अयोध्येत सोमवार दि. २२ जानेवारी रोजी राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, तेव्हा सगळ्या देशात एकच आनंदकल्लोळ होईल. प्रभू श्रीरामचंद्रांना इतके दिवस हक्काचं घर नव्हतं आणि सर्वशक्तिमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते त्यांना मिळवून दिलं, हा प्रचार तेव्हा टिपेला पोहोचला असेल. मोदींनी कोरोनाकाळात टाळ्याथाळ्या वाजवायला लावून आणि दिवे लावायला लावून त्या महासाथीचाही प्रचारकी इव्हेंट बनवून दाखवला होताच; इथे तर देशातल्या ८० टक्के लोकांच्या भावना ज्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्या राम मंदिराचा विषय आहे. अत्यंत भक्तिभावाने या दिवशी श्रीराम पूजन, मिरवणुका, भजन कीर्तन वगैरेंमध्ये तल्लीन होणार्या प्रत्येकाला हे माहिती आहे की यानंतर लगेच निवडणुका जाहीर होतील आणि आम्ही राममंदिर बांधून दाखवलं या मुद्द्यावर मतं मागितली जातील. राममंदिराचा लढा लढला जात होता, तेव्हा कुठेही चित्रातही नसलेले मोदी, नियतीने या टप्प्यावर त्यांना एका सर्वोच्च पदावर बसवलं आहे, याचा फायदा घेऊन त्याचं श्रेय घेण्यात मात्र नेहमीप्रमाणे सगळ्यात पुढे असतील.
प्रतिष्ठापनेचा विधी शास्त्रसंमत नाही, विधी करण्यासाठी अधिकारी व्यक्ती नाहीत, मंदिराचं बांधकामही पूर्ण नाही, असे अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. धार्मिक कार्यक्रम म्हणायचे आणि धर्मशास्त्रांचे पालनच करायचे नाही, याचा अर्थ काय? तो अगदी स्पष्ट आहे, रामाच्या नावाने मतं मागण्याचा हा शुद्ध राजकीय सोहळा आहे आणि त्यातून लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा, त्याहून अधिक मोदींचा प्रचार सुरू आहे. म्हणूनच हा सोहळा देशभर साजरा व्हावा यासाठी एकीकडे सरकारी यंत्रणांना जुंपलं गेलं आहे आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि श्रीरामांच्या नावाने जन्मलेल्या असंख्य संस्था-संघटनांचे लोक घरोघरी जाऊन अक्षता देत आहेत. त्यातून ‘आपले’ कोण आणि परके कोण, यांचा एक सर्व्हेही निवडणुकीआधीच होईल, अशीही योजना असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य हिंदू माणूस भाविक वृत्तीचा आहे. लहानपणापासून रामायण आणि महाभारताच्या गोष्टी वाचून त्याच्यावर सखोल संस्कार झालेले आहेत. त्यात व्हॉट्सअपवर पोसलेल्या, गोदी मीडियाचे न्यूज चॅनेल पाहणार्या आणि मेंदू बंद करून घेतलेल्या अंधभक्तांना ना राम मंदिराच्या लढ्याची माहिती, ना त्यात कोणी काय भूमिका बजावली, ते माहिती! देशभर वणवा पेटवून बाबरीचा ढाँचा पडला तेव्हा मात्र ‘शिवसैनिकांनी बाबरी पाडली’ असा कातडीबचावू शेळपटपणा करणारे आज श्रेय घ्यायला पुढे आहेत. तेव्हा बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे, असे उद्गार काढून खटल्यांना सामोरे जाण्याचं धाडस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलं होतं, याचं स्मरण किमान महाराष्ट्राने तरी ठेवलं पाहिजे.
ज्या शिवसेनेने रथयात्रेला बळ दिलं, महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली, तिला आमंत्रण नाही; ज्या करसेवकांनी जीव गमावला, खटले अंगावर घेतले, त्यांची काही बूज नाही; धार्मिक सोहळा म्हणावा तर धर्माच्या नियमांप्रमाणे ज्यांच्या हस्ते हा सोहळा व्हायला हवा, त्यांना निमंत्रण नाही, त्यांनी सांगितलेल्या शास्त्रार्थाला किंमत नाही; सरकारी सोहळा म्हणावा, तर राष्ट्रप्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निमंत्रण नाही, विरोधी पक्षांचा सन्मान नाही, अशा चमत्कारिक पद्धतीने हा ऐतिहासिक क्षण साजरा होणार आहे. मात्र, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. असाच एकचालकानुवर्ती इव्हेंट नव्या गळक्या संसदेचं उद्घाटन करतानाही केला गेला होताच. मुळात, सरकारने अशा प्रकारच्या धार्मिक अनुष्ठानांमध्ये सहभागी होता कामा नये, हा संकेत २०१४मध्येच पायदळी तुडवला गेला होता. त्यामुळे तो विषय कुणाच्या खिजगणतीतही नाही.
राममंदिराच्या या इव्हेंटची इतकी घाई का आहे? गेल्या १० वर्षांच्या कारभारात जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च करून मोदीनामाचा डंका वाजवला गेला आहे. ठिकठिकाणी मोदीस्तवन करणारे पुढारी दिसतात, माध्यमं दिसतात, समाजमाध्यमांवर सार्वजनिक सोहळ्यांमध्ये काही लोकही दिसतात, पण त्यातली बहुतेक भाऊ (बहीण) गर्दी साम दाम दंड भेदाने गोळा केलेली असते. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमं, न्यायालयं हे सगळे पाठीला कणा असल्यासारखे वागू लागले, सरकारी अधिकारी जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीतून प्रच्छन्न पक्षीय प्रचाराला मनाई करू लागले, सगळीकडे प्रोटोकॉलचा आग्रह धरला गेला, तर ही लार्जर दॅन लाइफ भासणारी पुठ्ठ्याची प्रतिमा कोलमडून पडेल.
एकाच व्यक्तीच्या प्रतिमानिर्मितीसाठी लोकांचा इतका पैसा खर्च केल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळेलच, याची खात्री नाही. म्हणूनच जे पूर्ण करून २०२९च्या निवडणुकीच्या प्रचाराला वापरता आले असते, ते राममंदिर अर्धवट बांधलेले असतानाच त्यात श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा घाट घातला गेला आहे, हे यातले सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
हा ठरवून चेतवत नेलेला इव्हेंटबाज कल्लोळ निमाला की लोक भानावर येतील, त्यांना हे सत्य आणि देशाची सद्य:स्थिती दिसेल आणि जेवढ्या असोशीने, श्रद्धेने, उत्साहाने त्यांनी श्रीरामांची मंदिरात प्रतिष्ठापना केली, तेवढ्याच सुजाणपणे मतदान ते लोकशाहीच्या मंदिरांमध्येही लोकशाहीची पुनर्स्थापना करतील, अशी बुद्धी देणे आता प्रभू श्रीरामांच्याच हातात आहे.