सैनिकांनो जय महाराष्ट्र…
‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’ अशी एक जुनी म्हण आहे, ती नव्याने वाचायची संधी आलीय. राम मंदिरांची धामधूम आहे. राखेत हात घालायला ज्यांची तेव्हा हातभर फाटली, ते आता म्हणे सर्वात पुढे आहेत. असो. रामाचे मंदिर होतेय ही आनंदाची बाब. चारही पिठांचे शंकराचार्य अयोध्याला जात नसल्याचे समजले. काम अधुरे आणि शास्त्राप्रमाणे होत नसल्याचे असे म्हटले जाते. मात्र शेफारलेली दिल्ली ऐकेल ती कसली. मी वाजपेयींना सांगून जो गुजरातमध्ये बसवला तोच माझ्या मुळावर आणि मुलाबाळांवर उठला आहे, नवीनच वाद उठलाय की शिवसेना कुणाची म्हणे… शिवसेना कुणाच्या बापाची हे महाराष्ट्राला वेगळे सांगायची गरज मला वाटत नाही. कमळीने राज्यात कहर मांडला आहे. आमच्या ठाणेदारानंतर शरदबाबूंचा पुतण्याही नादाला लावलाय, सिंचन बिंचनची काही प्रकरणे हाताशी धरून अजित हाताखाली घेतला. काही दिवस त्याला सीएम करण्याच्या वावड्या होत्या, मात्र काल राहुलने वाचून दाखवलेला निकाल पाहता अजित उपच राहतो असे दिसतेय. शरदरावांना या वयात राजकारण डागण्या देतंय, मात्र माझा महाराष्ट्र हे निमूटपणे फक्त पाहू शकतो. तो खपवून घेईल असे मला वाटत नाही.
दिल्लीला नेहमीच दख्खन सलतो, मोघलाई इथे आली तेव्हा आमच्या शिवरायांनी गाडली, दिल्लीला अद्दल घडवणे आम्हाला नवं नाही. कमळीच्या सत्तेच्या लुगड्याला लागलेले कमी नाहीत. येळ काळ आल्यावर नागडे होतीलच तेव्हा अंग कसे लपवतील तुळजा भवानीच जाणो… एकनाथचा खांदा वापरून गुजरात्यांनी उच्छाद मांडलाय, भ्रमात आहे एकनाथ म्हणजे चंद्र कमळीच्या उजेडात लखलखतो आहे. मात्र चंद्राला शाप आहे पौर्णिमेचा… तो अमावस्येचा व्हायला काय तो अवधी? चार सहा महिने मातोश्रीवर तोफा डागायला एकनाथी ठाणे वापरले जाईल, नंतर मग नवा एकनाथ.
सैनिकांनो, काळ बाका आणि रात्र कमळीची आहे म्हणजे वैर्याची, आमच्या करंगळीला महाराष्ट्रात आलेला हा शेठजी भटजीचा पक्ष, गोपीनाथ आणि खडसेने बहुजनांचा केला, त्या मुंडेंच्या लेकीचा सासुरवास लावला आहे, परवा म्हणे वैद्यनाथचा लिलाव, उसतोड कामगारांची भाषा करताना पोरगी जरा करळ बोलली की लागलीच लिलाव, पवारांचा पुतण्या पळवला. आता तीच भीती नातवाला दाखवणे चालूय, रोहितकडे ईडीचे बोट त्यासाठीच. पळपुट्यांनी ठाणे ओसंडून वाहत आहे, सत्तेसाठी पाय चाटणारी औलाद माझ्या सैनिकांची असूच शकत नाही, खरी खोटी शिवसेना हा काय बावळटपणा आहे? विठ्ठल बदलणारे काय कारभार करणार? शिवतीर्थावर माझे शेवटचे भाषण, मी तेव्हाही म्हटलो होतो, उद्धव, आदित्यला सांभाळा. उद्धव बद्दल काय काय एकतोय? एकनाथ काय, रामदास काय, अरे चिमण्यांनो कोण होतात तुम्ही, नारायणबद्दल तर मी मागेच बोललोय. भाजपच्या दावणीला गेलेले उभे करताना, निवडून आणताना मातोश्री खचली आहे, जिच्यावर तुम्ही डागण्या देत आहात. नीतीमत्ता काय ती सांगावी. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजी नीती, कमळी हेच इंग्रजी गाणे महाराष्ट्रात म्हणतेय. उद्धवची सेना फोड, शरदरावांची राष्ट्रवादी फोड. वाजपेयी अडवाणीचा काळ वेगळा होता. प्रमोद, गोपीनाथराव येऊन बसायचे, तेव्हा हिशोबात होते. आता नागपूरचा तो कालचा पोरगा एका तडीच्या पार असलेल्या भलत्या माणसाच्या तालमीत महाराष्ट्राचा नकाशा गुजरातला जोडतोय, महाराष्ट्राची जरब सांभाळा. सत्ता ही सैनिकांसाठी महत्वाची नाही. ८० टक्के समाजकारण हीच आमची नीती आहे.
अंबानीचे थोरले म्हणे रिलायन्स गुजराती कंपनी आहे, मुंबईत राहून गुजराती स्वाभिमान ठीक आहे, मात्र तो गर्व असेल तर अंबानी माजले आहेत. सगळं काही अहमदाबाद आहे, खरं तर देशाने काळजी केली पाहिजे असंच सगळं चालूय. मोदींना कुणीतरी गुजरात हे राज्य आहे देश नाही असे कळवले पाहिजे, नाहीतर चांगली कानउघडणी केली पाहिजे.
माझ्या सैनिकांनो, सत्ता येते जाते. असली भिकारडी सत्ता तर नकोच, आपल्याच मातोश्रीवर उलटणारी औलाद समाज ठेचून काढत असतो, येणारा काळ असाच असेल. उद्धव, आदित्यच माझे वारस आहेत. सैनिकांनो तुमच्या खांद्यावर त्याचं ओझं आहे, दिल्लीला झुकवणे हे महाराजांच्या मावळ्यांना नवं नाही, गुजरातचं सुरत लुटणे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. होय, माझा सैनिक कमळीचा इंगा जिरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सोनियाबाई, शरदरावांचे पक्षदेखील जोडीला आहेत, कमळीने कितीही डोळे घालून आमचे वाघ नादाला लावू देत. सह्याद्री दिल्लीला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही.
भरकटलेल्या चिमण्यांनी आपल्या घरी परतावं. परके ते परके. मुंडे खडसेचे झाले नाही तुमचे काय होणार, गुलाबाकडे पाहू नका, त्या खालचे काटे ओळखा. लोकसभेखालचे हात काढण्यासाठी मळ्या काढल्या जात आहेत.
सत्तेचा वापर सुडासाठी ना वसंतदादांनी केला ना शरदबाबूंनी, आम्हीदेखील सत्ता होती तेव्हादेखील महाराष्ट्र धर्म जागवला आणि वाढवला. तुम्ही तेच करा. दिल्लीच्या टिरी बडवून अद्दल घडवा चांगले. हुसकावून लावा.
संजय, सुषमा बाजू मांडतायत, लढतायत, आदित्य आता अधिक पोक्त होतोय. उद्धवच्या तब्येतीची काळजी वाटते, तरीही त्याचा बाणा कणखर आहे. सैनिकांनो धीर धरा, लढा, दाखवून द्या. नामर्द आणि सैनिकांत काय फरक असतो.
जय महाराष्ट्र…
(तळटीप – हे बाळासाहेबांचे अनावृत पत्र काल्पनिक असले तरी आजच्या वास्तवाचा वेध घेणारे आहे.)