खुर्च्या अडवत चटकन त्यावर बसतात. पैकी मधोमध बंडावंतांना विशेष उंच खुर्ची ठेवली जाते. बकुळामती आणि वैâलास, पैलास लागलीच पहिल्या रांगेत बसून घेतात. मागोमाग येणारी पब्लिक बसू लागते.)
वायझेन : (बसल्या जागेवरून) हां करा सुरू!
शेंदूर्णे : (पटकन कागद काढत) मी तर सगळं कॉपीपेस्ट मारलंय. मीच वाचू का?
ज्येष्ठ गावकरी : (उठून उभा रहात, पारावरील मंडळींकडे बघत) हे बघा, हा डिसीजन बाळमुंज्याच्या हातून दोनपैकी एक चिठ्ठी निवडत घ्यायचा आहे, एकीवर व्हॅलिड लिहा. दुसरीवर इनव्हॅलिड लिहा.
शेंदूर्णे : (उत्साहाने उठत) हां मग बाळमुंज्या मीच आहे इथं! मीच घेतो की हा निर्णय!
गर्दीतून कुणी : बाळमुंज्या म्हंटलंय. जेणेकरून तटस्थ, निष्पक्ष, न्याय्य पद्धतीने प्रोसेस होण्यासाठी ते गरजेचं आहे. पिंपळपारावरला मुंज्या म्हंटलेलं नाहीय इथं, कुणीही उठून ‘मी, मी’ म्हणायला. (तसा पब्लिकमध्ये हशा पिकतो.)
झोलार : मग डिसीजन घ्यायचा कुणाकडून?
एक गृहस्थ : अरे कुणा बाळमुंज्याला आणा रे इथं!
(कुणीतरी पळत जातं एक मुलाला उचलून आणतं, त्याच्या हातात टमरेल आहे ते बहुतेक परसाकडे निघालेलं असावं, असं चेहरा बोलतोय. कुणीतरी पब्लिकमधून ओरडतं, ‘अरे हा तर कंवलचा मुलगा, बंडवंतांचा साला आहे.’ मुलाला पारावर ठेवलं जातं.)
मुलगा : (काकुळतीला येत टमरेल उंचावत) मला जाऊन येऊ द्या नं एकदा!
गुग्गुळवाले : हां पोरा, चारदोन चिठ्ठ्या लिही, आणि दे डिसीजन. तू जायला मोकळा आणि आम्ही पण! काय?
(सगळ्यांच्या बळजोरीला बळी पडत पोरं चिठ्ठ्या उडवतं.)
मुलगा : (पोटातली कळ दाबत पहिली चिठ्ठी वाचतो.) चोरी व्हॅलिड, प्रॉपर्टी बंडवंतांना. (दुसरी चिठ्ठी उघडत) जे जे झालं ते ते व्हॅलिड. इनव्हॅलिड काहीच नाही! (आणि पुढल्याच क्षणाला टमरेल उंचावत पळून जातो.)
वृद्ध गृहस्थ : (उठून उभा रहात) अरारारारा! जोर्वेकरच्या पोराला जोर काही आवरला नाही वाटतं. इथंच घाण केली की!