□ मिंधे सरकारला वर्ष झालं, तरी १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत.
■ औट घटकेचं सरकार कितीही खोटेपणा करून पडू दिलं नाही, तरी ते कधी औट होईल, ते सांगता येत नाही. अनौरसांकडे पालकत्व सोडून उपयोग तरी काय?
□ मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
■ ही बातमीच नाही; अविश्वास प्रस्तावाने सरकार पडेल म्हणून तो आणला होता का? मणिपूर जळत असताना तोंडातून ब्र न काढणार्या मौनीबाबांनी तोंड उघडावं, यासाठी विरोधकांना हे करावं लागलं!
□ मुख्यमंत्री चार दिवस सुट्टीवर; सातार्यातील गावी दाखल.
■ सवय करून घेत असतील निवृत्तीनंतरच्या आयुष्याची.
□ भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
■ भाजपच्या पदाधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत कुठल्या तरी पोलिसांनी दाखवली हीच खरंतर बातमी आहे.
□ उड्डाणपूलबाधित जुचंद्र शेतकर्यांची मोबदल्याविना फरफट.
■ त्यांना सहजगत्या मोबदला मिळाला असता तरच आश्चर्य वाटलं असतं.
□ मुंबईची घाण आता वसईच्या ग्रामीण भागात.
■ मुंबईच्या परिसरातली उरली सुरली हिरवाईही हे विकासाचा भस्म्या रोग झालेलं महानगर गिळून टाकणार तर!
□ अदानी हटाओ, धारावी बचाओसाठी धारावीत जाहीर सभा.
■ अख्ख्या देशाचे आणि प्रधानसेवकांचे देशाचे मालक आहेत ते, धारावी क्या चीज है?
□ दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपये खर्चूनही रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य; मनोर-वाडा-भिवंडी मार्गावर रास्ता रोको.
■ आता जगभरातले राजकारणी त्यांची शिष्टमंडळं महाराष्ट्रात पाठवतील, सतत खड्डेयुक्तच राहणारे, दुरुस्तीच्या कंत्राटांची व्यवस्था करणारे रस्ते बांधायचे कसे, हे शिकून घेण्यासाठी.
□ सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची लूट थांबवावी -प्रकाश आंबेडकर.
■ हिंदीत म्हणतात, ऐसा कोई सगा नहीं, जिसको हमने ठगा नहीं… लुटण्यात या सरकारने कोणालाच सोडलेलं नाही, मग सुशिक्षित बेरोजगारांचाच अपवाद का बाळासाहेब?
□ बाळासाहेबांचे स्मारक राज ठाकरेंशिवाय दुसरे कुणीच बनवू शकत नाही – आमदार राजू पाटील
■ सगळेच एकमेव आहेत तिथे. स्वाभाविक आहे असं वाटणं. पण, बाळासाहेबांचं स्मारक हा राजसाहेबांच्याही जिव्हाळ्याचा विषय असणार, त्यात उगाच राजकारण कशाला आणायचं?
□ मोदी मणिपूरला का जात नाहीत हे मला माहीत आहे, पण मी बोलणार नाही – राहुल गांधी यांनी तोफ डागली.
■ अरे अर्णब जागा हो, पेन्सिल नाचवत विचार राहुलला, सांग कारण, सांग कारण, द नेशन वाँट्स टु नो!!
□ रस्ते खड्डेमुक्त कधी करणार? – उच्च न्यायालयाने झापले.
■ खडी आणि डांबराची क्वालिटी न्यायाधीशांमार्फत चेक होऊन जायला लागेल आणि प्रत्येक गल्लीतल्या रस्त्याच्या दुरुस्तीवर एकेक खंडपीठ बसवायला लागेल, तेव्हा कदाचित रस्ते खड्डेमुक्त होतील…
□ मुस्लिमांकडे मी मतं मागणार नाही – आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा.
■ त्यांना तुम्ही देशाचे नागरिक मानत असाल तर मतं मागाल. काँग्रेसची ही घाण योग्य कचरापेटीत गेली याचा आनंद आहे मात्र.
□ शासन आपल्या दारी, हिंसाचार महाराष्ट्रभर करी – आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला टोला.
■ इतर काही येत नसलेल्या मवाल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार, आदित्यजी!
□ स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणावरून मिंधे सरकारमध्ये रूसवेफुगवे.
■ या वर्षीच काय ते फडकवून घ्या, पुढच्या वर्षी आपापल्या गच्चीतच साजरा करायचाय स्वातंत्र्यदिन!
□ माझे अस्तित्व संपवण्याचा कट – कोथरूडच्या माजी भाजप आमदार मेधा कुलकर्णी.
■ फारच लवकर लक्षात आलं तुमच्या मेधाताई! जेव्हा अन्याय झाला तेव्हा पाठकणा दाखवला असतात तर ही वेळ आली नसती.
□ साडेचारशे कोटींचा खर्च करूनही मुंबईच्या सुशोभिकरणाचा रंग उतरला.
■ किती कंत्राटदारांच्या, अधिकार्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या घराचं रंगकाम झालं असेल, ते पाहा की!
□ मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आरोग्य यंत्रणा फेल.
■ आरोग्य यंत्रणा पण फेल, असं म्हणायचंय का?
□ वाढवण बंदराला ना-हरकत दाखला दिला तर टाळे ठोकू – पालघरच्या वन कार्यालयावर भूमिपुत्रांची धडक.
■ प्रकरणाची वाढवण करायची की इथेच मिटवायचं ते ठरवा.