एखादा थोर व्यंगचित्रकार मनीध्यानी नसताना एक मोठा नेताही बनतो, बलशाली संघटना बनवतो, याचं जगातलं बहुदा एकमेव उदाहरण म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी राजकीय धकाधकीच्या जीवनात, राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असतानाही व्यंगचित्रं काढणं थांबवलं नाही. त्यांच्या शाब्दिक फटकार्यांच्या बरोबरीने, किंबहुना त्याहूनही अधिक त्यांच्या कुंचल्याच्या फटकार्यांचा धाक होता. त्या कुंचल्याने कधीच कोणाचा मुलाहिजा केला नाही. खास ठाकरी बाण्याचं वरदान त्या कुंचल्यालाही लाभलं होतं. एक प्रमुख राजकीय नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या कुंचल्यातून चित्रित होण्याचे योग तसे दुर्मीळ. आपली कला त्यांनी आपल्या व्यक्तिगत प्रतिमानिर्मितीसाठी आणि व्यक्तिगत प्रचारासाठी कधी वापरली नाही (त्या मार्केटिंगच्या कलेचे जनक २०१४ साली भारताच्या रंगमंचावर अवतरले). त्यामुळेच त्यांच्या जन्मदिनाच्या मुहूर्तावर त्यांच्या व्यंगचित्रातले त्यांचेच रूप पाहणे मनोरंजक आणि उद्बोधक आहे. विषय आहे समाजवाद्यांबरोबर हातमिळवणीचा. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि स्फोटक राजकीय, सामाजिक विचारांमुळे त्यांच्याबद्दल अन्य राजकीय विचारधारांनी काय कल्पना करून घेतली होती, त्याचं दर्शन त्यातून घडतं… आता वैâक वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ समाजवादी नेते मातोश्रीवर पोहोचले तेव्हा काळाचे एक वर्तुळ पूर्ण झाले, असेच म्हणावे लागेल.